आपण घर सजवतो तसे आपले देवघरही नेहमी सुशोभित ठेवतो. पवित्र ठेवतो. ते छोटे असो वा मोठे, त्या छोट्याशा वास्तूशी आपले भावबंध जोडलेले असतात. मात्र आपली हौस पुरवत असताना काही नियमांचे भान ठेवणेही तेवढेच महत्त्वाचे असते. कसे ते पाहू.
प्रत्येकाच्या घरात जागेच्या उपलब्धीनुसार छोटे-मोठे देवघर असते. त्यात देवतांच्या मोजक्या मूर्ती, प्रतिमा, शुभचिन्ह वगैरे ठेवले जाते. रोज नित्यनेमाने पूजा करून रांगोळीने देव्हारा सुशोभित केला जातो. धूप दीप लावून, फुले वाहून तेथील वातावरण पवित्र ठेवले जाते. त्याचवेळेस काही गोष्टींचे भान ठेवले तर त्याचे लाभ आप्ल्यालाच अनुभवता येतात.
घरातील प्रत्येक वस्तू वास्तुशास्त्राच्या नियमानुसार ठेवावी. योग्य जागी वस्तू घरात ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते आणि घरात नेहमी सुखशांती नांदते. त्या गोष्टींचे सकारात्मक परिणाम तेव्हाच मिळतात जेव्हा ती योग्य दिशेने आणि ठिकाणी ठेवल्या जातात. देव्हारा हे घरातील अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. जर ते योग्य दिशेने ठेवले असेल तर त्याच्या सकारात्मक लहरी वास्तूला लाभदायक ठरतात.
वास्तूमध्ये पूजा घराबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत. ईशान्य दिशा ही देव दिशा मानली जाते, असे वास्तू तज्ञांचे म्हणणे आहे. असे म्हटले जाते की या दिशेने सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते. या दिशेला ठेवलेले मंदिर कुटुंबातील लोकांच्या प्रगतीचा मार्ग खुला करते. त्यामुळे तुमचे देवघर ईशान्य दिशेला नसेल तर एखाद्या शुभ दिवशी ईशान्य दिशेची जागा शुचिर्भूत करून देवघर त्या दिशेला ठेवा आणि देवांना त्यात स्थलांतरित करा.
घरात देवाची कृपा राहण्यासाठी आणि माँ लक्ष्मी-कुबेर देवाची कृपा मिळवण्यासाठी बेडरूममध्ये, पायऱ्यांखाली, किचन किंवा बाथरूमच्या आसपास चुकूनही देव्हारा बनवू नका. त्याचबरोबर घराच्या नैऋत्य दिशेला देवघर बांधू नका.
वास्तू तज्ञ सांगतात की, बरेच लोक घरात थेट जमिनीवर देव मांडतात. तसे करणे चुकीचे ठरेल. एक तर घरात लहान मुले असतील तर ते देवघरातील मूर्ती खेळणी समजून खेळतील. तसेच मोठयांचाही जाता येता धक्का लागून देवांना अनावधानाने पाय लागेल. म्हणून एकतर देवघर स्वतंत्र असावे नाहीतर उंचावर असावे. तसेच आपल्या बैठकीपेक्षा देवाची उंची वर असावी.
देवघराचा रंग आपल्या घरासारखा प्रसन्न वाटेल असाच असावा. देवघर संगमरवरी असेल तर उत्तमच. लाकडी असेल तर त्याला साधारण पिवळा, पांढरा, आकाशी असा असावा. फार तर सोनेरी किंवा चंदेरी मुलामा द्यावा.