फाल्गुन कृष्ण द्वितीया हा दिवस वारकरी पंथीयांसाठी फार महत्त्वाचा दिवस. कारण आजच्याच तिथीला संत शिरोमणी तुकाराम महाराज यांनी वैकुंठ गमन केले होते. एवढेच नाही, तर इहलोकाची यात्रा संपवण्याआधी या शेवटच्या प्रवासाचे वर्णन करणारे अभंग देखील दूर दृष्टीने लिहून ठेवले होते. तो प्रवास ज्या ठिकाणाहून झाला ते ठिकाण देहू गावात आढळते. हजारो भाविक नेहमी तिथे दर्शनासाठी जातात. विशेषतः आजच्या दिवशी तिथे जास्त गर्दी असते, ती तिथल्या सकारात्मक शक्तीची प्रचिती घेण्यासाठी!
नांदुरकी वृक्ष का हलतो? संत तुकारामांचा जन्म देहू या गावात झाला आणि त्यांनी वैकुंठ गमन केले तेदेखील याच गावातून! त्याठिकाणी तुकारामांचा जन्म जिथे झाला तिथे एक मंदिर आहे, त्यांनी वैकुंठ गमन जिथून केले तिथे एक मंदिर आहे आणि जिथे तुकाराम महाराजांच्या गाथा तरून वर आल्या तिथे गाथा मंदिर आहे. पैकी वैकुंठ मंदिराच्या परिसरात एक चौथरा आहे त्यात नांदुरकी वृक्ष आहे. तुकाराम महाराजांनी देह ठेवण्यापूर्वी पांडुरंगाचे नामस्मरण करत त्याच वृक्षाच्या छायेचा आश्रय घेतला होता. त्यांना निरोप देण्यासाठी त्यांच्या कुटुंबासकट सगळे गाव गोळा झाले होते. परंतु तुकाराम महाराज मनाने शेवटच्या प्रवासाला निघाले. त्यांनी परमेश्वराचा धावा केला आणि दुपारी १२. ०२ मिनिटांच्या सुमारास अर्थात माध्यान्ह समयी विष्णुतत्त्व प्रगट झाले आणि त्यांनी तुकाराम महाराजांना एकरूप करून घेतले. ही घटना गावकऱ्यांच्या देखत घडली. त्याक्षणी ते विष्णुतत्त्व त्या वृक्षात एकवटले आणि समस्त भाविक त्या वृक्षासमोर नतमस्तक झाले. तेव्हापासून तुकाराम बीज या तिथीला बरोबर १२. ०२ मिनिटांनी नांदुरकी वृक्ष हलतो आणि सगळे भाविक त्या विष्णुतत्त्वाची पुनश्च अनुभूती घेतात.
वृक्ष हलण्यामागील शास्त्र :
वाऱ्याबरोबर झाडं डोलतात, ही नैसर्गिक क्रिया आहेच, मग नांदुरकी वृक्षाचे वेगळे महत्त्व काय? तर त्या तिथीला त्याच वेळेला वृक्षाची होणारी विशिष्ट हालचाल त्या स्थानाचे महत्त्व अधोरेखित करते. संत तुकाराम महाराज हे आपल्यासारखेच संसारी, मात्र त्यांचा अध्यात्मिक अधिकार मोठा म्हणून ते संतपदाला गेले. अशी माणसं मनुष्य देहात असूनही आपल्या अतींद्रिय शक्तीने भविष्याचा वेध घेतात, भाष्य करतात. ज्याला आपण सिक्स्थ सेन्स असे म्हणतो. त्याचा प्रत्यय आपणही घेतो. परंतु आपल्यात आणि तुकाराम महाराजांमध्ये नक्कीच जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यांचा अधिकार पाहता त्यांच्यात असलेली सकारात्मकता त्या स्थानामध्ये एकवटली आहे असे म्हटल्यास नाकारण्याचे काहीच कारण नाही. ज्याप्रमाणे मंदिरातल्या लहरी आणि घरातल्या लहरी वेगळ्या असतात, भारावून टाकणाऱ्या असतात, तीच ऊर्जा देहूच्या स्थानात तुकाराम महाराजांमुळे एकवटली आहे. त्यांचे सदेह वैकुंठात जाणे अलौकिक तत्त्वाचे होते. ती ऊर्जा नांदुरकी वृक्षात साठून राहिल्याने त्या तिथीला त्या वेळेला त्याच ऊर्जेची पुनरावृत्ती होत असल्याचे आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही!
तुकाराम महाराजांचा शेवटचा प्रवास :
तुकाराम महाराज सदेह वैकुंठात गेले की त्यांच्याशी काही विपरीत घडले, यावर चर्चा करण्यात अनेकांना रस असतो. महाराजांना आपण पाहिले नाही, परंतु त्यांची भूमिका करणारे आणि जगणारे विष्णुपंत पागनीस संत तुकाराम नाटक करत असताना वैकुंठ गमनाच्या प्रसंगात देवाघरी गेले, असे म्हणतात. आज तुकाराम महाराजांची छबी म्हणून विष्णुपंत पागनीस यांचीच छबी पाहिली जाते. त्यांची भूमिका साकारणारी व्यक्ती, त्यांचे व्यक्तिमत्त्व जगणारी व्यक्ती अशा पद्धतीने लौकिक जगाचा निरोप घेऊ शकते, तर प्रत्यक्ष तुकाराम महाराज सदेह वैकुंठात गेले हे नाकारण्याचे कारणच काय? याही पलीकडे महाराज 'कसे गेले' यापेक्षा 'कसे जगले' यावर चिंतन होणे जास्त महत्त्वाचे नाही का? वयाच्या ४१ व्या वर्षी तुकोबांनी जनसेवा पूर्ण करून जगाचा निरोप घेतला, त्यातुलनेत आपण काय, कसे जगतोय याचा यतार्थ विचार होणे योग्य ठरेल!