घराघरातील विवाह सोहळा सुरू होण्याआधी ज्येष्ठ कन्येच्या विवाहाला प्राधान्य दिले जाते. ही ज्येष्ठ कन्या म्हणजे आपल्या अंगणाची शोभा वाढवणारी तुळशी. श्रीकृष्णाशी तिचा विवाह लावून दिला, की त्या दोहोंच्या आशीर्वादाने घरातील शुभकार्याची सुरुवात होते.
तुळशी विवाहाची आख्यायिका :जालंदर असुराची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता होती. तिच्या पुण्यप्रभावामुळे तो देवांनाही अजिंक्य झाला होता. वृंदेला भ्रष्ट केल्याशिवाय जालंदरचा पराभव शक्य नाही, हे देवतांना कळून चुकले. म्हणून भगवान महाविष्णूंनी जालंदराच्या अनुपस्थितीत त्याचेच रूप धारण करून, त्याच्या महाली जाऊन वृंदेचे सत्व हरण केले. सती वृंदा हिच पुढे तुळशीरूपाने प्रगट झाली, तेव्हा तिचे महात्म्य वाढवण्यासाठी भगवान विष्णूंनी स्वत: तिच्याशी लग्न केले. त्या विवाहाची स्मृती म्हणून कार्तिक शुद्ध द्वादशीला तुलसी विवाह करतात.
तुलसी विवाहाची तारीख:कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुलसी विवाह करण्याचीप्रथा असली, तरी प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुलसी विवाह करतात. २५ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे. तिलाच प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी असेही म्हणतात. तिचा दुसरा दिवस द्वादशीचा. कार्तिक पौर्णिमेपर्यंत अर्थात त्रिपुरी पौर्णिमेपर्यंतच्या दिवसात तुलसी विवाह करता येतो. त्यातही काही शुभ मुहूर्त पुढीलप्रमाणे आहेत-
एकादशी प्रारंभ २५ नोव्हेंबर मध्यरात्री २.४५ पासून सुरूएकादशी समाप्त २६ नोव्हेंबर सकाळी ५.१० मिनीटांपर्यंतद्वादशी प्रारंभ २६ नोव्हेंबर सकाळी ५.१० मिनीटांपासूनद्वादशी प्रारंभ २७ नोव्हेंबर सकाळी ७.४६ मिनीटांपर्यंत
विवाहदिनी तुळशीवृंदावन स्वच्छ व सुशोभित करतात. त्यापुढे रांगोळी काढून बाळकृष्ण व तुळशी यांची एकत्र षोडशोपचार पूजा करतात. फराळ, मिठाईचा नैवेद्य दाखवतात. सनई-चौघडे लावतात. फटाके फोडतात. उपस्थितांना अक्षता वाटून रितसर लग्नविधी करून गुरुजी मंगलाष्टक म्हणतात. अशा थाटात विवाह लावला जातो. सर्वांना प्रसाद, फराळ किंवा खाऊ वाटप केला जातो.
हेही वाचा :Adhik Maas 2020: भगवान विष्णूंना आवडणारी आठ फुले कोणती?; सांगताहेत सुधा मूर्ती