आपल्या येथे प्रत्येक सण, उत्सव यामागे विशेष कथा, परंपरा आहे. आधीच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे माहितीचे हस्तांतरण होते. परंतु, जेव्हा काही गोष्टींचा आगापिछा आपल्याला माहीत नसतो, तेव्हा आपण आधार घेतो, ग्रंथांचा. वैशाख अमावास्येबाबतीतही अधिक जाणून घेण्यासाठी ज्योतिर्भास्कर जयंत साळगावर लिखित 'धर्मबोध' या ग्रंथाचा आधार घेतला आहे. त्यात ते लिहितात-
वनवास संपवून पांडव परत आले ते याच दिवशी, असे मानून या दिवशी काही प्रतीकात्मक विधी केला जातो. परतत असताना द्रौपदीसह पाचही पांडव गावाच्या वेशीजवळच्या एका डेरेदार निंबाच्या झाडाखाली विसाव्यासाठी थांबले. म्हणून विशेषकरून मराठवाड्यामध्ये या दिवशी सकाळीच प्रत्येक जण आपल्या घराजवळ अंगणातील एक कोपरा सजवतात. आसपास कडुलिंबाचे झाड असेल तर त्याच्याखाली प्रथम कोपऱ्याची जागा झाडून पुसून स्वच्छ करतात. तिथे कडुलिंबाच्या पानाची सुंदर मऊ बैठक तयार करतात. त्याच्यावर पाच पांडव आणि द्रौपदी म्हणून चुना लावलेले सहा छोटे दगड ठेवतात. नंतर द्रौपदीला हळद कुंकू, फुले वाहून तिच्यासह सर्वांची पूजा करून त्यांना नैवेद्य अर्पण करतात.
महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाड्यातील हा एक विशेष सण आहे. परंपरेने तो कुलाचार म्हणून अतिशय जिव्हाळ्याने साजरा केला जातो. घरातील वस्तू आणि थोडासा वेळ एवढ्यातच जर एवढी सुंदर परंपरा अबाधित राहिली असेल, तर ती नक्कीच कौतुकास्पद म्हणावी लागेल. पूर्वी महाराष्ट्रात सर्वदूर दिवाळीच्या निमित्ताने मुलेबाळे एकत्रितपणे घराच्या दारात मातीचे किल्ले बनवत असत. त्याच्याशी साम्य असलेला हा सण! एका हृद्य आठवणीला उजाळा देणारी ही परंपरा आपणही स्वीकारण्यास हरकत नाही. त्यामुळे संस्कृतीची मुळे अधिक बळकट होतील. पुढच्या पिढीला आपल्या संस्कृतीबद्दल कुतूहल वाटेल. ती पिढीदेखील इतिहास जाणून घेण्यास उत्सुक होईल. एकूणच हा सण अनेक सांस्कृतिक भावनांनी जोडलेला असल्यामुळे या सणाला 'भावुका' अमावस्या असेही म्हटले जाते.