Swami Samarth Maharaj And Siddhivinayak Temple Katha: मुंबईतील श्रीसिद्धिविनायक मंदिर अतिशय प्रसिद्ध, लोकप्रिय आणि श्रीमंत देवस्थानांपैकी एक आहे. हजारो भाविक दररोज सिद्धिविनायकाचे दर्शन घ्यायला येत असतात. मुंबईत राहणाऱ्यांना किंवा मुंबईची ओळख असलेल्यांना दादर येथील सिद्धिविनायक मंदिर माहिती नाही, असे होणारच नाही. मुंबईत फिरण्यासाठी, पर्यटनासाठी किंवा अगदी कामासाठी येणाऱ्या व्यक्ती सिद्धिविनायकाचे दर्शन वेळात वेळ काढून घेतात. सिद्धिविनायक मंदिराला एक वेगळी अध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. ब्रह्मांडनायक असलेल्या स्वामी समर्थ महाराजांची आणि मुंबईतील श्रीसिद्धिविनायकाची एक कथा सांगितली जाते. मुंबईपासून इतक्या लांब अंतरावर असलेल्या अक्कलकोटमध्ये राहणाऱ्या स्वामी समर्थ महाराजांचा नेमका कोणता योग जुळून आला? जाणून घ्या...
अक्कलकोट स्वामी आणि रामकृष्ण जांभेकर महाराज यांच्यात अन्य भक्तांपेक्षा अतिशय भिन्न नाते होते. असेच एकदा स्वामी आणि जांभेकर महाराज रात्री बोलत असताना अचानक, रामकृष्णा, तुला काय हवे?, अशी विचारणा स्वामींनी केली. प्रत्यक्ष ब्रह्मांड आपल्या हातात गोटीसमान धारण करणारे परब्रह्म देण्यासाठी समोर असताना जांभेकर महाराजांनी स्वतःसाठी काहीच मागितले नाही. ते स्वामींना म्हणाले की, स्वामी मला काही नको. तुम्हाला काही द्यायचे असल्यास माझ्या सिद्धिविनायकाला आपण वैभव द्या.
स्वामींनी अतिशय प्रसन्न मनाने शुभाशिर्वाद दिले
रामकृष्णबुवांची इच्छा ऐकून स्वामी महाराजांना फार आनंद झाला. लाडक्या शिष्याने स्वतःसाठी काही न मागता ईश्वरासाठी मागितले. ईश्वराला वैभव दिल्याने त्या ठिकाणी येणारे भक्त वाढतील आणि तो वैभवसंपन्न ईश्वरच भक्तांना कलियुगाच्या अंतापर्यंत साथ देत राहील. एका इच्छेत दोन गोष्टी साध्य होणार होत्या. ही कल्पना स्वामींना अतिशय आवडली. स्वामींनी रामकृष्णबुवांना आशीर्वाद दिला आणि म्हणाले की, तुझ्यासारखा शिष्य लाभला हे भाग्य आहे. मुंबईला गेल्यावर मंगळवारी प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला जा. तिथे तू मंदार वृक्षाचे रोपटे लाव. मंदार वृक्ष इंचाइंचाने वाढेल, तसे सिद्धिविनायकाचे वैभव वाढेल. ज्या दिवशी मंदार बहरेल, त्या दिवशी सिद्धिविनायक वैभवाने बहरलेला असेल. स्वामींनी अतिशय प्रसन्न मनाने शुभाशिर्वाद दिले.
रामकृष्णबुवांनी सिद्धिविनायकाकडे आशिर्वचन मागितले
रामकृष्णबुवा प्रभादेवीला आले. प्रथम त्यांनी मंगळवारी मंदाराचे रोपटे सिद्धिविनायक देवळात लावले आणि त्या ठिकाणी हात जोडून उभे राहिले. स्वामी मी माझे काम केले. आता तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा, अशी प्रार्थना त्यांनी केली. हात जोडून म्हणाले की, हे गजानना, स्वामींनी दिलेला शब्द खरा ठरो आणि तुला या जगात वैभव प्राप्त होवो. या वैभवाच्या झगमगाटाने तुझ्याकडे भक्त आकर्षित होवोत व त्या सर्व भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, असे आशिर्वचन रामकृष्णबुवांनी सिद्धिविनायकाकडे मागितले.
स्वामींनी लाडक्या भक्ताची पूर्ण केली
स्वामींचा आशीर्वाद खरा ठरला. जांभेकर महाराजांनी मागितलेले वैभव सिद्धिविनायकाला प्राप्त झाले. त्यांनी लावलेला मंदार वृक्ष जसा जसा बहरत गेला, तसे सिद्धिविनायकाला वैभव प्राप्त झाली आणि त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. स्वामींनी आपल्या लाडक्या भक्ताची पूर्ण केली. स्वामी आशीर्वादाने मंदिर प्रासादिक झाले व भक्त कामकल्पद्रुम झाले हे मानण्यास हरकत नाही, अशी एक कथा सांगितली जाते.