Vat Purnima 2023: ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा असेही संबोधले जाते. या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनी वडाची साग्रसंगीत पूजा करतात. वटपौर्णिमा हे व्रत पूर्वी तीन दिवसांचे असे. त्याला वटसावित्री व्रत असे म्हणतात. मात्र, तीन दिवसांचे व्रताचरण शक्य नसेल, तर वटपौर्णिमेच्या दिवशी हे व्रत केले जाते. एक वटवृक्ष शंभर माणसांना शंभर वर्षे पुरेल एवढा प्राणवायू देतो. अशा ह्या वृक्षाची रोपे सौभाग्यवायन म्हणून आपल्याला शक्य असतील तेवढी द्यावीत, असे सांगितले जाते. यंदाच्या वर्षी शनिवारी, ३ जून रोजी आहे.
सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सौभाग्यलंकार परिधान करून वडाचे पूजन केले जाते. आधुनिक काळात वडाची फांदी घरी आणून त्याचे पूजन करण्याची प्रथा सुरू झाली आहे. मात्र, तसे करू नये, असा सल्ला दिला जातो. निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली. त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन पूजा करणे अधिक संयुक्तिक मानले जाते. वटपौर्णिमेला वटसावित्रीचे व्रताचरण पूर्ण झाल्यानंतर वटसावित्रीची आरती आवर्जून म्हणवी.
वटसावित्रीची आरती
अश्वपती पुसता झाला।। नारद सागंताती तयाला।।अल्पायुषी सत्यवंत।। सावित्री ने कां प्रणीला।।आणखी वर वरी बाळे।। मनी निश्चय जो केला।।आरती वडराजा।।१।।
दयावंत यमदूजा। सत्यवंत ही सावित्री।भावे करीन मी पूजा। आरती वडराजा ।।धृ।।ज्येष्ठमास त्रयोदशी। करिती पूजन वडाशी ।।त्रिरात व्रत करूनीया। जिंकी तू सत्यवंताशी।आरती वडराजा ।।२।।
स्वर्गावारी जाऊनिया। अग्निखांब कचळीला।।धर्मराजा उचकला। हत्या घालिल जीवाला।येश्र गे पतिव्रते। पती नेई गे आपुला।।आरती वडराजा ।।३।।
जाऊनिया यमापाशी। मागतसे आपुला पती। चारी वर देऊनिया।दयावंता द्यावा पती।आरती वडराजा ।।४।।
पतिव्रते तुझी कीर्ती। ऐकुनि ज्या नारी।।तुझे व्रत आचरती। तुझी भुवने पावती।।आरती वडराजा ।।५।।
पतिव्रते तुझी स्तुती। त्रिभुवनी ज्या करिती।। स्वर्गी पुष्पवृष्टी करूनिया। आणिलासी आपुला पती।। अभय देऊनिया। पतिव्रते तारी त्यासी।।आरती वडराजा ।।६।।