३० नोव्हेंबर रोजी त्रिपुरी पौर्णिमा आहे. या पौर्णिमेचे महत्त्व अनेक प्रकारे सांगितले जाते. या पौर्णिमेला मनोरथ पौर्णिमा असेही म्हणतात. धर्मबोध या ग्रंथात ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर लिहितात, कार्तिक पौर्णिमेपासून या व्रताला प्रारंभ केला जातो. पूर्ण वर्षभरातील दर पौर्णिमेला उगवत्या चंद्राची पूजा करून भोजन करावे. मात्र, त्याआधी एक वर्तुळात मिठाची केलेली चंद्रप्रतिमा ठेवून तिचीही पूजा करावी. नंतर सर्व स्त्रियांना हळदीकुंकू आणि सौभाग्यवाण द्यावे. उद्यापनाच्या वेळी कुसुंबी रंगाचे वस्र द्यावे. सौंदर्य आणि संपत्तीसाठी हे काम्यव्रत केले जाते.
मिठाची चंद्रप्रतिमा करणे तसे कठीण. शिवाय मीठ असे व्यर्थ घालविणे अनेकांना पटणार नाही. त्यामुळे दर पौर्णिमेला चंद्राचे दर्शन घेऊन त्याला केवळ मनोभावे नमस्कार केला तरीही पुरेसे आहे. एरव्हीला कामाच्या व्यापात चंद्रदर्शनाची प्रथा संकष्टी चतुर्थीलाही पाळणे हल्ली कठीण होऊ लागले आहे. कोजागिरी वगळता इतर पौर्णिमांकडे मंडळींचे फारसे लक्ष नसते. ज्यांना गच्चीवर जाऊन चंद्रदर्शन घेणे सोयीचे असेल, वा घरातून किंवा घराच्या आवारातून चंद्र दिसू शकत असेल, त्यांनी निदान ते नेत्रसुख तरी जरूर घ्यावे.
हेही वाचा : त्रिपुरी पौर्णिमा हा त्रिपुरासुराच्या वधाचा विजयोत्सव!
कूष्मांड व्रत : कार्तिकी पौर्णिमेला कोहळ्याच्या वेलींची लक्ष्मी-नारायण म्हणून पूजा करावी. ही पूजा षोडशोपचारी असावी. पूजा पूर्ण झाल्यानंतर,
कूष्मांडवल्ली सुभगां सुफलां विश्वरुपिणीम्लक्ष्मीरूपां सुविस्तारां ध्यायामि हरिवल्लभाम्
ह्या मंत्राने ध्यान करावे. त्यानंतर ती वेल योग्य व्यक्तीला दान करावी. ह्या व्रताचे उद्यापन शुभदिवस आणि मुहूर्त बघून करावे. त्यावेळी कोहळ्याचा वेल आणि लक्ष्मी नारायणाची सोन्याची प्रतिमा करावी. त्यांची पूजा करून मंत्रजागरण करावे. ह्यावेळी सोळा दाम्पत्यांना जेवू घालून दक्षिणा द्यावी, असा या व्रताचा विधी आहे. सर्व पापांच्या नाशार्थ तसेच उत्तम संतती लाभावी म्हणून हे व्रत केले जाते.
पूर्वी लोकांना मुबलक वेळ होता. आताएवढे जीवन गतीमान नव्हते. त्यामुळे अनेक कर्मकांडांनीयुक्त अशी व्रतेदेखील त्यावेळी करता येणे शक्य होते. त्यामुळे या व्रतामध्ये ज्या कोहळ्याच्या वेलीची पूजा करावयाची असते, ती वेल बी रुजवून वाढवण्याचा पूर्व विधी फार आधी म्हणजे मृगशीर्ष नक्षत्रामधून सूर्यभ्रमण चालू असताना एका शुभ दिवशी करण्यास सांगितले आहे. ते बी रुजून वेल वाढून तिला फुले येईपर्यंतच्या काळात त्या वेलीची निगराणी करणे, हेदेखील व्रताचेच एक अंग मानले गेले आहे. आता हे सर्वांनाच शक्य नाही. जागेची अडचण हे त्याचे मुख्य कारण म्हणावे लागेल. एखाद्या विष्णुमंदिरात विचारविनिमय करून कोहळ्याची वेल धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार वाढवून कार्तिकी पौर्णिमेला ती सर्व व्रतकर्त्या मंडळींसाठी पूजा करण्यास उपलब्ध करून द्यावी. अगदीच अशक्य असल्यास कोहळ्याची पूजा करावी.
आवळीपूजन : आवळे नवमीची पूजा राहून गेलेली असल्यास कार्तिक पौर्णिमेला आवळीच्या वृक्षाची पूजा करण्याची प्रथा आहे. ह्या दिवशी शुचिर्भूत होऊण आवळीच्या आवळीच्या वृक्षाची पूजा करून तिला वटपौर्णिमेला वडाच्या वृक्षाला जसे सूत गुंडाळले जाते, तसे सूत गुंडाळावे. श्रीफलासह अर्घ्य द्यावे. तिच्या आठ दिशांना दिवे लावावे. पितरांचे स्मरण करून एका दाम्पत्याला भोजन घालावे. या दिवशी देव येऊन आवळीच्या झाडाखाली भोजन करतात, असे मानले जाते. म्हणून या दिवशी आवळीपूजनाचे अधिक महत्त्व आहे.
आवळा हे लक्ष्मीचे, संपत्तीचे द्योतक आहे. तसेच त्याचे धार्मिक आणि आयुर्वेदिकदृष्ट्या अधिक महत्त्व आहे. उत्सवाच्या निमित्ताने या हे महत्त्व अधोरेखित व्हावे, हाच मुख्य हेतू आहे.
हेही वाचा : त्रिपुरी पौर्णिमेला होणार, तुलसी विवाह व कार्तिक स्नान समाप्ती!