स्वयंपाकघरात हळदीचा वापर सर्रास केला जातो. हळदीमुळे भाजीचा रंग तर बदलतोच पण ती खाल्ल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो. पण तुम्हाला माहीत आहे का की घरात हळदीचे रोप लावणे शुभ मानले जाते. हळद ही पूजेच्या साहित्यातील एक आवश्यक वस्तू आहे. तशीच ती वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही अतिशय महत्त्वाची आहे. चला जाणून घेऊया हळदीचे रोप लावण्याची योग्य पद्धत!
हळदीचे रोप घरामध्ये लावण्याचे फायदे :
वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये हळदीचे रोप लावणे खूप लाभदायक ठरते. वास्तुशास्त्रानुसार घरात हळदीचे रोप लावल्याने समृद्धी वाढते आणि आर्थिक चणचण दूर होते. तसेच हे रोप घरात लावल्याने कुटुंबातील सदस्यांचे नातेही घट्ट होते. परंतु हळदीच्या रोपापासून शुभ लाभ मिळवण्यासाठी त्याची योग्य दिशेने लागवड करणे खूप आवश्यक आहे.
वास्तुशास्त्रानुसार हळदीचे रोप नेहमी दक्षिण आणि पूर्व मध्यभागी (अग्नेय कोनात) लावावे. या दिशेला हळद लावल्यास त्यातून सकारात्मक ऊर्जा वाहते. यासोबतच सर्व वास्तुदोषही दूर होतात. जर तुम्हाला घरात सुख-शांती हवी असेल तर पश्चिम-उत्तर दिशेला हळदीचे रोप लावा. तसेच हळदीचे रोप पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणे देखील शुभ मानले जाते. या दिशेला रोप लावल्याने सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते.
हळद पवित्र मानली जाते म्हणून प्रत्येक पूजेत तिचा वापर केला जातो. केवळ देवघरात नाही तर संपूर्ण घरात हळदीचे पावित्र्य, मांगल्य पसरावे म्हणून वास्तुशास्त्राने हळदीचे रोप लावा असे सांगितले आहे. त्यामुळे गुरु ग्रह मजबूत होतो, कौटुंबिक नाते दृढ होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते. याशिवाय घरातील तिजोरीत किंवा इतर कोणत्याही कपाटात हळकुंडाचा तुकडा ठेवल्याने लक्ष्मीची कृपा राहते. आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
असे लावा हळदीचे रोप
ओल्या हळकुंडाचे लहान तुकडे करा. ओलसर आणि चांगला निचरा होणाऱ्या समृद्ध सेंद्रिय मातीने भांडे भरा. नंतर ओल्या हळकुंडाचे तुकडे जमिनीच्या पृष्ठभागाच्या खाली सुमारे २ इंचठेवा आणि कळ्या वरच्या बाजूस ठेवून वर माती टाका. भांड्यात पुरेसे पाणी घालत रहा. कालांतराने हळदीचे रोप वर वाढेल आणि मुळाशी हळकुंड आकार घेऊ लागेल!