>> रोहन विजय उपळेकर
२७ मार्च रोजी श्रीतुकाराम बीज. जगद्गुरु श्रीसंत तुकोबारायांचा ३७४ वा वैकुंठगमन दिवस होय. इ.स. १६०९ मध्ये माघ शुद्ध पंचमी, वसंतपंचमीला त्यांचा जन्म झाला व इ.स. १६५० साली फाल्गुन कृष्ण द्वितीयेला, वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी ते भगवान श्रीपंढरीरायांच्या साक्षीने सदेह वैकुंठाला गेले. जेथला माल तेथे पुन्हा पोचता झाला!
"आम्ही वैकुंठवासी । आलो याचि कारणासी । बोलिले जे ऋषी । साच भावे वर्ताया ॥तु.गा.२६६.१॥" असे आपल्या जन्माचे रहस्य स्वत: महाराजच सांगतात. प्रत्येक युगात ते हरिभक्तीचा डांगोरा पिटण्यासाठी अवतरत होते. श्रीनृसिंह अवतारात भक्तश्रेष्ठ प्रल्हाद, श्रीरामावतारात वालिपुत्र अंगद, श्रीकृष्णावतारात सखा उद्धव, श्री माउलींच्या अवतारात श्री नामदेव महाराज; असे त्यांचेच पूर्वावतार झालेले आहेत. म्हणूनच ते म्हणतात, "नव्हों आम्ही आजिकाळीचीं ।"
"धन्य म्हणवीन येह लोकीं लोकां ।" अशी आपली प्रतिज्ञा पूर्ण करून प्रत्यक्ष देहाने वैकुंठगमन करणारे, आपल्या विलक्षण अभंगवाणीच्या माध्यमातून जनमानसाला विठ्ठलभक्ती, सदाचरण, परोपकार इत्यादी सद्गुण-मूल्यांचे सुयोग्य मार्गदर्शन करणारे, "भले तरी देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ।" असा दुर्दम्य आत्मविश्वास असणारे, अत्यंत सडेतोड, परखड; पण त्याचवेळी मनाने अत्यंत सरळ, साधे, प्रेमळ असे श्री तुकोबाराय हे फार विलक्षण अवतारी सत्पुरुष होते. केवळ ४१ वर्षांच्या आपल्या आयुष्यात त्यांनी केलेल्या अद्भुत कार्याने अवघ्या महाराष्ट्रालाच नाही, तर संपूर्ण विश्वाला त्यांनी आज देखील वेडावून ठेवलेले आहे.
'मराठी म्हणजे माउली-तुकोबांची भाषा', असे समीकरणच आता रूढ झालेले आहे. त्यांची अजरामर अभंगवाणी ही त्यांच्याचसारखी अद्भुत गुणवैशिष्ट्ये असणारी, त्यांची साक्षात् वाङ्मयी श्रीमूर्तीच आहे. तिच्या रूपाने प्रत्यक्ष श्री तुकाराम महाराजच सदैव आपल्याला आशीर्वाद देत आहेत, आपले लळे पुरवीत आहेत, आपल्याला ब्रह्मानंदाचे परगुणे आकंठ जेऊ घालीत आहेत.
श्रीपंढरीनाथ भगवंतांचे लाडके लेकरु असणा-या श्रीतुकोबांचा महिमा यथार्थ वर्णन करताना; पूर्वी त्यांचे पक्के विरोधक असणारे पण खरा अधिकार जाणवल्यानंतर मात्र सर्व अहंकार बाजूला सारून, शरण जाऊन आपल्या सद्गुरूंच्या, श्री तुकोबांच्या दास्यातच जीवनाची कृतार्थता मानणारे, वाघोलीचे धर्ममार्तंड श्री रामेश्वर भट्ट प्रेमादरपूर्वक म्हणतात,
तुकाराम तुकाराम ।नाम घेता कापे यम ॥१॥धन्य तुकोबा समर्थ ।जेणे केला हा पुरुषार्थ ॥२॥जळी दगडासहित वह्या ।तारीयेल्या जैशा लाह्या ॥३॥म्हणे रामेश्वरभट द्विजा ।तुका विष्णू नाही दुजा ॥४॥
आता हे एवढे उघड सत्य समोर असतानाही, ते न पाहता, न अभ्यासता; जेथे प्रत्यक्ष श्रीराम, श्रीकृष्ण हे अवतारच झालेले नाहीत, रामायण व महाभारत हे काल्पनिक कथासंग्रह आहेत, अशीही स्वच्छंद मुक्ताफळे हिरीरीने मांडण्यात धन्यता मानणा-या महान(?) विचारवंतांच्या नजरेतून श्री तुकोबांचे वह्या तरंगणे, सदेह वैकुंठाला जाणे असे चमत्कार तरी कसे बरे सुटतील? त्यावर वाद घालणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावे, हेच उत्तम.
श्री तुकोबाराय स्वमुखाने सांगतात की, शंखचक्रादी आयुधे घेतलेले भगवान पंढरीनाथ व त्यांच्या सर्व सुहृद-संतांच्या उपस्थितीत मी विमानात बसून कुडीसहित "गुप्त" झालो. गुप्त झाले म्हणजेच सूक्ष्म स्तरावरील विमानात बसून गेले. त्याची ती गुप्त होण्याची यौगिक प्रक्रिया स्थूल दृष्टीला दिसणारी, स्थूल बुद्धीला आकलन होणारी नाही. त्यामुळेच लोकांना ते पटवून घेणे जड जाते. श्री तुकोबांच्या निर्याण प्रसंगाचे अभंग त्यांनी स्वत: रचलेले असल्यामुळे त्यावर तरी विश्वास ठेवायला काहीच अडचण नसावी आपल्याला.
कोणाला काय बरळायचंय, वाद घालायचाय, आधुनिक वैज्ञानिक व लोकशाही पद्धतीने मांडणी करायची आहे, त्यांनी ती खुश्शाल मांडीत बसावी, आम्हांला काहीही घेणे-देणे नाही. आमचा सार्थ विश्वास आहे की, तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेलेच !! तशीच आमच्या सर्व संतांची धारणा आहे व स्वानुभव देखील. त्यामुळे आम्ही वाजवून वाजवून सांगणार की, होय, आमचे महाभागवत श्री तुकोबाराय फाल्गुन शुद्ध द्वितीयेला सदेह वैकुंठाला गेले !!
आजही या द्वितीयेच्या मध्यान्ही देहूच्या इंद्रायणीगंगेच्या काठावरचा नांदुर्कीचा पुरातन पावन वृक्ष श्रीभगवंतांच्या आगमनाची शकुनलक्षणे जाणून सळसळतो, पक्षिराज गरुडाच्या विशाल पंखांच्या फडात्काराने वाहणा-या वा-याच्या तीव्र वेगाने आसमंत सुगंधित होतो, इंद्रायणीचा पुनीत काठही श्रीभगवंतांच्या दिव्य पदस्पर्शाने शहारतो, देवांना साक्षात् समोर पाहून, विश्व व्यापून उरलेल्या श्री तुकोबारायांचा कंठ आजही तितकाच दाटतो, त्यांचे थरथरणारे हात तेवढ्याच प्रेमावेगाने श्रीभगवंतांच्या चरणांना मिठी मारतात, नेत्रांतून अविरत वाहणारे आनंदबिंदू लक्ष्मीमातेने सेवन केलेले तेच पुण्यपावन श्रीचरण पुन्हा एकदा धुवून काढतात, श्रीभगवंतही आपल्या या लाडक्या सख्याला अत्यंत आनंदाने, अभिमानाने उराशी कवटाळतात; आणि तोच अलौकिक, अपूर्व-मनोहर, अद्वितीय वैकुंठगमन सोहळा पुन्हा एकदा नव्याने साकारतो; सनत्कुमारादी हरिपार्षदांच्या, चोखोबा-नाथ-नामदेवादी वैष्णववीरांच्या व लाखो भक्त-भाविकांच्या साक्षीने !
"तुकाराम तुकाराम " या कळिकाळालाही कापरे भरविणा-या महामंत्राचा प्रचंड गजर, गरुडाच्या फडात्कारात मिसळून जातो आणि आणि आमचे परमवंदनीय श्री तुकोबाराय भगवान श्रीपंढरीनाथांच्या करकमलांचा आधार घेऊन त्या दिव्य विमानी आरूढ होऊन कुडीसहितच वैकुंठाकडे प्रस्थान करतात. प्रत्यक्ष श्री तुकोबाच निर्याणप्रसंगीच्या एका अभंगात म्हणतात,
तुकीं तुकला तुका ।विश्व भरोनि उरला लोकां ॥तु.गा.३६०७.४॥
जेव्हा तराजू मध्ये घालून तुलना केली, तेव्हा श्री तुकोबा हे श्री भगवंतांच्या तुलनेत उतरले, तुक समान झाले. त्यांचे सर्व सद्गुण श्रीभगवंतांसारखेच ठरले; त्यामुळे तेही श्रीभगवंतांप्रमाणे विश्व व्यापून उरले, विश्वरूप झाले. या चरणातून वैकुंठगमनाची यौगिक प्रक्रियाच ते संकेताने सांगत आहेत. जे घडले व जसे घडले अगदी तसेच त्यांनी येथे नोंदवलेले आहे.
तुका म्हणे तुम्हां आम्हां हेचि भेटी ।उरल्या त्या गोष्टी बोलावया ॥तु.गा.३६२४.७॥ मागे राहिल्या त्या पावन कथा व अजरामर अभंग गाथा !
त्रिभुवनालाही परमपुनीत करण्याचे अद्भुत कृपावैभव अंगी मिरवणा-या, भक्त भाविकांना अमृतमय करणा-या श्री तुकोबांच्या चरित्रातील भावपूर्ण भक्तिकथा व श्री तुकोबांचे "अक्षर स्वरूप" असणारी ही गाथा हेच आमचे भांडवल व हेच आमच्या आध्यात्मिक प्रवासाचे अवीट पाथेय देखील ! त्याचाच प्रसन्न आस्वाद घेत, त्यानुसार वर्तन करीत, श्रीगुरुकृपेच्या बळावर आपली जीवननौका इंद्रायणीच्या काठावरील अमृतानुभव देणा-या 'अलंकापुरी'च्या "माउली"रूपी बंदरात कायमची विसावणे, हाच खरा 'बीजोत्सव' आहे आणि हीच सद्गुरु श्री तुकोबांना आम्ही वाहिलेली खरी श्रद्धा-सुमनांजली ठरणार आहे !!
आपला स्वानुभव सांगताना आत्मरूप झालेले, विश्वरूप झालेले जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात,
ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनीं ।भाग्य तरी ऋणी देव ऐसा ॥२॥धन्य म्हणवीन येह लोकीं लोकां ।भाग्य आम्हीं तुका देखियेला ॥तु.गा.३६०९.६॥तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम!