हिंदू धर्मात लग्न हे पवित्र बंधन मानले जाते. एकदा बांधलेली लग्नगाठ सात जन्म सुटत नाही, असा आपल्याकडे पूर्वापार विश्वास आहे. त्याच आधारावर विवाहसंस्था टिकून आहे. परंतु, अलिकडच्या काळात घटस्फोटाचे वाढते प्रमाण पाहता एकूणच कुटुंबसंस्थेला हादरे बसत असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी घटस्फोटाचे प्रमाण दहातून एक असे आता, दहातून ७ जोडप्यांचे विलगीकरण होत आहे. तसे होण्यामागे कारणे बरीच आहेत. परंतु, आपल्याला कारणांबद्दल विचार न करता उपायांबद्दल विचार करायचा आहे. तुम्हीसुद्धा तुमचे नाते टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असाल, तर ज्योतिषशास्त्रात दिलेले उपाय नक्की करून पहा.
नाते संपुष्टात यावे असे कोणालाही वाटत नाही, परंतु परिस्थिती जेव्हा हाताबाहेर जाते आणि दोघांपैकी कोणीच माघार घेत नाही, तेव्हा कायदेशीररित्या नाते दुभंगून जाते. परंतु त्यातून होणारा मन:स्ताप नैराश्याला कारणीभूत ठरू शकतो. काही जण वर्षानुवर्षे कोर्टाच्या खेपा घालत झुरत बसतात. अशा वेळेस थोडे आणखी सामंजस्य दाखवले आणि आपल्या पुरातन शास्त्रात दिलेल्या उपायांचा आधार घेतला, तर नात्यात आलेले मळभ नक्कीच दूर होऊ शकेल. ते उपाय कोणते, हे जाणून घेऊया.
घटस्फोटजन्य परिस्थिती निर्माण होण्यामागे अनेकदा कुंडलीतील ग्रहदशाही कारणीभूत ठरू शकते.
- जर तुमच्या कुंडलीत शनीदोष असेल, तर तुम्ही ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार सप्तमुखी रुद्राक्ष धारण केला पाहिजे. शनि ग्रहाची शांती करून घेतली पाहिजे. तसेच रोज उठल्यावर आंघोळ करून गणपतीची पूजा करणेही लाभदायक ठरू शकते.
- जर कुंडलीतील राहू हा ग्रह त्रासदायक असेल, तर तुम्ही अष्टमुखी रुद्राक्ष धारण केला पाहिजे. त्यामुळे अनेक प्रकारच्या कौटुंबिक समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते.
- जर तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल, तर पुरुषांनी हिऱ्याची अंगठी परिधान करावी. हिरा हे रत्न शरीरावर प्रभाव टाकते आणि मन शांत ठेवण्यास मदत करते.
- ज्योतिषांकडून सिद्ध शुक्र यंत्र आणून ते बेडरूममध्ये ठेवल्यासही नवरा बायकोच्या नात्यावर सकारात्मक परिणाम दिसून येतात.
- घरात वारंवार मुंग्या येत असतील तर त्यांना गव्हाचे पीठ अर्थात कणिक खाऊ घाला. सलग २१ दिवस हा उपाय केल्याने परिस्थिती सुधारण्यास मदत होते.
- नवरा बायकोने झोपताना पूर्व दिशेला डोके ठेवून झोपल्यास कलह शांत होण्यास मदत होते.
- रोजचे वाढते वाद कमी करण्यासाठी नवरा आणि बायको दोघांनी हनुमान चालिसा, हनुमान मंत्र किंवा कोणत्याही हनुमान स्तोत्राचे नित्य पठण करावे. तसे केल्याने वादग्रस्त परिस्थिती मिटून नात्यातली दरी कमी होत असल्याचा अनेकांना अनुभव आहे.
- नवरा आणि बायकोने सलग १४ दिवस पिंपळाच्या झाडाला पाणी घातले, तरीदेखील नात्यात सुधारणा होऊ शकते.
याव्यतिरिक्त, दोघांनी एकमेकांना समजून घेतले, वाद झाल्यावर एकाने शांत बसले, राग फार वेळ न ठेवता कोणीही एकाने माफी मागून भांडण मिटवले, तर नात्यातली दरी वाढणारच नाही. असे करण्यात कोणालाही कमीपणा येत नाही. नवरा बायकोचे नाते परस्परावलंबी असते आणि समसमान असते. त्यामुळे मनातील अढी दूर करून नात्याला प्राधान्य दिले, तर लग्न टिकून राहिल आणि पर्यायाने लग्नव्यवस्थाही!