वटवृक्ष हा एक पवित्र महावृक्ष म्हटला जातो. कुरुक्षेत्री देवांनी यज्ञ केला, त्या वेळी सोमचमसाचे मुख त्यांनी खालच्या बाजूला करून ठेवले. त्यातून एक वटवृक्ष बनला, अशी शतपथ ब्राह्मणात वटवृक्षाच्या उत्पत्तीची कथा आहे.
वड हा यज्ञीय वृक्ष असून यज्ञपात्रे याच झाडाच्या लाकडाची बनवतात. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी प्रलयकालीन जलात भगवान श्रीविष्णू बालरूपात वटपत्रावर शयन करतो अशी पौराणिक कथा आहे. ब्रह्मदेव वडाच्या झाडावर निवास करते अशी हिंदू धर्मियांची धारणा आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया या वृक्षाची अखंड सौभाग्य राहावे, या एकमेव भावनेने मनोभावे पूजा करतात.वड हा मंजिराच्या जातीचा वृक्ष असून रस्त्याच्या कडेला छायेसाठी हे वृक्ष लावतात.
कृष्णवट नावाचा एक वडाचा प्रकार आहे. त्याची पाने किंचित वाकलेली असल्यामुळे ती द्रोणासारखी दिसतात. एके दिवशी गोपालकृष्ण गाईना घेऊन रानात गेला असता, गोपी लोणी घेऊन तिथे गेल्या व आपल्या प्रिय कृष्णाला त्यांनी लोणी दिले. लोणी पुष्कळ होते, म्हणून मनामनात समरसतेचा भाव जागवणाऱ्या कृष्णाने आपले खेळाडी, सवंगडी व गवळी यांना ते वाटले. त्यासाठी कृष्णाने जवळच असलेल्या वडाची पाने तोडून ती जराशी मुडपून घेतली. तेव्हापासून त्या वडाची पाने तशीच द्रोणासारी बनली आणि बीजापासून निर्माण झालेल्या वडांना तशीच पाने येऊ लागली, अशी आख्यायिका आहे. अशा वटवृक्षाला कृष्णवट म्हणतात.
प्रयाग येथील अक्षय वटवृक्षाखाली प्रभू श्रीराम, सीतामाई व लक्ष्मण यांनी आश्रय घेतला होता, अशी दंतकथा आहे. या अक्षयवटापासून उत्पन्न झालेल्या वटवृक्षाची अलाहाबाद किल्ल्याजवळच्या एका भुयारातील मंदिरात अद्यापीही लोक भक्तिभावनेने पूजा करतात. बडोद्यातील लालवहिया जमातीचे लोक फक्त वडाचीच पूजा करतात.
वटवृक्ष हा भगवान शिवाचे निवासस्थान असून मानवी संसाराप्रमाणेच वटवृक्षाचा विस्तार सदोदित होत राहतो. त्याच्या पारंब्या पुन्हा पुन्हा मूळ धरतात आणि आपल्या अस्तित्त्वाचे अमरत्व सिद्ध करतात. म्हणूनच वटवृक्षाला संसारवृक्षाचे प्रतीक मानतात. प्राचीनकाळी ऋषी-मुनी केस घट्ट चिकटून राहून शुद्ध राहण्यासाठी आपल्या जटांना वडाचा चीक लावत असत.
भगवान बुद्धांना वटवृक्षाखाली दिव्य ज्ञानाचा साक्षात्कार झाल्यामुळे बौद्धधर्मीय या झाडाला अतिशय पवित्र मानतात. वटवृक्षाला सामर्थ्य आणि पावित्र्याचेही प्रतिक मानतात.
वडाचा विस्तार, त्याची दाट सावली, त्याची भव्यता यांनी मानवाच्या मनात आदराचे स्थान प्राप्त केले आहे. मनुष्य मात्रांसाठीच तो जणू खाली वाकतो. भव्यता असूनही विनम्र भाव व्यक्त करतो. त्याच्या पारंब्या वरून खाली येतात म्हणून या वृक्षाला 'न्यग्रोध' म्हणतात. मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात बडचिचोली येथे एक वटवृक्ष अडीच एकर भूमीवर पसरलेला आहे. बिहारमधील कमितीत येथील वृक्ष, गुजराथमधील नर्मदेच्या मुखाजवळील कबीरवट, कलकत्त्याच्या शिवपूर बोटॅनिकल बागेतील वड व अड्यार येथील वड हे वृक्षही प्रचंड असून त्यांच्या छायेत चार-पाच हजार लोक बसू शकतात.
वटवृक्ष हे प्रेमिकांना सोयीचे व निवांतपणाचे संकेतस्थान असल्याचा सुखद उल्लेख गाथासप्तशतीत आहे. वटवृक्षातून बाहेर सोडल्या जाणाऱ्या कर्बवायूबरोबरच बाष्पाचे प्रमाण अधिक असल्याने तो इतर वृक्षांपेक्षा अधिक गारवा देतो, असे म्हणातात.
वडाची पाने सूज वा ठणका आलेल्या जागेवर गरम करून तेल तूप लावून बांधतात. पारंब्यांचा काढा रक्तवर्धन व शक्तिवर्धक असतो. फळेही बुद्धीवर्धक असतात, असे आपले शास्त्र सांगते.
असा हा महावृक्ष मानवाला वरदानच आहे.