आपल्या रात्रीच्या झोपेवर संपूर्ण दिवस अवलंबून असतो. झोप नीट झाली नाही, की दिवसभर थकवा जाणवतो, चिडचिड होते आणि कोणत्याही विषयात लक्ष लागत नाही. म्हणून झोप ही आपल्या शारीरिक, मानसिक स्वाथ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असते.
मऊ गाद्या, जाड पांघरूण, वातानुकुलित खोली, अशा सगळ्या सोयीसुविधा असूनही अनेकांना रात्रीची झोप लागत नाही. पूर्ण रात्र छताकडे बघण्यात, मोबाईल बघण्यात आणि वारंवार कूस बदण्यात काढावी लागते. तरुणांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना झोप न लागण्याची समस्या जास्त सतावते. अनेक जण तर रात्रीचे जागरण होणार, या कल्पनेने एवढे धास्तावतात, की त्यांना रात्रच नकोशी वाटते. या सर्वांवर वास्तु शास्त्रात सोपा उपाय, म्हणजे झोपण्याची दिशा बदलून पहा. त्याचा नक्कीच लाभ होईल.
तुमचे अंथरुण कोणत्या दिशेने टाकता, यावर तुमची झोप अवलंबून आहे. म्हणून वास्तुशास्त्रात मन:शांतीसाठी उपाय विचारले असता, सर्वप्रथम शयनगृहाची मांडणी तपासली जाते. त्यानुसार उपाय सुचवले जातात. तुम्हीही तुमची झोपण्याची स्थिती आणि दिशा पुढील माहितीनुसार तपासून पहा.
१. नेहमी झोपताना डोक्याची बाजू पूर्वेला किंवा दक्षिणेला करा. तुम्ही, जर उत्तर किंवा पश्चिम दिशेला डोक्याची बाजू ठेवून झोपत असाल, तर सर्वप्रथम ती चूक टाळा. वाईट स्वप्न, निद्रानाश, अतिविचार इ. दुष्परिणाम टाळता येतील.
हेही वाचा: संस्कृतीचं, मांगल्याचं प्रतीक आहे 'स्वस्तिक'; सकारात्मक ऊर्जा देणारं शुभचिन्ह
२. ज्येष्ठ नागरिकांनी नैऋत्य-वायव्य दिशेने झोपावे. अर्थात नैऋत्य दिशेला डोक्याची व वायव्य दिशेला पायाची बाजू आली पाहिजे. ज्येष्ठांना उतारवयात झोप कमी लागते. परंतु, झोपेची दिशा बदलून पाहिली, तर थोड्या वेळापुरती का होईना, पण शांत झोप लागू शकते.
३. अविवाहित मुलींनी वायव्य-अग्नेय अशी झोपताना स्थिती ठेवावी. डोक्याची बाजू वायव्य दिशेला आणि पाय अग्नेय दिशेला केले असता, त्यांचे चित्त स्थिर होऊन शांत झोप लागते. याउलट नैऋत्य-ईशान्य दिशेने झोपले असता, मनाची चलबिचल वाढून निद्रानाश होतो, असा अनेकांना अनुभव आहे.
शांत झोप लागावी, म्हणून औषधोपचारांपासून ध्यानधारणेपर्यंत सर्वकाही उपाय करतो. त्याच उपायात ही भर घालून पहा. हे विनाखर्चिक उपाय गुणकारी ठरले, तर त्याचा परिणाम तुमच्या तना-मनावर आणि कुटुंबावर निश्चित दिसून येईल.
या सर्व उपायांबरोबर आणखी एक दोन गोष्टी करायला विसरू नका. एक म्हणजे, झोपण्याआधी आणि झोपून उठल्यावर तासभर मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर पाहू नका. म्हणजे विचारचक्राचा वेग नियंत्रित राहिल. तसेच, दुसरा उपाय म्हणजे, परमेश्वराचे नाव घेऊन, एखादा श्लोक म्हणून किंवा ऐकून मगच झोपा. म्हणजे इतर विचारांची दारे आपोआप बंद होतील. सहज-सोपे उपाय मोठा बदल घडवतील.
(ही माहिती वेगवेगळ्या स्रोतांमधून जमा केली आहे. अधिक माहितीसाठी वास्तुशास्त्र अभ्यासकांचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा: Adhik Maas 2020: दारात तुळशी वृंदावन लावा, लक्ष्मीसोबत लक्ष्मीपतीही येतील!