Vasant Panchami 2023: नवीन वर्ष २०२३ सुरू झाले आहे. तर मराठी वर्षातील माघ महिन्याला सुरुवात झाली आहे. माघ महिना अनेकार्थाने शुभ आणि विशेष मानला जातो. या महिन्यात धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे सण-उत्सव साजरे केले जातात. माघ महिन्याच्या शुद्ध पंचमीला वसंत पंचमी साजरी केली जाते. यंदा २६ जानेवारी २०२३ रोजी वसंत पंचमी देशभरात साजरी केली जात आहे. तसेच वसंत ऋतूही याच दरम्यान बहरत असल्यामुळे या पंचमीला वसंत पंचमी म्हटले जाते.
माघ महिन्यातील पंचमीला देवी सरस्वती पृथ्वीतलावर अवतरली, अशी मान्यता आहे. विद्येची देवता सरस्वतीची पूजा या दिवशी केली जाते. वसंत पंचमी साजरी करण्याला हिंदू धर्मात अनेक मान्यता आहेत. वसंत ऋतू आणि वसंत पंचमीचे महत्त्वही वेगळे आहे. वसंताचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे. वसंत पंचमीपासून फाल्गुन पौर्णिमेपर्यंत वसंतोत्सव साजरा करतात. सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. वसंत ऋतूच्या आगमनाप्रीत्यर्थ सुवसंतक, वसंतोत्सव, मदनोत्सव, अशोकोत्सव, असे उत्सव करण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरू आहे. वसंताचा उत्सव हे आशावादाचे प्रतीक आहे. वसंत म्हणजे आशा व सिद्धी यांचा सुंदर मिलाफ आहे. कल्पना व वास्तवता यांचा सुगम समन्वय आहे, असे म्हटले जाते.
सरस्वती देवीच्या अवतरणाबाबत प्रचलित कथा
सृष्टीचे निर्माणकर्ता ब्रह्म देवांनी जेव्हा जीव आणि मनुष्यांची रचना केली. मात्र, निर्माण केलेल्या सृष्टीकडे पाहिल्यावर ती निस्तेज असल्याचे त्यांना जाणवले. वातावरण अतिशय शांत होते. त्यात कुठलाही आवाज वा वाणी नव्हती. यामुळे ब्रह्म देव उदास आणि निराश झाले. विष्णू देवाच्या आज्ञेवरून ब्रह्म देवांनी आपल्या कमंडलातील पाणी पृथ्वीवर शिंपडले. भूमीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वी कंप पावली आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी सुंदर स्त्री प्रकट झाली. त्या देवीच्या एका हातात वीणा, दुसर्या हात वर मुद्रेत आणि इतर दोन हातात पुस्तके आणि माळ होती. ब्रह्म देवाने त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला. वीणेच्या सुरांमुळे पृथ्वीवरील सर्व जीवांना, मनुष्याला वाणी प्राप्त झाली. त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले. सरस्वती देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी सर्व जीवांना दिली. माघ महिन्यातील पंचमीला ही घटना घडल्यामुळे सरस्वतीचा जन्मोत्सव रूपात ही पंचमी साजरी केली जाते, अशी मान्यता आहे. या देवीला बागीश्वरी, भगवती, शारदा, वीणावादनी आणि वाग्देवी, अशी अनेक नावे आहेत. संगीताची उत्पत्ती केल्यामुळे संगीताची देवी म्हणूनही तिचे पूजन केले जाते. विद्या, बुद्धी देणाऱ्या सरस्वती देवीची पूजा वसंत पंचमीच्या दिवशी केली जाते.
वसंत ऋतुचे रामायण, महाभारतातील वर्णन
महर्षी वाल्मिकींनी रामायणात वसंत ऋतूचे अतिशय सुंदर व मनोहारी चित्रण केले आहे. भगवान श्रीकृष्णानेही गीतेत ऋतूला कुसुमाकर असे म्हणून ऋतुराज वसंताची बिरुदावली गायली आहे. सतत आकर्षक वाटणारा निसर्ग वसंत ऋतमध्ये लोभस बनतो. काही ठिकाणी रंगीबेरंगी वस्त्रे परिधान करून, रंगांची उधळण करून वसंतोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. वसंत ऋतूमध्ये वृक्षलतांना नवी पालवी फुटते. ते पानाफुलांनी बहरतात. निसर्गाच्या या बदलत्या स्वरुपामुळे मनुष्याची मनोवृत्तीही उत्साही व आनंदी होते. हा उत्सव या संक्रमणस्थितीचा द्योतक असल्याचे म्हटले जाते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"