आताच्या घडीला देशभरातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते प्रचारात व्यस्त आहेत. मात्र, पाच राज्यांपैकी अवघ्या देशाचे लक्ष उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांकडे (UP Election 2022) लागलेले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. योगी आदित्यनाथ सरकार आणि भाजपवर विरोधक जोरदार निशाणा साधत असून, टीकाकारांना प्रत्युत्तर देऊन आरोप-प्रत्यारोपांचा सामना अधिक रंगतदार होत चालल्याचे पाहायला मिळत आहे.
या सगळ्या निवडणुकीच्या रणधुमाळीत विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुन्हा सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरणार का, हाच मुद्दा राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चिला जात आहे. अनेक निवडणूक पूर्व निकालांनुसार, भाजप सत्ता राखू शकेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री बनू शकतील का, योगी आदित्यनाथ यांची जन्मकुंडली काय सांगते, ते जाणून घेऊया...
योगींनी २१ व्या वर्षी घेतला सन्यास
मिळालेल्या माहितीनुसार, योगी आदित्यनाथ यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील पौडी गडवाल येथे ०५ जून १९७२ रोजी झाला. योगी आदित्यनाथ यांच्या जन्मकुंडलीनुसार, त्यांची लग्न रास सिंह आहे. कुंडलीतील सप्तम भावातील चंद्र केमद्रुम योगात असून, शनीच्या दृष्टीमुळे सन्यास योग जुळून येत आहे. दशम स्थानातील शनीच्या महादशेमुळे योगी आदित्यनाथ यांनी वयाच्या २१ व्या वर्षी सन्यास घेतला. चंद्र रास कुंभ असलेल्या योगी आदित्यनाथ यांनी वयाच्या २६ वर्षी राजकारणात सक्रीय होत १९९८ मध्ये निवडणूक लढवून थेट लोकसभेत पोहोचले. शनीच्या महादशेचे शुभ फळ योगी आदित्यनाथ यांना या काळात मिळाल्याचे सांगितले जाते.
केतुची महादशा आणि मुख्यमंत्री पद
सन २०१७ मध्ये दशम भावातील बुधची महादशा आणि त्यातच सुरू झालेली शनीची अंतर्दशा यांमुळे भाजपमधील अनेक दिग्गजांना मागे टाकत योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. मात्र, नोव्हेंबर २०१७ पासून कुंडलीतील बाराव्या स्थानी असलेल्या केतुची महादशा सुरू झाली आहे. या केतुवर शनीची थेट दृष्टी पडल्याने आक्रमकता आणि तीक्ष्ण वाणी यांमुळे योगी आदित्यनाथ अनेकदा वादात सापडल्याचे पाहायला मिळाले आहे.
गुरु अंतर्दशेचा शुभ लाभ मिळणार!
वर्तमानातील केतुच्या महादशेत नोव्हेंबर २०२१ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत गुरुची अंतर्दशा सुरू असून, हा कालावधी योगी आदित्यनाथ यांच्यासाठी शुभफलदायक तसेच लाभाचा असल्याचे सांगितले जात आहे. पंचमातील धनु राशीतील गुरु नवांश कुंडलीत कर्क राशीत आहे. कर्क राशीत गुरु उच्च होतो. मात्र, दशानाथ केतुपासून गुरु सहाव्या स्थानी येत असल्यामुळे उत्तर प्रदेशची ही निवडणूक योगी आदित्यनाथ यांच्यासाठी सोपी नक्कीच नसेल. विरोधकांची जबरदस्त टक्कर भाजप आणि योगी आदित्यानाथ यांना असेल. मात्र, कुटनीती, मुसद्देगिरी आणि योग्य खेळी यांमुळे सत्ता वाचवण्यात त्यांना यश येऊ शकेल. मात्र, सत्ता स्थापन करण्यासाठी काही पक्षांची मदत घ्यावी लागेल, असे सांगितले जात आहे.