मनी प्लांट त्याच्या नावाप्रमाणे काम करते. वास्तूशास्त्रात मनी प्लांटला खूप महत्त्व आहे. घराच्या आत किंवा अंगणात मनी प्लांट लावले असता आणि त्याची यथायोग्य वाढ झाली असता सम्बधित व्यक्ती रोडपतीपासून करोडपती व्हायला वेळ लागत नाही असे म्हणतात. पण ते लावताना काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर उलट परिणाम समोर येतात.
वास्तुशास्त्रानुसार घराभोवती किंवा अंगणात, खिडकीत विविध प्रकारची रोपे लावली, तर ती पाहून मन प्रसन्न राहते. त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात, बैठकीच्या खोलीत, दिवाण खान्यात सूर्यप्रकाशाशिवाय टिकतील अशी रोपे लावण्यास सांगितले जाते. तो छोटासा कोपरा घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो. याच पार्श्वभूमीवर फेंगशुईच्या माध्यमातून मनी प्लांट भारतीय अंगणात रुजू लागले. नावाप्रमाणे ते पैशाचे झाड संबोधल्यामुळे आपसूक लोकांची अपेक्षा वाढली.
अनेकांना चांगले अनुभव आले, तर अनेकांना काहीच फरक पडला नाही. काही ठिकाणी तर मनी प्लांटची वाढदेखील झाली नाही. याला वास्तुशास्त्रात काही कारणे दिली आहेत. ती कोणती, ते जाणून घेऊ -
>> वास्तुशास्त्रानुसार दक्षिण पूर्व दिशा मनी प्लांटसाठी सर्वात योग्य दिशा आहे. कारण गणपती बाप्पा या दिशेचा स्वामी आहे. या दिशेने मनी प्लांट लावले असता घरात सुख समृद्धी येते. घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि पैशांचा तुटवडा कधीच जाणवत नाही.
>> उत्तर पूर्व आणि पूर्व पश्चिम दिशेला मनी प्लांट अजिबात लावू नये. त्यामुळे संपत्तीचा क्षय होतो. घरात आजारपण येते. नकारात्मक ऊर्जा खेचली जाते आणि वरचेवर कर्जबाजारी होण्याचे प्रसंग ओढवतात.
>> मनी प्लांट घराबाहेर न ठेवता घरात ठेवावे. जिथे सूर्यप्रकाश मिळाला नाही, तरी किमान उजेड मिळू शकेल. मात्र मनी प्लांटची जागा अशी निवडावी, जिथे लोकांचे सहज लक्ष जाणार नाही. त्यामुळे मनी प्लांटचा उचित फायदा मिळेल आणि त्याची योग्य वाढ देखील होईल.
>> मनी प्लांटची वाढ छान होत असेल, तर त्याची वेल घराच्या भिंतीवर नैसर्गिकरित्या पसरू द्यावी. त्यामुळे घरात संपत्तीची वाढ होते.
प्रश्न राहिला मनी प्लांट चोरून लावण्याचा तर... :
अनेक जण सांगतात, की दुसऱ्याच्या घरून चोरून आणलेली मनी प्लांटची वेल आपल्या घराच्या रोपट्यात रुजवली तर त्यातून भरपूर धनलाभ होतो. मात्र अशा कोणत्याही गोष्टीला वास्तू तज्ञांनी याला दुजोरा दिलेला नाही. उलट कोणतीही अनैतिक गोष्ट वास्तूला त्रासदायक ठरू शकते. म्हणून चोरी न करता विकत आणलेले किंवा निसर्गात मिळालेली वेल आपल्या अंगणात रुजवणे कधीही इष्ट!