इगो आणि सॉरी. हे दोन शब्द आता बऱ्यापैकी मराठमोळे झालेत असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. पैकी पहिला शब्द इगो नातं तोडू शकतो आणि दुसरा शब्द सॉरी नातं जोडू शकतो. तुम्ही कोणत्या शब्दाची निवड कराल? सॉरी हा शब्द दिसायला सोपा वाटत असला तरी अनेकांना तो उच्चारताना खूप त्रास होतो.
आजच्या जगात लोक नात्यापेक्षा स्वतःचा इगो अर्थात अहंकार जपण्याला प्राधान्य देत आहेत. म्हणूनच जग दुरावत चालले आहे. मात्र अजूनही काही लोक शिल्लक आहेत, जे स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून नाते जपण्यासाठी झुकते माप घेतात.
नाते महत्त्वाचे की अहंकार? मीच का? तो का नाही? या वादातून आपण आपला ताठ बाणा जपतो पण नात्याचा कणा मोडतो. दुसऱ्याचा अहंकार सुखावेल, आपल्याला कमीपणा येईल किंवा आपणच चुकीचे होतो असा समोरच्याचा समज होईल या विचाराने आपण झुकणे टाळतो. त्यामुळे दोन्ही बाजूंनी ताण कायम राहतो आणि अधिक ताण पडून नाते तुटते. यासाठीच एकाने ताणून धरल्यावर दुसऱ्याने ढील देण्याची कला आत्मसात करायला हवी.
सॉरी हा छोटासा शब्द, पण तो म्हणताना अनेकांची जीभ जड होते. इगो दुखावतो. पण जेव्हा तुम्ही एखादे नाते टिकावे म्हणून स्वतःकडे झुकते माप घेऊन मनापासून सॉरी म्हणता, तेव्हा नाते अधिक घट्ट होते. आपल्याला वाटते की समोरच्याला आपली कदर नाही. आपण घेतलेल्या कमीपणाची जाणीव नाही. पण तसे नसते. कोणी बोलून दाखवले नाही, तरी प्रत्येकाला या गोष्टीची जाणीव नक्की होते. आणि दुसऱ्याने आपली दखल घेवो न घेवो तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहिल्याचा आनंद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.
इगो जपणाऱ्या माणसांची जगात कमतरता नाही. गरज आहे ती इगो बाजूला ठेवून माणसं जोडणाऱ्या लोकांची. आपल्याला दुसऱ्या गटात सामील व्हायचे आहे. लक्षात ठेवा, जो नाती जपतो त्याला देवही जपतो. चांगले कर्म करत राहा त्याचे चांगले फळ आज ना उद्या तुम्हाला नक्की मिळेल.