सद्यस्थितीत घराघरात कली शिरलेला आहे. खऱ्या अर्थाने कलियुग सुरू झाले आहे. कोणीही कोणाला जुमानत नाही, कोणी कोणाची काळजी करत नाही, मन जपत नाही, नाती जपत नाही. अशामुळे दारिद्रय , गैरसमज, आजारपण, कलह यांमुळे अनेक संसार अस्वस्थ स्थितीतून जात आहेत. अनेकांच्या सुखाची हानी होत आहे. यावर उपाय म्हणून उपनिषदात एक मंत्र आहे. त्याची मनोभावे उपासना करावी आणि प्रत्यय घ्यावा.
खरे पाहता, ईश्वरी सत्ता प्रमाण मानून भगवंत ज्या स्थितीत ठेवेल त्या स्थितीत संतोष मानणे हाच एक मुख्य तोडगा आहे. परंतु आपले तेवढ्यावर समाधान होत नाही. यासाठी उपनिषदात दिलेल्या तोडग्याची आपण प्रत्यक्ष अनुभूती घ्यावी. तोडग्यावर पूर्ण विश्वास असेल व तसा ईश्वरी संकल्प असेल तर त्याचा जरूर अनुभव येतो. लेखक अ.ल.भागवत यांनी परम सुखाचे रहस्य या पुस्तकात हा तोडगा दिला आहे.
उपनिषदे ही ईश्वरी वाचा असल्यामुळे त्या मंत्रातील अर्थ अनुभवाला येणे यथान्याय आहे. या उपासनेसाठी कसलेच अवडंबर नाही. काहीही खर्च नाही. जागेचे बंधन नाही. सकाळी उठून नित्याप्रमाणे स्नान करावे. आपले आन्हिक संपवावे. नंतर डोळे मिटून घ्यावेत व खालील उपनिषद मंत्र मनातल्या मनात २७ वेळा म्हणावा.
श्लोक : स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा: स्वस्ति न: पूषा विश्ववेदा:।स्वस्ति नस्ताक्ष्र्यो अरिष्टनेमि: स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु।।ऊँ शांति: शांति: शांति:।
अर्थ : महान कीर्तिमान इन्द्र माझे कल्याण करो, परम धनवान पूषा माझे कल्याण करो, अरिष्टांचा नाश करण्यासाठी चक्ररूप गरुड माझे कल्याण करो. माझ्या त्रिविध तापाची शांती होवा़े
जसजसा मंत्रजप वाढत जाईल त्या प्रमाणात जीवनाला मांगल्य व स्थैर्य प्राप्त होईल. यंत्रे पूजण्यापेक्षा हा वैदिक मंत्र तुमचे कल्याण करण्यास समर्थ आहे. मंत्रजपकाळी मोठ्या आनंदात राहावे. सर्व चिंता काळजी भगवंतावर सोपवून निर्धास्तपणे जीवन जगावे.
वैदिक मंत्रांमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. आपले ऋषी मुनी त्या मंत्र सामर्थ्याने वाईट शक्तींवर विजय मिळवत असत. परंतु सद्यस्थितीत आपल्या प्राचीन ग्रंथांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे आणि आपणच आपल्या बहुमूल्य साहित्यावर शंका उपस्थित करत असल्यामुळे सकारात्मक लहरींचे प्रमाण कमी होत चालले आहे. याउलट परदेशातील लोक वेद वांङमय अनुवादित करून त्यांचा अभ्यास करत आहेत व लाभ घेत आहेत. गरज आहे ती आपण आपल्या प्राचीन संस्कृतीकडे डोळसपणे पाहण्याची आणि जाणीवपूर्वक अभ्यासण्याची!