Tulsi Vivah 2024: ज्याला नाही लेक। त्येनं तुळस लावावी। आपुल्या अंगनात। देव करावे जावाई ।। असा एका लोकगीताचा संदेश आहे. आषाढी एकादशीची देवशयनी एकादशी अशी ख्याती करणारा विठूराया कार्तिकी एकादशीला उठून नेहमीच्या कामावर रुजू होतो. त्या वेळी ‘उठी उठी गोपाळा’ म्हणत देवाचे लाखो भक्त पंढरपुरात एकत्र होतात. त्याच दिवशी तुलसी विवाह यास प्रारंभ होतो आणि कार्तिकी पौर्णिमेस तुलसी विवाहाची समाप्ती होते. तुळशीला आपली लेक म्हणावयाची लोकपरंपरा आहे. अजूनही अनेक ठिकाणी तिचे मोठ्या कौतुकाने बाळकृष्णाच्या मूर्तीशी लग्न लावले जाते. यंदा २०२४ मध्ये तुलसी विवाह कधीपासून प्रारंभ होत आहे? तुळशीचे लग्न लावण्याची परंपरा कधीपासून सुरू झाली? जाणून घेऊया...
नित्य वंदिता तुळसी । काळ पळे देशोदेशी ।। असाध्य रोगावर खात्रीचा, सुलभ, स्वस्त आणि अजिबात हानी न करणारा तुळशीचा गुण या सहा शब्दांत भावभक्तीच्या मंजिरीत बद्ध करण्यात आला आहे. तुळस हे दिसायला छोटे रोपटे असले, तरी भारतीय संस्कृती व परंपरांमध्ये तुळशीला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. तुळस विष्णूप्रिया किंवा हरिप्रिया असेही संबोधले जाते. तुळस अर्पण केल्याशिवाय केलेली विष्णूची पूजा व्यर्थ ठरते, असे पद्मपुराण सांगते. तुळशीची मंजिरी सर्व देवांची प्रतिनिधी मानली आहे. तुळस आरोग्यदृष्ट्याही अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे. तुळशीचे विविध गुणधर्म आयुर्वेदात सांगितले गेले आहे. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले, तेंव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले, त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला, असे मानले जाते.
यंदा तुळशीचे लग्न कधी? ‘अशी’ सुरु झाली परंपरा
यंदा सन २०२४ मध्ये १२ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असून, १३ नोव्हेंबरपासून तुलसीविवाहारंभ होत आहे. तर, १५ नोव्हेंबर रोजी तुलसीविवाह समाप्ती होत आहे. कार्तिकी एकादशीला सर्व मंगलकार्यांची सुरुवात केली जाते. तुलसी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय. या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात, त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे.
तुलसी विवाह मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो
भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये तुळशीला अनन्य साधारण महत्त्व आहे. तुळस ही केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची नसून, ती आरोग्यदायी मानली गेली आहे. तुळस अतिशय गुणकारी मानली गेली आहे. देशभरात तुळशी विवाह मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. काही ठिकाणी सकाळी, काही ठिकाणी सायंकाळी, तर काही ठिकाणी रात्री तुळशीचे लग्न लावतात.
तुलसी विवाहाची प्रचलित कथा
तुळस आणि तुळशीचा विवाह याबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. महापराक्रमी दैत्य जालंधर हा थोर पतिव्रता वृंदा हिचा पती. वृंदेचे पातिव्रत्य जोपर्यंत अढळ राहील, तोपर्यंत जालंधराला मृत्यू येणार नाही, असा त्याला वर मिळाला होता. दुष्ट जालंधरचा पराभव करण्यासाठी वृंदेचे पावित्र्य मोडीत काढणे गरजेचे होते. भगवान विष्णू जालंधरचे रूप घेतले आणि तिचे पावित्र्य भंग केले. यानंतर महादेव असूरांचा राजा जालंधरचा वध केला. यानंतर वृंदा सती जाते. वृंदा सती गेली. भगवान विष्णू या सर्व प्रकाराने मनोमन दु:खी झाले. देवांनी जिथे वृंदेचे दहन झाले होते तिथे तुळशीचे रोप लावले. वृंदेवर आपण केलेल्या अन्यायाचे परिमार्जन व्हावे म्हणून कृष्णावतारात रुक्मिणी म्हणून जन्मलेल्या वृंदेशी भगवंतांनी लग्न केले. तो दिवस होता कार्तिकी द्वादशीचा. आपण आता तो ‘तुळसी विवाह प्रारंभ’ म्हणून साजरा करतो.
तुळस अनेक रोगांवर गुणकारी औषधी
प्रत्येक घराच्या दारात तुळस असावी, असा संकेत पूर्वापार रूढ आहे. तुळशीला प्रदक्षिणा घालावी, तुळशीच्या लाकडाचे मणी करून त्यांची माळ गळ्यात घालावी इत्यादी अनेक मार्गांनी तुळशीला आपल्या दैनंदिन जीवनात सामावून घेतले गेले आहे. तुळस अनेक रोगांवर गुणकारी औषधी. वातावरणातील दूषित हवा शुद्ध करण्याच्या प्रभावी गुणात तर या सम हीच! त्वचा-रोगावर रामबाण, रक्तशुद्धीसाठी गुणकारी अशी तिची अनेकविध प्रकारची सद्गुणसंपदा आहे. म्हणूनच आपल्या पूजेत तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे.