मंगळवार हा मंगलमुर्ती गणरायाला समर्पित आहे तसा संकटमोचन हनुमानालाही दिला आहे. कारण हनुमंत हे देखील मंगलकारी आहेत. तसे वर्णन हनुमान चालीसामध्येही आढळते. म्हणून ज्योतिष शास्त्राने मंगळवारचे काही उपाय दिले आहेत. ते केले असता आपले भय, चिंता दूर होऊन निश्चिन्तपणे जगण्याचा मार्ग सुकर होतो. ते उपाय कोणते ते पाहू.
ज्योतिषशास्त्रात मंगळवारी गणपती बाप्पाबरोबरच हनुमानाची पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी बजरंगबलीला गूळ खोबरे अर्पण करावे. रुईच्या पानाफुलांची हार घालावा आणि तेलाचा दिवा लावावा. यामुळे हनुमंत प्रसन्न होतात. त्यांच्या कृपेने बिघडलेली कामेही होऊ लागतात, जीवनातील सर्व अडथळे आणि अडचणी दूर होतात. त्यासाठी आणखीही काही प्रभावी तोडगे दिले आहेत, कोणते ते पाहू.
शनि महादशाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी उपाय : जर कुंडलीत शनिदोष असेल, शनीची साडेसाती, धैय्या किंवा महादशा चालू असेल आणि त्याचा जीवनावर वाईट परिणाम होत असेल तर १०८ वेळा पिवळ्या चंदनाच्या माळेने राम नामाचा जप करावा. ती माळ उपलब्ध नसेल तर तुळशीच्या माळेने जप करावा यामुळे शनि आणि राहूच्या नकारात्मक प्रभावापासून आराम मिळतो.
कामातील अडथळे आणि समस्या दूर करण्याचे उपाय : मंगळवारी सकाळी स्नान करून हनुमान मंदिरात जाऊन हनुमंतासमोर तेलाचा दिवा लावा, हार, शेंदूर, नैवेद्य झाल्यावर शक्य तितक्या वेळा पूर्ण भक्तिभावाने हनुमान चालिसाचे पठण करा. त्यामुळे कामात तसेच आनंदाच्या मार्गात येणारे अडथळे लवकरच दूर होतील.
अकाली मृत्यूचे संकट दूर करण्याचा उपाय : मंगळवारी ऑफिस किंवा व्यवसायाच्या कामास सुरुवात करण्यापूर्वी हनुमानाच्या मंदिरात जाऊन त्याचे दर्शन घ्या. देशी गायीच्या तुपाचा दिवा लावा आणि नंतर सुंदरकांड पाठ करा. हा उपाय सतत ११ मंगळवार केल्यास अकाली मृत्यू, अपघात-रोगाचा धोका दूर होतो.
आर्थिक संकट दूर करण्याचा उपाय : दर मंगळवारी गायीला चारा, कुत्र्याला भाकरी खाऊ घाला. आर्थिक परिस्थिती सुधारू लागल्यावर गरीब, गरजू लोकांना अन्नदान करा. हे किमान ११ मंगळवार करा, तुमचे उत्पन्न वाढू लागेल.