समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेले मारुती स्तोत्र आणि संत तुलसी दासांनी लिहिलेले हनुमान चालीसा हे स्तोत्र आपण हनुमंताच्या उपासनेसाठी वापरतो. समर्थांनी बलोपासनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी गावोगावी हनुमंताची मंदिरे उभारली, व्यायामशाळा सुरु केल्या आणि तरुणांना स्फूर्ती चढावी म्हणून हनुमंताचे स्तोत्राची रचना केली, हे आपण जाणतोच, मग हनुमान चालीसा स्तोत्र निर्मितीमागेही काही कथा आहे का? ते आपण जाणून घेऊ! संत तुलसीदास यांच्या पुण्यतिथीनिमित्त ती कथा जाणून घेणार आहेत लेखक राहुल करूरकर यांच्याकडून!
जय हनुमान ज्ञान गुण सागर। जय कपिसतिहु लोक उजागर ॥रामदुत अतुलित बल धामा । अंजनीपुत्र पवनसुत नामा ॥
तुलसीदासांच्या आयुष्यात त्यांच्या साधनेतुन प्रभु श्रीराम व हनुमानाने बऱ्याचदा दर्शन दिले. अकबराने तुलसीदासजींवर मलाही रामाचे दर्शन घडवून द्या म्हणुन मागणी टाकली. अर्थात तुलसीदासजी म्हणाले की रामाची खरी भक्ती केल्याशिवाय दर्शन होणे शक्य नाही. मग अकबराने रागात तुलसीदासजींना तुरुंगात डांबले. तिथे तुरुंगात तुलसीदासांनी हनुमान चालीसा लिहीली. त्या चालीसेतील शेवटची ओळ जशी रचली गेली तसे संपुर्ण दिल्ली शहरात वानरांनी धुडगुस घालायला सुरवात केली. प्रकरण हाताबाहेर जातंय पाहुन शेवटी अकबरास लोकांनी सांगितले की हा हनुमानाचा कोप दिसतोय व नंतर त्याने तुलसीदासांना सोडवले. व तुलसीदासांना वानरांना शांत करण्याची विनंती केली. तर अशी रचली गेली हनुमान चालिसा.
हनुमान हे शक्ती सामर्थ्य बुद्धि चे प्रतिक आहे. अहिंसेचे व्रत अंगिकारण्यापूर्वी बलोपासना आवश्यक आहे. कारण क्षीण मनुष्याचे अहींसेचे व्रत हे दुर्बलतेचे लक्षण असु शकते. यामुळे तुम्हाला शांती प्रस्थापित करायची असेल तरीही हनुमानाची साधना आवश्यकच आहे.
विवेकानंदांचे यावर भाष्य फार खोलवर विचार करायला लावणारे आहे. जेव्हा शिष्याने विचारले की मला शांती मिळत नाहीये (I am not able to find peace) काय करु? तेव्हा विवेकानंदांनी स्पष्ट शब्दात सांगितले की search for strength, seek strength & you will find peace. शक्तीचा शोध घे, शक्तीची साधना तुला शांती मिळवून देईल. या शक्तीचे साक्षात रुप असलेल्या हनुमानाची आपल्यावर सदैव कृपा असो!