आज वैशाख पौर्णिमा आहे. हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो. त्याचप्रमाणे या दिवशी पिंपळाच्या पूजेचे महत्त्व असते, कारण या तिथीला पिंपळ पौर्णिमा असेही शास्त्राने नाव दिले आहे. हिंदू धर्मात पिंपळ वृक्षाचे किती महत्त्व आहे ते वेगळे सांगायला नकोच. त्यामुळे या दिवशी पिंपळाची पूजा केली असता कोणते फायदे होतात, ते जाणून घेऊया.
१. या दिवशी पिंपळाची पूजा केल्यास ग्रह आणि पितृ दोष दूर होण्यास मदत होते.
२. पिंपळ पौर्णिमेच्या दिवशी लग्नकार्य वगळता सर्व प्रकारचे शुभ कार्य करता येते. यासाठी गुरु किंवा सूर्य बळ पाहण्याची गरज नाही.
३. या दिवशी पिंपळाची विधिवत पूजा केल्यामुळे शनि, गुरु यांच्यासह सर्व ग्रह शुभ फल देण्यास सुरवात करतात.
४. या दिवशी पिंपळाचे रोप लावल्याने अनेक प्रकारचे दोष दूर होतात आणि देवगुरू बृहस्पतीचा आशीर्वाद प्राप्त होतो.
५. शास्त्रानुसार पिंपळ हा माता लक्ष्मीचा प्रिय वृक्ष आहे. वैशाख पौर्णिमेला ती या वृक्षावर येऊन वास करते. म्हणून जो कोणी या दिवशी पिंपळाची पूजा करतो त्याच्या घरात संपत्ती व समृद्धी येते.
६. या दिवशी, पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालण्याला विशेष महत्त्व महत्व आहे.अश्वाथोपायन उपोषणाच्या संदर्भात महर्षि शौनक सांगतात, की शुभ मुहूर्तामध्ये दररोज तीनदा पिंपळाला प्रदक्षिणा घातल्यास दारिद्रय, दु: ख आणि दुर्दैव दूर होते. यासाठीच लोक पिंपळाची पूजा करतात आणि दीर्घायुष्य आणि समृद्धी मिळवतात. पिंपळाला प्रदक्षिणा घातल्याने विवाह लवकर ठरतो, अशीही अनेकांना प्रचिती आली आहे.
या ग्रहस्थितीचा उचित परिणाम साधण्यासाठी पिंपळाच्या सान्निध्यात जाण्याची संधी दवडू नका. या दिवशी शक्य झाल्यास गंगा स्नान करावे. तसे केल्याने कुंभ मेळ्यात स्नान केल्याचे पुण्य लाभते असे म्हणतात.