Tulsi Vivah 2023: आषाढी एकादशीची देवशयनी एकादशी अशी ख्याती करणारा विठूराया कार्तिकी एकादशीला जागा होता. कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हटले जाते. ‘उठी उठी गोपाळा’ म्हणत देवाचे लाखो भक्त पंढरपुरात एकत्र होतात. कार्तिकी एकादशीनंतर द्वादशीपासून तुलसी विवाह प्रारंभ होतो. कार्तिकी पौर्णिमेस तुलसी विवाहाची समाप्ती होते. तुळशीला आपली लेक म्हणावयाची लोकपरंपरा आहे. अजूनही अनेक ठिकाणी मोठ्या कौतुकाने बाळकृष्णाच्या मूर्तीशी तुळशीचे लग्न लावले जाते. यंदा सन २०२३ मध्ये तुलसीविवाहारंभ कधीपासून आहे? यंदाचा शुभ मुहूर्त, जुळून आलेले अद्भूत योग आणि तुलसी विवाहाची आख्यायिका जाणून घेऊया...
भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये तुळशीला अनन्य साधारण महत्त्व आहे. तुळस ही केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची नसून, ती आरोग्यदायी मानली गेली आहे. तुळस अतिशय गुणकारी मानली गेली आहे. देशभरात तुळशी विवाह मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तुळशी विवाह विधी केल्यास वैवाहिक जीवनात आनंद मिळतो असे मानले जाते. तसेच तुलसीविवाहामुळे कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. एकादशी ते पोर्णिमा या काळात तुळशीचे लग्न पार पडते. दिवसभरात कधीही तुळशीचे लग्न लावता येते. काही ठिकाणी सकाळी, काही ठिकाणी सायंकाळी, तर काही ठिकाणी रात्री तुळशीचे लग्न लावतात.
तुलसी विवाहाचा शुभ मुहूर्त कोणता?
कार्तिकी एकादशी गुरुवार, २३ नोव्हेंबर २०२३ रोजी आहे. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून तुलसीविवाहारंभ होतो. शुक्रवार, २४ नोव्हेंबर २०२३ पासून तुळशीचे लग्न लावले जाईल. २७ नोव्हेंबर २०२३ रोजी कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह करता येऊ शकेल. कार्तिक शुद्ध द्वादशी २३ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्रौ ०९ वाजून ०२ मिनिटांनी सुरू होत आहे. तर, कार्तिक पौर्णिमा प्रारंभ रविवार, २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ०३ वाजून ५३ मिनिटांनी होईल आणि कार्तिक पौर्णिमा समाप्ती सोमवार, २७ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ०२ वाजून ४५ मिनिटांनी होणार आहे. तुलसी विवाह काळात सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग असे काही अद्भूत शुभ योग जुळून येत आहेत.
तुलसी विवाहाचे स्वरुप
घरातीलच कन्या मानून, तुळशी वृंदावनाची रंगरंगोटी करतात, सजवितात. कुटुंबातील कर्ता माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो. नंतर त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घालतो. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची वा धांड्याची खोपटी ठेवतात. पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात. त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून विवाह लावला जातो. कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी असा संकेत आहे. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे. या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची पद्धती आहे. काही ठिकाणी तुळशीची व बाळकृष्णाची वाद्यांच्या आणि फटाक्यांच्या दणदणाटात मिरवणूक काढली जाते.
तुलसीविवाहाची आख्यायिका
पौराणिक कथेनुसार, वृंदा नावाच्या एका मुलीचा विवाह असूरांचा राजा जालंधरशी लावण्यात आले होते. दुष्ट जालंधरचा पराभव करण्यासाठी वृंदेचे पावित्र्य मोडीत काढणे गरजेचे होते. भगवान विष्णू जालंधरचे रूप घेतले आणि तिचे पावित्र्य भंग केले. यानंतर महादेव असूरांचा राजा जालंधरचा वध केला. यानंतर वृंदा सती जाते. भगवान विष्णू या सर्व प्रकाराने मनोमन दु:खी झाले. वृंदा जिथे सती जाते, तिथे तुळशीचे रोप लावले. वृंदेवर केलेल्या अन्यायाचे परिमार्जन व्हावे म्हणून कृष्णावतारात रुक्मिणी म्हणून जन्मलेल्या वृंदेशी भगवंतांनी लग्न केले. तो दिवस कार्तिकी द्वादशीचा होता. आपण आता तो ‘तुळसी विवाह प्रारंभ’ म्हणून साजरा करतो. प्रत्येक घराच्या दारात तुळस असावी, असा संकेत पूर्वापार रूढ आहे. तुळशीला प्रदक्षिणा घालावी, तुळशीच्या लाकडाचे मणी करून त्यांची माळ गळ्यात घालावी इत्यादी अनेक मार्गांनी तुळशीला आपल्या दैनंदिन जीवनात सामावून घेतले गेले आहे.