अमावस्या या तिथीला अनेक जण अशुभ मानतात. उलट तसे मानण्याचे काहीच कारण नाही. निसर्ग हा आपल्या आयुष्याचे प्रतिबिंब दर्शवतो. जगण्याला उम्मेद देतो. ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र आल्हाददायक वाटतो, तसा बीजेचा चंद्र शीतल वाटतो. अमावस्येला तो नाहीसा होतो. कलेकलेलने वाढत जाणे आणि कलेकलेने कमी होत जाणे हा नियम जसा निसर्गाला आहे तसा मानवालासुद्धा आहे, हे आपल्याला अमावस्येची रात्र शिकवते!
ज्याप्रमाणे कोणीही मनुष्य एका रात्रीत प्रसिद्ध होत नाही आणि झालाच तर ती प्रसिद्धी फार काळ टिकत नाही. मात्र कलेकलेने ज्यांची प्रगती होते ते एक ना एक दिवस पौर्णिमेच्या चंद्रासारखे आकाश व्यापून टाकतात. सर्वांचे लक्ष वेधून घेतात. मात्र ही स्थिती देखील फार काळात राहत नाही. कलेकलेने चन्द्र अस्त पावतो आणि अमावस्येला नाहीसा होतो, तसेच मनुष्याचेही होते. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचून आल्यानंतरही ही निवृत्तीची अवस्था माणसानेही मोठ्या मनाने स्वीकारली पाहिजे.
सूर्याच्या अनुपस्थितीत चन्द्र पृथ्वीला प्रकाश देण्याचे काम करतो. सूर्य दिवस- रात्र तळपत राहिला असता तर आपल्याला जगणे असह्य झाले असते. सूर्य-चन्द्र दोघेही महत्त्वाचे. सुदैवाने आपल्या देशातून दोहोंचे नियोजित वेळी दर्शन होते. ज्या देशांमध्ये सहा सहा महिने सूर्यदर्शनच होत नाही, त्यांची स्थिती विचारा! त्यामुळे सूर्याची प्रखरता जेवढी महत्त्वाची तेवढीच चंद्राची शीतलताही महत्त्वाची! सुर्याइतके तेज नसले तरी चंद्राचे येणे हवेहवेसे वाटते. त्याच्या उगवण्याने सकल जीवांना काही काळ शांतता लाभते. रात्रीच्या अंधारात चंद्राचे शीतल चांदणे पथदर्शक ठरते. मात्र अमावस्येच्या रात्री मिट्ट अंधारात पाऊल टाकणे भयावह वाटते. ती भयाण रात्र कोणत्याही विपरीत घटनांशिवाय पार पडावी यासाठी आपल्या पूर्वजांनी अमावस्येच्या रात्री धार्मिक कृत्यांचा आग्रह धरला आहे. त्यानिमित्ताने जागृत राहणे हे अपेक्षित असते.
आता सर्वत्र वीज आल्याने पौर्णिमा- अमावस्या आपल्याला सारख्या वाटतात. मात्र ग्रामीण भागात आजही लोक निसर्गचक्रावर विसंबून आहेत. एवढेच काय तर शहरी माणसाचाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निसर्गाशी संबंध येतच असतो. चंद्राच्या तिथीवर समुद्राची भरती ओहोटी अवलंबून असते आणि एवढेच काय तर महिलांचे निसर्ग चक्र, मानसिक स्थिती यांचाही चन्द्र तिथीशी घनिष्ट संबंध असतो. हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. पौर्णिमेच्या दिवशी प्रसन्नवदनीं असणारी गृहिणी अमावस्येला चिडचिडी, रागीट, भांडखोर असल्यासारखी जाणवते, ते निसर्ग चक्रामुळेच! प्रकृती आणि स्त्री यांचा जवळचा संबंध असल्याने निसर्गाचे पडसाद स्त्री मनावर चटकन उमटतात. या सर्व गोष्टी भौगोलिक दृष्ट्या सिद्ध झालेल्या आहेत. म्हणून धर्मानेही त्यांना अनुष्ठान दिले आहे.
म्हणून अमावस्येला अशुभ न मानता, त्या रात्री सूर्य आणि चन्द्राच्या अनुपस्थितीत आपले मन चांगल्या विचारांनी कसे प्रकाशित होईल यादृष्टीने आपण विचार आणि कृती केली पाहिजे. तसेच अमावस्येच्या तिथीला अशुभ न मानता आपल्या मनातल्या अंधःकारावर प्रकाश टाकला पाहिजे!