वास्तुशोभेसाठी फुलांचा वापर करणे हा प्रयोग काही नवीन नाही. ही पद्धत पूर्वापार चालत आली आहे. अगदी राजा महाराजांच्या काळापासून! त्याकाळात त्यांच्या राजमहालाच्या अवती भोवती उपवन असे. त्यानंतरच्या काळात घराभोवती छोटीशी बाग केलेली असे. त्यानंतरच्या काळात गॅलरीत बागेची हौस भागवली जाऊ लागली. आणि आता तर तेवढेही बागकाम करायला वेळ नाही म्हणून कृत्रिम फुलांनी घर सजवण्याचा पर्याय शहरी घरांमध्ये आढळतो. सण उत्सवापुरता त्यांचा वापर ठीक आहे परंतु दररोज ती फुले घरात सजवून ठेवणे हिताचे नाही. ती फुलं दिसायला आकर्षक असतात, परंतु त्या फुलांमुळे रोगराई वाढण्याची आणि इतर संकटं ओढवून घेण्याची दाट शक्यता असते.
घराच्या आवारात, परिसरात किंवा घरात फुलांची आकर्षक रचना करण्यामागे वास्तुशास्त्राचा हेतू होता, तो म्हणजे प्रसन्न वातावरणाची निर्मिती! केवळ फुलदाणीत फुलांची सजावट नाही, तर देवघरात देव्हाऱ्याभोवती फुलांची आरास, दारात फुलांची रांगोळी, प्रवेशद्वाराजवळ घंगाळ्यात पाण्यावर तरंगणारी आकर्षक फुलं-पानं पाहून कोणाला बरे प्रसन्न वाटणार नाही? मात्र ती जागा आता कृत्रिम फुलांनी घेतली असल्यामुळे त्या फुलांना सुगंध, दरवळ नसला तरी ती आकर्षणापुरती वापरली जातात. मात्र वास्तुशास्त्राला त्या फुलांचा वापर अमान्य आहे.
कुटुंबात दु:ख वाढू लागते
वास्तुशास्त्राविषयी बोलायचे झाले तर, कृत्रिम फुले घरात लावू नयेत. याचे कारण कृत्रिम गोष्टी खरी अनुभूती देत नाहीत. त्यामुळे संसाराचा खरा आनंदही खोटा वाटू लागतो. म्हणून कृत्रिम वस्तू, तसेच जुन्या वापरलेल्या वस्तू आपल्या घरात वापरणे टाळावे असे सांगितले जाते. अन्यथा घरात अशांतता वाढते.
नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते
ज्योतिषशास्त्रानुसार कृत्रिम फुले आणल्याने नकळत नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. ही नकारात्मक उर्जा लवकरच कुटुंबातील सर्व लोकांना आपल्या कवेत घेते, घरच्यांची चिडचिड होते, वाद होतात. नकारात्मक प्रभाव वाढतो.
आरोग्यावर वाईट परिणाम होतो
खरी फुले रोजच्या रोज बदलली जातात. मात्र खोटी फुले दिवसेंदिवस तशीच तशी राहतात. त्यावर धूळ, माती बसून आजारांना आमंत्रण मिळते. कीटकांचा, जीवजीवाणूंचा वावर वाढतो. त्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावरही होतो. कृत्रिम फुलांमुळे डोकेदुखी, मायग्रेन, मानसिक ताण, चक्कर येणे, ताप, यांसारख्या समस्या वाढतात. विशेषत: महिलांना या समस्या लवकर होतात, त्यामुळे ही बनावट फुले शक्यतो टाळावीत.
दिखावा करण्याची सवय वाढते
वास्तूनुसार घरामध्ये कृत्रिम फुले लावल्याने घरातील सदस्यांमध्ये खोटे बोलण्याची आणि दिखाऊपणाची वृत्ती वाढते. यामुळे त्यांना वास्तविक जगापासून दूर असलेल्या काल्पनिक आणि कृत्रिम जगात जगण्याची सवय होते, ज्यामुळे त्यांचे समाजापासून वेगळेपण वाढते. दिखाव्याच्या वृत्तीमुळे घरातील लोकांमधील आपुलकी कमी होते आणि वैमनस्य वाढते. त्यामुळेच अशी फुले घरात न लावलेलीच बरी!