मंदिर असो की देवघर, पुजेच्या वेळी पितळी भांड्यांचा वापर शुभ मानला जातो. पूर्वीच्या काळी घराघरात पितळी भांड्यांचा सर्रास वापर केला जात असे. अलीकडे या भांड्यांनी पुन्हा एकदा स्वयंपाक घरात प्रवेश केला आहे. तसे करणे लाभदायक आहेच, पण वास्तुशास्त्र सांगते, पितळी भांड्यांचा (Peetal Utensil) अर्थात उपकरणांचा वापर देवघरात जरूर करावा. पितळ हा धातू शुद्ध व गुणकारी असल्याने सत्यनारायण पूजेपासून लग्नकार्यापर्यंत सर्व प्रसंगी पितळ्याची भांडी वापरली जातात. देवघरात त्याचा वापर केल्याने होणारे फायदे जाणून घेऊ.
पिवळा रंग भगवान विष्णूंना प्रिय आहे:
पितळ हा शुद्ध धातू मानला जातो. तो पिवळ्या रंगाचा असतो. पिवळा रंग भगवान विष्णू आणि इतर देवतांनाही प्रिय आहे. हा रंग त्याग, समर्पण, अध्यात्माचे प्रतीक मानला जातो. पिवळा रंग आल्हाददायक असल्याने पूजेत सकारात्मक ऊर्जेसाठी पितळी भांडी (Peetal Utensil) वापरतात. पूर्वी देवपूजेत सोन्या चांदीच्या उपकरणांचा वापर करत असत. सर्वसामान्य लोकांना त्यावर पर्याय म्हणून तांबे, पितळ, कास्य या धातूच्या भांड्याचा वापर सांगितला जातो. पितळदेखील सोन्यासारखे चकाकते म्हणून पूजेत पितळी भांडी वापरावीत असे सांगितले जाते.
ईशतत्त्वाचा सहवास:
ज्योतिषशास्त्रानुसार, पूजेच्या वेळी पितळ्याची भांडी वापरल्याने बृहस्पति ग्रहाचे पाठबळ मिळते. गुरूच्या शुभ प्रभावामुळे अशुभ कामे मार्गी लागतात. धार्मिक मान्यतेनुसार, पितळी उपकरणांनी पूजा केल्यास देवी-देवताही प्रसन्न होतात. पितळी कलशातून तुळशीला पाणी दिल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, त्यामुळे घरात सुख, समृद्धी नांदते आणि लक्ष्मी व विष्णूंचा आशीर्वाद मिळतो. (Peetal Utensil)
नैवेद्यासाठीही पितळी भांड्यांचा वापर:
नैवेद्याचे ताट पितळी असेल किंवा नैवेद्याचे अन्न पितळी भांड्यांमध्ये शिजवले असेल तर ते ज्योतिष शास्त्र, विज्ञान आणि अध्यात्माच्या दृष्टीने योग्य ठरते. दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा असेल तर तोही पितळी वाटीतून (Peetal Utensil) दाखवावा.मात्र पूजेमध्ये चुकूनही लोखंड, ऍल्युमिनिअम तसेच काचेचा वापर करू नये. पितळी किंवा तांब्याच्या भांड्यांचाच वापर करावा आणि मूर्ती देखील याच धातूंच्या निवडाव्या!