या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृताया वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना।या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दितासा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमधील विविधता अनन्य साधारण आहे, असेच म्हणावे लागेल. भारतीय संस्कृतीत साजरे केले जाणारे सण-उत्सव निसर्गावर आधारित आहेत, याची पूरेपूर अनुभूती मिळते. यंदा मंगळवार, १६ फेब्रुवारी २०२१ रोजी वसंत पंचमी (Vasant Panchami 2021) आहे. वसंत पंचमीचे महत्त्व, मान्यता यांविषयी जाणून घेऊया...
संत कबीर संत जनाबाईंना भेटायला गेले, तेव्हा त्या चक्क भांडत होत्या; पण कशासाठी? वाचा!
वसंतोत्सव
माघ महिन्यातील पंचमीला देवी सरस्वती पृथ्वीतलावर अवतरली. यामुळे माघ महिन्यातील पंचमी सरस्वतीच्या नावाने साजरी केली जाते. वसंत ऋतूही याच दरम्यान बहरत असल्यामुळे या पंचमीला वसंत पंचमी म्हटले जाते. वसंत पंचमी साजरी करण्याला भारतीय संस्कृतीत अनेक मान्यता आहेत. वसंताचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव मानला जातो. वसंत पंचमीपासून फाल्गुन पौर्णिमेपर्यंत वसंतोत्सव साजरा करतात. सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. वसंत ऋतूच्या आगमनाप्रीत्यर्थ सुवसंतक, वसंतोत्सव, मदनोत्सव, अशोकोत्सव, असे उत्सव करण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरू आहे. या निमित्ताने मनोरंजनात्मक कार्यक्रम केले जातात. वसंताचा उत्सव हे आशावादाचे प्रतीक आहे. वसंत म्हणजे आशा व सिद्धी यांचा सुंदर मिलाफ आहे, असे म्हटले जाते.
भारतीयांचा व्हॅलेंटाइन डे
वसंत पंचमीला विठ्ठल- रखुमाईचे लग्न झाले, असे मानतात. पंढरपुरात वसंत पंचमीला हा देवाचा लग्नसोहळा रंगतो. पांढऱ्याशुभ्र पोषाखात अलंकाराने नटलेला विठोबा आणि सालंकृत रखुमाईची मूर्ती यांच्यामध्ये आंतरपाट धरून लग्न लावले जाते. वसंत पंचमी ते रंगपंचमीपर्यंत विठ्ठलाला शुभ्र पोषाख करून गुलाल उधळण्याची प्रथा आहे. भारतीय संस्कृतीत प्रेमाचे वेगळे महत्त्व आहे. वसंत पंचमीचा दिवस प्रेमात, आनंदात घालवतात. भारतात अनेक ठिकाणी रती आणि कामदेव यांचे पूजन करण्याची प्रथा आहे. हा भारतीयांचा व्हॅलेंटाइन डे आहे असे म्हटले तरी हरकत नाही, असे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणतात.
वास्तुदोष दूर करण्यासाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी नियमीत वाचा सिद्ध कुंजिका स्तोत्र
ऋतुराज वसंताची बिरुदावली
महर्षी वाल्मिकींनी रामायणात वसंत ऋतूचे अतिशय सुंदर व मनोहारी चित्रण केले आहे. श्रीकृष्णानेही गीतेत ऋतूला कुसुमाकर असे म्हणून ऋतुराज वसंताची बिरुदावली गायली आहे. सतत आकर्षक वाटणारा निसर्ग वसंत ऋतमध्ये लोभस बनतो. काही ठिकाणी रंगीबेरंगी वस्त्रे परिधान करून, रंगांची उधळण करत वसंतोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. वसंत ऋतूमध्ये वृक्षलतांना नवी पालवी फुटते. ते पानाफुलांनी बहरतात. निसर्गाच्या या बदलत्या स्वरुपामुळे मनुष्याची मनोवृत्तीही उत्साही व आनंदी होते. हा उत्सव संक्रमणस्थितीचा द्योतक आहे, असे मानले जाते.
वसंत पंचमीला मदनोत्सव
कालिदासाच्या काळात वसंत पंचमीला 'मदनोत्सव' असे म्हटले जात असे. या दिवशी कामदेवतेची पूजा करण्याची प्रथा होती. हळूहळू ही परंपरा लोप पावली, असे सांगितले जाते. पश्चिम बंगालमध्ये हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करण्याची परंपराही इथे जुनी आहे. पूर्वीच्या काळी सरस्वती पूजेच्या दिवशी मुली पहिल्यांदा साडी नेसत, असे सांगितले जाते.