शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
2
'१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी
3
अभिनेता टायगर श्रॉफच्या हत्येसाठी २ लाखाची सुपारी दिल्याचा दावा; एकावर गुन्हा दाखल
4
ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय
5
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?
6
रियल इस्टेटचा 'खिलाडी' बनला अक्षय कुमार, २ अपार्टमेंटमधून केलेली बंपर कमाई; आता कोणाला कोट्यवधींना विकलं ऑफिस?
7
"हे आज धर्म, जात शिकवायला आलेत", 'फॅण्ड्री'मधल्या शालूने ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर
8
कोण होणार ख्रिस्ती धर्मीयांचा पुढचा पोप? ही पाच नावं शर्यतीत आघाडीवर
9
'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा
10
मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; शुभांगी अत्रेच्या Ex पतीचं निधन, अडीच महिन्यांपूर्वीच झालेला घटस्फोट
11
RBI नं १० वर्षांच्या वरील मुलांसाठी बँक अकाऊंटचे नियम बदलले, खातं उघडण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती
12
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
13
भाजपाला शह देण्याची एकनाथ शिंदेंची रणनीती; नवी मुंबईतले १२ माजी नगरसेवक शिंदेसेनेत येणार
14
ज्येष्ठांसाठी बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
15
ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, आपत्कालीन स्लाइड्स वापरून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले
16
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
17
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
18
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
20
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण

Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशी: ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधिसोहळ्याची कार्तिकी आळंदी वारी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 15:05 IST

Utpanna Ekadashi 2024: आज उत्पत्ती एकादशी, आजची तिथी पापमुक्त करणारी एकादशी म्हणून ओळखली जाते, तशीच कार्तिकी आळंदी वारीसाठीही ओळखली जाते.

>> रोहन उपळेकर

अलं ददाति इति आलन्दि । अशी आळंदी शब्दाची फोड आहे. जी पुरे म्हणेपर्यंत देते ती आळंदी  ! अहो, भगवान श्री ज्ञानराय तर महान अवतार आहेतच, पण त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आळंदी नगरी देखील "जो जे वांच्छिल तो ते लाहो ।" हा श्री माउलींचाच अमृत-शब्द गेली साडेसातशे वर्षे पूर्ण करीत आलेली आहे. साक्षात् श्रीभगवंतांचेच अभिन्न स्वरूप असणाऱ्या श्री माउलींसारखेच अगाध व अचाट सामर्थ्य, त्यांचे चिरंतन अस्तित्व लाभल्याने ही अलौकिक नगरी देखील सर्वार्थाने अंगोअंगी मिरवीत आहे. प्रत्यक्ष श्री माउलींच्या एकमेवाद्वितीय संजीवन समाधीचे अधिष्ठान-माहेर लाभल्यास काय होणार नाही ? ज्यांच्या दारातला पिंपळही प्रत्यक्ष सुवर्णाचा आहे, त्या कैवल्यसाम्राज्यचक्रवर्ती भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या कृपासाम्राज्यात तर उणेपणाच कायमचा उणावलेला आहे  !!

आज आळंदीची कार्तिकी वारी. उत्तररात्री पवमानपंचसूक्ताच्या अभिषेकाने उत्सवास सुरुवात होते. दुपारी श्री माउलींची पालखी नगर परिक्रमेस बाहेर पडते व हजेरी मारुती मंदिरात सर्व दिंड्यांच्या हजेऱ्या होऊन पालखी सोहळा पुन्हा मंदिरात परत येतो. द्वादशीला श्री माउलींची रथातून मिरवणूक निघते व गोपाळपुऱ्यापासून फिरून परत येते. त्रयोदशीला श्री माउलींचा समाधिउत्सव साजरा होतो. वारकरी संप्रदायात या उत्सवाला अतिशय महत्त्व आहे !  

आळंदीचा व तिचे अक्षय अधिष्ठान असलेल्या श्री माउलींचा महिमा गाताना सर्व संत वेडावून जातात. श्रीसंत तुकोबाराय श्री माउलींविषयीच्या अत्यंत जिव्हाळ्याने, आळंदी क्षेत्री येऊन मनोभावे घेतलेल्या श्री माउलींच्या समाधिदर्शनाचे फल सांगताना शपथपूर्वक म्हणतात, 

चला आळंदीला जाऊं ।ज्ञानदेवा डोळां पाहूं ॥१॥होतील संतांचिया भेटी ।सुखाचिया सांगों गोष्टी ॥२॥ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ।मुखीं म्हणतां चुकती फेर ॥३॥तुम्हां जन्म नाहीं एक ।तुका म्हणे माझी भाक ॥४॥

अशा या परमपावन आळंदी तीर्थक्षेत्राचे आजचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण साक्षात् भगवान श्रीपांडुरंगांनीच स्वमुखे नामदेवरायांना सांगितले आहे की, "कार्तिक शुद्ध एकादशी माझी तर कृष्ण एकादशी ज्ञानोबांची. आम्ही कार्तिकातल्या कृष्ण एकादशीला कायम आमच्या लाडक्या ज्ञानोबांच्या सोबतच असू !" श्रीभगवंतांचे हे अलौकिक माउली-प्रेम पाहून श्री नामदेवराय हर्षोत्फुल्ल होऊन धन्योद्गार काढतात, 

धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार ।धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी ॥१॥धन्य भागीरथी मनकर्णिका वोघा ।आणिक हो गंगा त्रिवेणी त्या ॥२॥धन्य ऋषीश्वर धन्य पांडुरंग ।मिळालें तें सांग अलंकापुरी ॥३॥नामा म्हणे धन्य भाग्याचे हें संत ।झाला पहा एकांत ज्ञानोबाचा ॥४॥

"कार्तिक कृष्ण अष्टमीपासून ते त्रयोदशीपर्यंत जो कोणी माझ्या परमप्रिय श्री ज्ञानराज माउलींचे स्मरण, वंदन, पूजन, भजन, नमन, चरित्रगायन व नामस्मरण करेल, त्याच्यावर मी प्रसन्न होईन !" असा प्रत्यक्ष आनंदकंद भगवान श्रीपंढरीनाथांचाच आशीर्वाद आहे. म्हणूनच आजपासून त्रयोदशीपर्यंत सद्गुरु भगवान श्री माउलींच्या संजीवन समाधीस वारंवार साष्टांग दंडवत घालून आपण त्यांचे यथाशक्ती प्रेमभावे स्मरण करू या.  

सद्गुरु श्री माउलींचे प्रिय भक्त प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांनी रचलेल्या 'श्रीज्ञानदेवाष्टका'मध्ये त्यांनी मोठ्या प्रेमादराने श्री माउलींचे समग्र चरित्र सुंदर शब्दांत गायिलेले आहे. या पावन कालात त्या प्रासादिक स्तोत्राचे प्रेमपूर्वक वाचन, चिंतन करून आपणही भगवान श्रीपंढरीश परमात्म्याचे शुभाशीर्वाद प्राप्त करून घेऊ या व धन्य होऊ या  !! 

॥ श्रीज्ञानदेवाष्टकम् ॥

महिंद्रायणीचे तटी जे आळंदी ।दुजी पंढरीक्षेत्र लोकी प्रसिद्धी ।असा घेतला तेथ जेणे विसावा ।नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥१॥पिता विठ्ठल विख्यात रुक्माई माता ।दयाशील दांपत्य नाही अहंता ।तये पोटी न कां जन्म हा घ्यावा ।नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥२॥कलीमाजी तारावया भाविकांना ।सुविख्यात ज्ञानेश्वरी ग्रंथ केला ।समाधान जो देई गीतार्थ जीवा ।नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥३॥चमत्कार नाना जगी दावियेले ।पशूच्या मुखे वेदही बोलविले ।असे थोर आश्चर्य वाटेचि जीवा ।नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥४॥द्विजाच्या घरी श्राद्धकाळी जिवंत ।करी जेववी पूर्वजाते समस्त ।मुखी घालती अंगुली लोक तेव्हा ।नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥५॥अगा व्याघ्रयाने वृथा खेळताहे ।पहा भिंत निर्जीव ही चालताहे ।असे दाखवी लाजवी चांगदेवा ।नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥६॥नसे द्वैतबुद्धी दया सर्वभूती ।अशी देखिली ती संतमूर्ती ।नसे साम्य लोकी जयाच्या प्रभावा ।नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥७॥महायोगी लोकी ऐसी प्रसिद्धी ।आळंदीपुरी तोचि घेई समाधी ।अशा ते न कां विश्वरूपी म्हणावा ।नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥८॥वदे भक्तीने नित्य या भाविकांसी ।भवाब्धि भये बाधिती ना तयासी ।म्हणे दास गोविंद विश्वास ठेवा ।नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥९॥

इति सद्गुरु श्री गोविंदकाका उपळेकर महाराज विरचितम् श्रीज्ञानदेवाष्टकम् संपूर्णम् ।

टॅग्स :sant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरAlandiआळंदी