प्रत्येक घरात झाडू ठेवलेला आढळतो. घराच्या स्वच्छतेसाठी झाडूचा वापर केला जातो. शिवाय त्याची लक्ष्मी म्हणूनही पूजा केली जाते. ते कशासाठी? ते समजून घेऊ. झाडूमुळे घरातली घाण बाहेर पडते व स्वच्छता, पावित्र्य आणि संपत्ती आपोआप येते. स्वच्छता आणि पावित्र्य यांमुळे घराचे दारिद्रय दूर होते आणि लक्ष्मीचा गृहप्रवेश होतो. आर्थिक अडचणी दूर होतात. त्यामुळे झाडूला लक्ष्मी मातेचे रूप मानले गेले आहे.
झाडूच्या रचनेवरून एक महत्त्वपूर्ण संदेश मिळतो. तोच संदेश संत गाडगे बाबांनीसुद्धा दिला होता. मोळ नावाच्या गवतापासून किंवा शिंदीच्या झाडाच्या पानांपासून झाडू बनवला जातो. तो एकत्रपणे घट्ट बांधलेला असतो. नव्हे तर अनेक घरांमध्ये आजही विकतचा झाडू नव्हे तर झाडू विक्रेत्यांकडून झाडू बांधून घेतात. झाडूची घट्ट गाठ एकात्मतेचे महत्त्व दर्शवते. एकात्मता नसेल तर देश, समाज, प्रदेश, घर यातील घाण साफ होऊ शकणार नाही.
वास्तू शास्त्रानुसार घराच्या सुख-समृद्धीमध्ये झाडूचा महत्त्वाचा सहभाग असतो. ज्या घरात झाडूची काळजी घेतली जाते त्या घरात सकारात्मकता दिसून येते. झाडूबाबत काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात व त्यासाठी झाडू खरेदीचे नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
>> जर तुम्हाला नवीन झाडू घ्यायचा असेल तर शनिवारीच खरेदी करा. शनिवारी घरात नवीन झाडू वापरणे खूप शुभ मानले जाते. म्हणजेच जुना झाडू बदलायचा असेल तर तो शनिवारीच बदलावा.
>> जेव्हाही तुम्ही नवीन घरात जाल तेव्हा नवीन झाडू घ्या. नवीन झाडूच्या वापराने नवीन वास्तूमध्ये सुख समृद्धी येईल.
>> वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला झाडू ठेवणे सर्वात योग्य आहे, जर हे शक्य नसेल तर झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे बाहेरच्या लोकांची दृष्टी पडणार नाही.
>> झाडू स्वयंपाकघर आणि धान्य साठवणुकीच्या खोलीत ठेवू नये, यामुळे आजारपण आणि गरिबी येते. शक्यतो अंगणात किंवा स्वयंपाक घराच्या बाल्कनीमध्ये ठेवा.
>> एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की झाडू कधीही जाळू नये. जुना झाडू टाकायचा असल्यास तो केराच्या टोपलीत न टाकता पाला पाचोळ्यात किंवा एखाद्या आड वळणाच्या झाडापाशी टाकावा.
>> शक्यतो सायंकाळी केर काढू नये कारण त्यावेळी घरात लक्ष्मी येत असते. काही कारणाने रात्री केर काढावा लागला तरी केर भरून टाकू नका, तो दुसऱ्या दिवशीच भरावा.
>> घरात झाडू कधीही उभा ठेवू नका, झाडू नेहमी आडवा ठेवावा किंवा एखाद्या कोनाड्यात गवताची दिशा खाली राहील अशा बेताने ठेवावा.
>> जर एखादी व्यक्ती तुमच्या घरातून बाहेर पडली तर किमान अर्ध्या तासानंतरच केर काढावा.
>> झाडूवर पाय ठेवल्याने लक्ष्मीचा अनादर होतो, म्हणूनच झाडूला पाय लागताच नमस्कार करावा.
>> रात्री झोपण्यापूर्वी झाडू मुख्य दरवाजाजवळ ठेवा आणि झोपा. यामुळे रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करू शकत नाही असेही म्हटले जाते.
>> या सर्व कारणांमुळे आपण धनत्रयोदशीला नवीन झाडू खरेदी करतो आणि लक्ष्मी पूजेला त्याचे पूजन करतो.