- सचिन व्ही. काळे
'मी हे केले, मी ते केले, माझ्यासारखे कष्ट कुणीच करू शकत नाही, मला खूप लोक मानतात, माझ्याशिवाय त्यांचे काहीच चालत नाही, हे मलाच बघावे लागेल, माझ्यासारखे काम कुणालाच जमत नाही.' यासारखी वाक्ये आपण अनेक जणांच्या तोंडून ऐकतो. हे ऐकत असतांना असे वाटते की, समोरील व्यक्ती ही खूप आत्मप्रौढी आहे. स्वतःची स्तुती करणे यातच या व्यक्तीला आनंद वाटतो. आजकाल ही अशी प्रवृत्ती अनेकांमध्ये पाहायला मिळते. ज्या राजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी कधी, 'मी खूप कष्टातून हे हिंदवी स्वराज्य निर्माण केले' असे म्हटले नाही किंवा त्यांच्या गड किल्ल्यांवर कुठेही असे लिहिलेले आजपर्यंत आढळून आलेले नाही. तसेच कुठल्या बखरीमध्ये किंवा पुस्तकात सुद्धा त्याचा उल्लेख सापडत नाही.
अनेक थोर व्यक्तींनी केलेल्या कष्टाचा, त्यांच्या कार्याचा तसेच त्यामुळे त्यांना मिळालेल्या वलयाचा 'मी पणा' केल्याचे कुठे आढळत नाही. मग प्रश्न पडतो. आजकाल लोकांना झालंय तरी काय ? काहीशा यशाने त्यांच्यामध्ये हा 'मी पणा' का वाढत जातोय. बर नुसताच वाढत नाहीये. तर त्यातून इतरांना तुच्छ लेखण्याचा तसेच इतरांच्या यशाला कमी लेखण्याची प्रवृत्ती ही अशा 'मी पणा' करणाऱ्या लोकांमध्ये दिवसेंदिवस बळावते आहे. आपले यश ते खूप मोठे आणि इतरांचे ते शुल्लक, अशी काहीशी भावना या लोकांमध्ये निर्माण झाली आहे. हा 'मी पणा' अशा व्यक्तींच्या प्रत्येक कामातून, बोलण्यातून, वागण्यातून जाणवतो.
हा 'मी पणा' तसा प्रत्येक व्यक्तीसाठी खूप घातकच. यातून सदरील व्यक्तीला असे वाटते की, माझे हे गुणगान ऐकून मला खूप लोक मानतात. माझ्या भोवती खूप मोठे वलय तयार झाले आहे. पण हे वलय आभासी आहे. हे ती व्यक्ती का विसरून जाते ? प्रत्येक मोहिम यशस्वी झाल्यानंतर महाराजांनी मी होतो म्हणून ही मोहीम फत्ते झाली. अशा प्रकारचे वक्तव्य केलेले कधी ऐकायला आले नाही. असे जर असते तर जीवाची बाजी लावणारे असंख्य मावळे निर्माण झाले नसते. हे वलय महाराजांभोवती निर्माण झालेच नसते. ते निर्माण झाले ते केवळ 'मी' हा शब्द राजांमध्ये नव्हता म्हणूनच.
कुणाचे ही यश मोठे किंवा छोटे नसते. यश हे यश असते. यश मिळवण्यासाठी प्रत्येकाने कष्ट हे केलेलेच असतात. जेव्हा मिळवलेल्या यशात 'मी पणा' येतो तेव्हा या यशाची किंमत कितीशी असते ? शून्यच ना ! यशाची किंमत नसतेच मुळी. पण ही 'मी पणा' करणारी माणसे एका वेगळ्याच धुंदीत वावरत असतात. त्यांना हे लक्षात येत नाही की, आपल्या मी-मी करण्यामुळे आपली म्हणवणारी माणसे आपण गमवून बसवत आहोत. आपल्या भोवती निर्माण झालेले हे वलय फक्त एक मोहजाल आहे. या मोहजालाला भुलून आपण मीपणा, राग, द्वेष, मत्सर, लोभ या महासागरात नकळतपणे ओढावले जात आहोत. हेच मी-मी करणाऱ्या व्यक्तीच्या लक्षात येत नाही.
हा 'मी' जर यशोशिखरावर पोहचलेल्या व्यक्तीने सोडला तर त्यांच्या यशाचे गुणगान त्याला स्वतः करण्याची गरजच पडणार नाही. ते नकळतपणे त्याची आपलीच माणसे करतील. आपल्या माणसाचे सुंदर असे जीवाभावाचे वलय आपोआप त्याच्या भोवती निर्माण होईल. त्यासाठी यशोशिखरावर पोहचलेला व्यक्ती असो किंवा सामान्य व्यक्ती असो इथे प्रत्येकानेच 'मी' हा शब्द आपल्या जीवनातून काढून टाकल्यास हे जीवन किती सुंदर होईल. यशाच्या मार्गावर असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपलीच माणसे त्याला नेऊन बसवतील.
इथे प्रत्येक व्यक्ती कष्ट करूनच यशस्वी होतो. कष्टा शिवाय यश मिळत नाही. हे साऱ्यांनाच माहीत आहे. मग इतरांना ही हे यश कष्टानेच मिळाले असेल हे या व्यक्तींच्या लक्षात यायला हवे. ज्याप्रमाणे यशाची तुलना करता येत नाही. त्याच प्रमाणे कष्टाची ही तुलना मुळी करूच नये. या 'मीपणा' मुळे गर्व हा होतोच. 'गर्वाचे घर कधीना कधी खाली होतेच', ही म्हण सर्वांनीच लक्षात घ्यावी. 'मी' हा खूप घातक आहे. याच्यापासून सावध राहिल्यास. जीवन सुखी, सुंदर, समाधानी व्हायला कितीसा वेळ लागेल. म्हणून चला 'मी'पणा सोडू या आणि जीवन समृद्ध बनवू या.
( लेखक हे अध्यात्म विषयाचे अभ्यासक आहेत, त्यांच्या संपर्क क्रमांक 9881849666 )