>> श्रीनिवास जोशी
नवीन वास्तु घेणे,त्यात लवकरात प्रवेश करणे हे प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक स्वप्नं असतं,एक आस्थेचा,जिव्हाळ्याचा विषय असतो. सगळं होउन आपण नवीन वास्तुत प्रवेश करतो. नव्याची नवलाई संपते आणि मग हळूहळू काही कुरबुरी सुरु होतात. फ्रेश वाटत नाही,मुलं-बाळं , वयस्कर सतत आजारी पडू लागतात. मनासारख्या गतीने प्रगती होत नाही,अचानक अप्रिय घटना घडू लागतात. कधीकधी यापेक्षा सुद्धा काही विचित्र घटना घडतात. अचानक असं का घडू लागलय काही कळत नाही. भौतिक कारणं दिसायला भरपूर असतात. पण या मागे एक महत्त्वाचं कारण असू शकतं तुमची वास्तु. होय हे एक महत्त्वाचं कारण नक्की असू शकतं,कुणाला पटो अथवा न पटो.
वास्तुशास्राचा आवाका खूप मोठा आहे, ते तंतोतंत पाळलं तर त्याचे अप्रतिम असे फायदे सुद्धा मिळतात.पण सगळ्यांना ते अगदी १००% पाळणं आजच्या काळात कठीण आहे हे सुद्धा मान्य आहे म्हणून काही प्राथमिक गोष्टी ज्या बघितल्या गेल्या पाहिजेत त्या इथे सांगत आहे.
आजच्या काळात कितीही दावा केला तरी कुठलाही विकासक(बिल्डर) वास्तुशास्राप्रमाणे १००% जागा बांधत नाहीत.काही जण तर 'अडगळीच्या खोलीत कसं आपण सामान टाकून देतो' तसं कुठेही काहीही बनवून ठेवतात. आपले जसे शरीराचे भाग जागच्या जागी असतात तसच वास्तुशास्र आहे,कुठे काय असावं ते ठरलेलं आहे.
>> मुळात तुमची वास्तु ही चौरस असावी. कुठेही "कट" नसावा म्हणजे कुठलीही बाजू कापलेली किंवा कमी नसावी.
>> दरवाजा,देवघर,स्वयंपाकघर,झोपायची खोली या घरातल्या महत्त्वाच्या जागा आहेत.
अ) दरवाजा हा पूर्व,ईशान्य,उत्तर या दिशांनाच असावा.वायव्य,आग्नेय हे त्यातल्या त्यात चालू शकेल. नैॠत्य,दक्षिण अजिबात नको.या दिशा पूर्ण घराच्या बघायच्या आहेत.आ) देवघर हे सुद्धा compulsory पूर्व,ईशान्य,उत्तर याच दिशेला हवं . मग या दिशांना इतर काहीही असूदे. पूजा करताना आपलं तोंड पूर्वेकडे असलं पाहिजे. या दिशा पूर्ण घराच्या बघायच्या आहेत.इ)स्वयंपाकघर हे पूर्ण घराच्या आग्नेयला हवं,शेगडी पूर्व दिशेला असावी म्हणजे जेवण तयार करताना आपलं तोंड पूर्वेकडे असेल. अगदी शक्य नसेल तर वायव्येला चालेल.ई) झोपायची खोली अर्थात बेडरुम हे पूर्ण घराच्या नैॠत्येला हवे. तुमचा बेड असा हवा की झोपताना तुमचं डोकं पूर्वेला किंवा दक्षिणेला असेल.ई) याच ठिकाणी नैॠत्येला किंवा दक्षिणेच्या भिंतीला तुमची पैसे ठेवण्याचे कपाट असावे,जे उघडल्यावर उत्तरेकडे उघडेल.उ) शक्यतो टाॅयलेट बाथरुम एकत्र असूच नये.ऊ) टाॅयलेट+बाथरुम हे पूर्व,उत्तर,ईशान्य,दक्षिण,नैॠत्य या दिशांना कधीच असू नये. एक वेळ नुसतं बाथरुम पूर्व,उत्तर चालू शकेल.
आता काही इतर पण महत्त्वाच्या गोष्टी सांगतो.
>> पूर्ण घराचा जो मध्य येईल तिथे काही असू नये, तो भाग पूर्ण मोकळा असावा.
>> घराच्या समोर लिफ्ट किंवा दुसरा Block असू नये.
>> पूर्व, उत्तर, ईशान्य या घराच्या शुभ दिशा असतात, त्या शक्यतो मोकळ्या असाव्यात. याउलट दक्षिण, नैऋत्य या दिशांना जड वस्तू ठेवून त्या जास्तीत जास्त बंद ठेवाव्यात.
>> ईशान्य ही ईश तत्त्व म्हणजेच देवाची दिशा आहे, जमल्यास या ठिकाणी एखादी खिडकी असावी जेणेकरून सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश घरात येईल आणि पूजा करताना तुम्ही तो घेऊ शकाल ज्यातून तुम्हाला नैसर्गिकरीत्या डॉ जिवनसत्त्व मिळेल. या शुभ दिशांना शक्यतो फुलझाडे वगैरे असावीत.
>> आग्नेय दिशा म्हणजे नैसर्गिक अग्नी म्हणजे ऊर्जा जी महिलांना आवश्यक असते.
>> तुमचं घर कसही असो, मोठे प्रयत्न करून देवघर ईशान्य/ पूर्वेलाच ठेवा. देवांची दिशा देवाला मिळाली की अर्ध्या अडचणी आधीच कमी होतात. तुम्हाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन किंवा मदत मिळू शकते.
>> काही वेळेला असं होतं की एखादं location एखादा complex तुम्हाला व्यावहारिक दृष्टीने योग्य असतो तर तेव्हा तुम्हाला जर choice असेल तर यातल्या ८५-१००% रचना बरोबर असणारा एखादा तरी फ्लॅट तुम्हाला मिळू शकतो. थोडे पैसे जास्त जात असतील तरी भविष्यात हा व्यवहार तुम्हाला बरेच वेळा फायदेशीर च ठरतो. नाही तर थोडा काळ थांबून अशा जागांसाठी वाट पहावी हे उत्तम.
स्वतःच घर बांधणं आजच्या काळात सोपं नाही पण जर जर तुमच्या नशीबाने हे शक्य होत असेल तर या सगळ्या नियमांचा विचार नक्की करावा. याच बरोबर एखाद्या वास्तु तज्ञांकडून आणखी सविस्तर माहिती घ्यावी आणि त्याप्रमाणे आखणी करावी.
या एवढ्या प्राथमिक गोष्टी पाहिल्यात तरी भविष्यातल्या अडचणी बऱ्याच अंशी कमी असतील. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की आजार झाल्यावर औषध घेण्यापेक्षा आधी घ्या म्हणजे वास्तु घेतल्यावर त्यातल्या दोषांवर उपाय करण्यापेक्षा वास्तु घेण्याआधीच या गोष्टी तपासून घ्या. हे सगळं पाहून वास्तु खरेदी केल्यावर ही वास्तु आपल्याला आणखी शुभ ठरावी यासाठी शुभ मुहूर्तावर वास्तुशांती करून मगच प्रवेश करावा कारण हे सगळं झालं तरी आणखी काही दोष असतातच जे दूर करण्यासाठी वास्तुशांती आवश्यक असते. त्याबद्दल सविस्तर माहिती पुढच्या लेखात पाहू.