सध्या प्रेम सप्ताह सुरू झाला आहे. सगळीकडे प्रेमाला बहर काय नि पुर काय येऊ लागलाय. पण हे प्रेम एक दिवस किंवा सप्ताहापुरते मर्यादित का? जर ते आयुष्यभर करता येत असेल आणि मिळवता येत असेल तर त्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात ते जाणून घेऊ.
अलीकडच्या काळात सर्वात मोठे आव्हान आहे, ते म्हणजे लग्न टिकवणे. दर दहा घरांपैकी चार ते पाच घरात घटस्फोटाची उदाहरणे सापडतील! त्याला कारण काय आहे? एकाएक असे काय झाले की भारतीय विवाह पद्धतीचा समतोल ढासळू लागला? लोक लिव्ह इन रिलेशनशिपची मागणी करू लागले? एकमेकांचा सहवास जोडप्यांना असह्य वाटू लागला? मग आधीच्या पिढीने कोणत्या पायावर वैवाहिक जीवनाची पन्नास वर्ष एकत्र काढली? त्याचे मुख्य कारण आहे, विवाह या शब्दाबद्दल असलेली अनभिज्ञता!
विवाह या शब्दाचा अर्थ आहे वाहून घेणे, समर्पित होणे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थाच्या पूर्ततेसाठी मनुष्याला जोडीदाराची, सह्चर्याची गरज असते. त्यासाठी विवाह पद्धतीचा संस्कार पूर्वजांनी घालून दिला. कोणतेही नाते एकदिवसात तयार होत नाही, ते रुजायला अनेक वर्षं जावी लागतात. सहवासाने नाते फुलते, बहरते, पण त्यासाठी समर्पण भाव दोहोंच्या ठायी असायला हवा. यासाठी जोडीदार निवडून त्याच्याप्रती समर्पण करणे हे विवाह संस्थेला अभिप्रेत आहे. अन्यथा मनुष्य मन एवढे चंचल आहे, की ते सतत नाविन्याचा शोध घेत राहते. परंतु अनेक नात्यांमध्ये गुंतलेल्या व्यक्तीची प्रत्येक पातळीवर ओढाताण देखील होते. म्हणून जोडीदाराशी एकनिष्ठ राहून त्याच्याशी प्रतारणा न करणे आणि त्याला सर्वस्व मानून सुखाने संसार करणे हा विवाहाचा मूळ उद्देश आहे.
इतर नात्यांच्या तुलनेत विवाहाचे नाते हे एकमेव असे नाते आहे जे समानता दर्शवते. त्याचे उदाहरण भगवान महादेव अर्धनारीनटेश्वर या रूपात दर्शवतात. इतर नात्यांमध्ये न दिसणारी समानता नवरा बायकोच्या नात्यात असते. कारण ते परस्पर पूरक असतात. दोघे कमावते असो किंवा नसो त्यांनी संसाराची जबाबदारी समसमान वाटून घेत संसार गाडा पुढे न्यायचा असतो. या रथाचे एक चाक जरी कमकुवत असले तरी हा रथ सुरळीत चालणार नाही. म्हणून दोघांनी एकमेकांचा सन्मान करणे अपेक्षित असते. तसे झाले नाही की वादाची ठिणगी पडते, अहंकाराची वाळवी लागते आणि नात्याला सुरुंग लागून दोन व्यक्तींचे विलगीकरण होते.
माणसाला सुख दुःखात भागीदार लागतोच! अन्य नाती अशा क्षणी जरी जवळ असली तरी जोडीदार हे आपले अर्धांग असतो. तो आपल्याला पूर्णपणे ओळखून असतो. नाते दृढ असेल तर शब्दांचीही गरज लागत नाही, केवळ नजरेने किंवा देहबोलीने जोडीदाराची मानसिक स्थिती कळू लागते. पण हे कधी? जेव्हा दोघांच्या ठायी ते समर्पण असते. अशात जोडीदाराकडून समर्पणाची अपेक्षा करताना आपण आपल्याकडून पूर्णपणे समर्पित आहोत का, हे आधी ताडून पहा, तसे असेल तर समोरूनही तेवढेच प्रेम, सहृदयता, आत्मीयता, आपुलकी, आदर मिळेल याची शाश्वती बाळगा!