- फा. फ्रान्सिस दिब्रिटोमानवी प्रजाती जितक्या प्राचीन तितक्या त्यांच्या संस्कृती अधिक संपन्न असतात, हा अनुभव १९६८ मध्ये आला. कार्यानुभवासाठी आम्ही तीन-चार ब्रदर्स तलासरीच्या सावरपाडा पाड्यावर गेलो होतो. आदिवासीच्या झोपडीत राहण्याची सोय होती. कुडाच्या भिंती, सारवलेली जमीन व झावळ्यांचे छप्पर अशी ती झोपडी. रात्री आम्ही ओटीवरच झोपत असू. त्या ओटीला लागून शेळ्या-मेंढ्या बांधलेल्या होत्या. दारासमोर निष्ठावान कुत्रा राखण करीत होता. ‘वसुधैव कुटुंबकम्’ संकल्पनेचा जिवंत अनुभव घेत होतो. दिवस उन्हाळ्याचे होते, तरी उत्तररात्री गार वारा सुटला होता. आत आदिवासी कुटुंब डाराडूर झोपलं होतं. पहाटे कोंबड्याच्या आरवण्याने पाडा जागा झाला. आम्ही विहिरीवर जाऊन चूळ भरली. झुडपाच्या काडीने दात स्वच्छ करून इतर आन्हिके पार पाडली. खऱ्या अर्थाने आदिवासी जीवन जगलो. आदरातिथ्याने भारावून गेलो. मनाच्या श्रीमंतीची प्रचिती आली. निरोपाच्या आदल्या दिवशी मटनाचा बेत केला होता. निरोप देताना त्यांचीही मने भरून आली होती. आमच्या प्रेमाची आठवण व कृतज्ञता म्हणून आम्ही काही नोटा त्यांच्या हातात कोंबण्याचा प्रयत्न केला; पण व्यर्थ. उलट पाहुण्यांना रिकाम्या हाती कसं पाठवायचं या जाणिवेने त्यांनी परसातील भाजी दिली. सोयी-सुविधांपासून हे पाडे कोसो मैल दूर आहेत. पंचवार्षिक योजना त्यांच्यापर्यंत तितक्याशा पोहोचल्या नव्हत्या. मात्र, मिशनऱ्यांनी साठ-सत्तर वर्षांपूर्वी हे पाडे कर्मभूमी मानली. आरोग्य व शिक्षणाशिवाय आदिवासींचा विकास अशक्य आहे हे लक्षात घेऊन कार्य सुरू केले. गोदाताई परूळेकर यांनी सामाजिक जाणिवा रुजविण्यासाठी येथे अथक प्रयत्न केले. आदिवासी संस्कृतीत अनेक संपन्न गोष्टी आहेत. त्यांची चित्रशैली जगात गाजतेय. दिलीप बाहोटेने जर्मनीत आदिवासी चित्रशैलीचा आविष्कार केला आहे. तसेच अनेक आदिवासी बंधू-भगिनी शिक्षक-शिक्षिका बनून, तर काही शासकीय आस्थापनात नोकऱ्या करून मुख्य प्रवाहात येत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे.
वसुधैव कुटुंबकम् अनुभवलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 5:13 AM