Vaikuntha Chaturdashi 2023: भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये अनेक पंथ, संप्रदाय असल्याचे पाहायला मिळते. प्रत्येक संप्रदाय आपापल्या आराध्याची उपासना, नामस्मरण करत पंथ, संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करत असतो. यापैकी शैव आणि वैष्णव संप्रदाय यांना वेगळे महत्त्व असल्याचे म्हटले जाते. भगवान शिवाची पूजा करणारे शिवभक्त आणि विष्णू अर्थात भगवान श्रीकृष्णांची भक्ती करणारे वैष्णव यांच्यात आपापल्या इष्ट दैवतांच्या श्रेष्ठत्वाबद्दल पूर्वी नेहमी वाद-विवाद होत असल्याचे पाहिले आहे. मात्र, या दोघांना एकत्र आणणरा दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध चतुर्दशी. यालाच वैकुंठ चतुर्दशी असेही म्हटले जाते. हा दिवस हरिहराचा पूजनासाठी आत्यंतिक विशेष मानला जातो. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी श्रीविष्णू आणि महादेव यांचे पूजन केले जाते. याबाबत अनेक आख्यायिका, कथा सांगितल्या जातात.
यंदा सन २०२३ रोजी रविवार, २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ०३ वाजून ५३ मिनिटांपर्यंत वैकुंठ चतुर्दशी आहे. या तिथीला ब्रह्ममुहूर्तावर महाविष्णूंनी वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर स्नान केले होते. भगवान शंकरांची प्रार्थना केली होती. त्या पूजेने भोलेनाथ एवढे प्रसन्न झाले. महादेवांनी प्रत्यक्ष हरीची भेट घेतली आणि प्रसन्न होऊन वर दिला की, यादिवशी जे विष्णू भक्त किंवा शिव भक्त मनोभावे भगवंताची आळवणी करतील, त्यांना वैकुंठप्राप्त होईल. आयुष्यभर हालअपेष्टा सहन केल्यानंतर मृत्यूपश्चात तरी आत्म्याला सद्गती मिळावी, असे प्रत्येकाला वाटते. ती वाट सुकर व्हावी, म्हणून आपण आयुष्यभर चांगले आचरण करतो आणि त्याला आध्यात्मिक जोड मिळावी, म्हणून व्रत-वैकल्य करतो. वैकुंठ चतुर्दशीचे व्रत ही त्यापैकीच एक!
वैकुंठ चतुर्दशीचे व्रताचरण कसे कराल?
वैकुंठ चतुर्दशीला श्रीविष्णू आणि महादेव यांच्या पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णू आणि शंकराची चौरंगावर स्थापना करावी. हरिहराचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णू आणि शंकराची आरती करावी. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. याशिवाय, रुद्र, शिवमहिम्न स्तोत्र, शिवस्तुती यांचे पठण किंवा श्रवण करावे. यथाशक्ती ॐ नम: शिवाय तसेच श्रीविष्णूंच्या ॐ नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. काही मान्यतांनुसार, वैकुंठ चतुर्दशीच्या आदल्या रात्री श्रीविष्णू तर दुसऱ्या दिवशी सकाळी महादेव शंकाराचे पूजन केले जाते.
वैकुंठ चतुर्दशी म्हणजे हरिहरांचा कृतज्ञता सोहळा
आषाढी एकादशीला भगवान महाविष्णू झोपतात, ते थेट कार्तिकी एकादशीला उठतात, असे म्हटले जाते. विष्णूंच्या अनुपस्थितीत त्यांची वैश्विक जबाबदारी भगवान शंकर सांभाळतात. याबद्दल कृतज्ञता म्हणून श्रीविष्णू महादेवाला फळे, फुले आणि बेल वाहतात, तर महादेव विष्णूंना प्रिय असलेली तुळशी वाहून जागे करतात. हे हरीहर ऐक्य, प्रेम, सद्भावना, एकमेकांप्रती आदर या भेटीतून दिसून येतो. तो आदर्श आपणही डोळ्यासमोर ठेवून आपण दोहोंची उपासना करावी, हा वैकुंठ चर्तुदशी मागील हेतू आहे. वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरी-हर स्तोत्र म्हणतात. अन्यथा विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात. इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो, परंतु या भेटीचे आगळे वेगळे महत्त्व म्हणून अशी पूजा केली जाते.