गुरुंचे गुरु परात्पर गुरु म्हणजे दत्तगुरु, त्यांनीही कलियुगात अवतरून गुरु केले. एक दोन नाही तर चोविस गुरु. त्या गुरुंकडून ते काय शिकले, ते जाणून घेत आपणही देवदत्त परुळेकर यांच्या एका जनार्दनी कथामालेतून चोविस गुरुंचा आजपासून थोडा थोडा परिचय करून घेऊया. जेणेकरून आपल्यालाही पदोपदी जेव्हा गुरुंची उणीव भासेल, त्यावेळेस दत्तगुरुंची गुरुभक्ती आठवून आपल्यालाही गुरुंचा शोध घेता येईल.
तू ब्रह्मवेत्ता ब्राह्मण, निजानंदे परिपूर्णत्या आनंदाचे कारण, विशद करून सांगावे।तू देही वर्तसी विदेहस्थिती, तुज विषय आतळू न शक्ती,हे अलिप्तपणाची प्राप्ती, कवण्या रीती तुज झाली।तुज नाही रायाची भीड, न करीसी धनवंताची चाड,दीनवचन मानिसी गोड, पुरविसी कोड निजबोधे।ऐसा केवळ तू कृपाळू, आर्तबंधू दीनदयाळू,निजात्मभावे तू केवळु, भक्तवत्सलु भावार्थे।
हे अवधूता, तू ब्रह्मवेत्ता असून आत्मानंदाने परिपूर्ण आहेस. त्या आनंदाचे कारण काय? तू देहात असून विदेहास्थितीने वागतोस. दृष्यविषय तुला स्पर्शसुद्धा करू शकत नाहीत. धनवंताची चाड नाही. दीनांचे भाषण मात्र तू गोड मानतोस आणि आत्मज्ञान देऊन तू त्यांचे मनोरथ पूर्ण करतोस. तू आर्तबंधू व दीनदयाळ आहेस. ज्यांचा भाव शुद्ध असतो, त्यांना भक्तवत्सल आहेस. म्हणून आत्मज्ञानाचे गूढ मला समजावून सांग.
अवधूताने राजाच्या प्रश्नांना उत्तर देताना सबंध विश्वाला गुरुरुपाने पहावे असा अत्यंत महत्वाचा सिद्धांत सांगितला. हे विश्व भगवंताचेच व्यक्तस्वरूप आहे. त्यातील प्रत्येक वस्तूमध्ये तो गुणरुपाने विलसत आहे. तो गुण शोधून त्याला गुरु बनवा. अशी स्वत:मध्ये व जगामध्ये असार टावूâन सार शोधून काढणारी बुद्धी तिला सद्बुद्धी म्हणातात.
अवधूताचा हा उपदेश केवळ पारमार्थिक साधकालाच नव्हे तर प्रत्येकालाच उपयुक्त आहे. आज सर्व शिक्षणतज्ञ बीन भिंतीच्या उघड्या शाळेचा आग्रह धरतातेत. शिक्षण शाळेतून बाहेर यायला हवे. बाहेरच्या खुल्या जगात उघड्या डोळ्यांनी आणि मोकळ्या मनाने बुद्धीने पाहिले तर खूप काही शिकता येण्यासारखे आहे.
जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु म्या केला जाणगुरुसी आले अपारपण, जण संपूर्ण गुरु दिसेज्याचा गुण घेतला, तो सहजे गुरुत्वा आलाज्याचा गुण त्यागरूपे घेतला, तोही गुरु झाला अहितत्यागे
दत्तगुरूंनी तसे तर अगणित गुरु केले. ते म्हणतात, ज्याचा गुण मी घेतला, तो माझा गुरु झाला, परंतु ज्यांच्यातील दोष पाहून मी त्या दोषाचा त्याग केला तो देखील माझा गुरु झाला. पैकी मुख्यत्वे गुरु कोणकोणते ते लेखमालेत पाहू.
हेही वाचा : ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा बहुमूल्य विचार!