नाशिक : दीपोत्सव पर्वाच्या अखेरच्या टप्प्यास कार्तिकी एकादशीपासून प्रारंभ होत आहे. कार्तिकी एकादशीनंतर दुसऱ्या दिवशी तुळशी विवाह साजरा करतात. ४ नोव्हेंबरला यंदा कार्तिकी एकादशी आहे. त्यानंतर ५ नोव्हेंबरला तुलसी विवाहास प्रारंभ होणार आहे. यंदा ५ ते ८ नोव्हेंबरपर्यंत तुळशी विवाहाचे मुहूर्त आहेत. (Tulsi Vivah 2022 Muhurat)
धार्मिक मान्यतांनुसार भगवान विष्णू चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर कार्तिकी एकादशीला निद्रावस्थेमधून पुन्हा जागे होतात आणि शुभ कार्यांना, लग्न समारंभांना सुरुवात केली जाते. कार्तिकी द्वादशी ते पौर्णिमेच्या दिवसापर्यंत तिन्ही सांजेच्या मुहूर्तावर तुळशीचे लग्न लावले जाते. तुळशीचे लग्न लावणाऱ्याला कन्यादानाचे पुण्य लाभते तसेच घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळतो, अशी धारणा आहे.
तुळशी विवाहाची पूजा पद्धत
> तुळशी विवाहासाठी पाटावर आसन टाकून तुळस आणि शाळीग्राम मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. पट्टभीवती ऊस किंवा केलुयाच्या पानांचा मंडप सजवून कलश ठेवला जातो. सर्वप्रथम कलश आणि गौरी गणेशाची पूजा करावी. त्यानंतर माता तुळशीला आणि भगवान शालिग्रामला धूप, दिवा, वस्त्र, माळा, फुले अर्पण करा.
> तुळशीला श्रृंगार आणि लाल ओढणी अर्पण केली जाते. असे केल्याने सुखी वैवाहिक जीवनाचा आशीर्वाद मिळतो. त्यानंतर तुलसी मंगलाष्टक पठण झाल्यावर भगवान विष्णू आणि तुळशीची आरती केली जाते.
८ नोव्हेंबरपर्यंत मुहूर्त
कार्तिक शुक्ल द्वादशीपासून तुलसी विवाह सुरू होतात. त्यामध्ये ५ नोव्हेंबरला या तुलसी विवाहाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते आणि ८ नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे तुलसी विवाह साजरे केले जातात. यंदा ८ नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा संध्याकाळी ४ वाजून ३१ मिनिटांनी संपणार आहे.
यंदा कार्तिकी पौर्णिमेला चंद्रग्रहण
या वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण ८ नोव्हेंबरला आहे. कार्तिक पौर्णिमेला हे चंद्रग्रहण आहे. हे या वर्षातील शेवटचे ग्रहण आणि दुसरे खग्रास चंद्रग्रहण राहणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"