मोबाईल वापरत नाही अशी व्यक्ती सापडणे आजच्या घडीला दुर्मिळ आहे. माहीत नाही अशी व्यक्ती तर अस्तित्त्वातच नाही. पण मोबाईल माहीत आहे, घेण्याची क्षमताही आहे, तरी घेत नाही. का? तर त्याची गरज वाटत नाही. एक दोघांना नव्हे तर पूर्ण गावाला. हे गाव आहे कुरमग्राम! श्रीकाकुलम जिल्हा आंध्र प्रदेशात येतो. हे गाव याच जिल्ह्यातील आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे हे वैदिक गाव आहे. शतकानुशतके आपले पूर्वज जसे जगत होते तीच जीवनशैली आजच्या काळातही या गावात अनुसरली जाते.
कुरमग्राममध्ये ना वीज आहे ना इंटरनेट. मनोरंजनासाठी दूरदर्शनही नाही. कोणत्याही घरात स्वयंपाकाचा गॅस नाही, तर चुलीवर अन्न शिजवले जाते. आधुनिक वस्तू, उपकरणे, गॅजेट्स कोणाकडेही नाहीत. हे लोकही मोबाईल वापरत नाहीत. संपूर्ण गावात एकच लँडलाईन फोन आहे. गावातले सगळे लोक त्या एकमेव फोनचा वापर करतात.
गरिबी नाही, भौतिक गोष्टींचा आपणहून केला त्याग:
गावाची अवस्था वाचून तुम्हाला वाटेल की इथले लोक खूप गरीब आहेत. कदाचित गरिबीमुळे हे लोक आधुनिक शैली आत्मसात करू शकले नाहीत. परंतु तसे नसून येथील लोकांनी स्वतःहून सर्वस्वाचा त्याग केला आहे. इथले लोक 'साधी राहणी, उच्च विचारसरणी' या संकल्पनेचे पालन करतात. गावात १४ कुटुंबे आणि काही कृष्णभक्त राहतात, ज्यांनी आपले जीवन कृष्णाच्या भक्तीसाठी समर्पित केले आहे.
कुर्मा गाव श्रीकाकुलमपासून ६ किलोमीटर अंतरावर आहे. गावातील घरे ९व्या शतकातील श्रीमुख लिंगेश्वर मंदिराच्या धर्तीवर बांधलेली आहेत. येथील लोकांचा दिवस पहाटे साडेतीन वाजता सुरू होतो आणि संध्याकाळी साडेसात वाजता गावातील सर्व लोक झोपी जातात. गावातील लोक कपडे विणतात, भाजीपाला आणि धान्यही पिकवतात. स्वतःचे जेवणही स्वतःच बनवतात. कोणी कोणावर अवलंबून नाही. तिथे येणाऱ्या पर्यटकांना ते अन्न प्रसाद म्हणूनही खाऊ घालतात.
३०० वर्षांपूर्वीची जीवनशैली
गावात राहणारे राधा कृष्ण चरण दास यांनी कृष्ण भक्तीत रममाण होऊन आपली आयटीची नोकरी सोडली आणि ते शिक्षक झाले. त्यांनी साधी राहणी स्वीकारली कारण पूर्ण गावावर तसे संस्कार होते. आपले पूर्वज ३०० वर्षांपूर्वी जसे जीवन जगत असतील, तसेच जीवन तेथील लोक जगतात. नटेश्वर नरोत्तम दास हे या गावातील गुरुकुलाचे प्रमुख आहेत. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे आपण जीवन जगतो, असे ते सांगतात.
स्वयंपाक चुलीवरचाच
गावाची उपजीविका जमीन आणि गायींवर अवलंबून आहे. पूर्वी जशी वस्तू विनिमय पद्धत होती, अर्थात वस्तूच्या मोबदल्यात वस्तू देण्याची पद्धत होती, ती पद्धत आजही त्या गावात दिसून येते. त्यांनी सांगितले की गावातील लोक कडधान्ये, तृणधान्ये, फळे आणि भाजीपाला स्वतःच पिकवतात. उरलेल्या वस्तू गावातील इतर लोकांकडून घेतल्या जातात. गॅस किंवा अन्य आधुनिक पद्धत न वापरता चुलीवर स्वयंपाक करतात.
गुरुकुलात दिवस
गावातील गुरुकुलात मुलांना वैदिक पद्धतीने शिकवले जाते. त्यांना नैतिकतेचे आणि आदर्शांचे धडे दिले जातात. ब्रह्म मुहूर्तावर सगळे उठतात. शुचिर्भूत होऊन साडेचारपर्यंत मंगला आरती केली जाते आणि जप केला जातो. जप झाल्यावर गुरुपूजा केली जाते आणि त्यानंतर सर्वजण वाचन करायला बसतात. सकाळी ९ वाजता अध्ययन वर्ग सुरू होतात.
सर्व विषयांचा अभ्यास
गुरुकुलमध्ये शिकणाऱ्यांना गणित, विज्ञान, संस्कृत, तेलगू, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, कला आणि महाभारत शिकवले जाते. तसेच ऐतिहासिक प्रसंग उभे करून प्रात्यक्षिक दाखवले जाते.
कबड्डीसारखे खेळ खेळले जातात
गुरुकुलमध्ये, ज्ञानार्जनाकडे आत्म-साक्षात्काराचे साधन म्हणून पाहतात. त्यात केवळ पाठयपुस्तकातील शिक्षण नाही तर सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. यासाठीच पोहण्यापासून ते कबड्डी व इतरही मैदानी खेळ खेळले जातात.
भक्तीवृक्ष, भक्तीशास्त्र आणि भक्तिवैभव यांचा अभ्यास
येथे मुलांना भक्तीवृक्ष, भक्तीशास्त्री आणि भक्ती वैभव या तीन अभ्यासक्रमांची करायची निवड असते. या तीनपैकी प्रत्येक अभ्यासक्रमाला सुमारे १० वर्षे लागतात. त्याच्या पुढील अभ्यासक्रमांमध्ये स्वारस्य लक्षात घेऊन, त्याला तामिळनाडूतील सेलम येथील वैदिक विद्यापीठात पाठवले जाते. तथापि, तो/तिने पुढील अभ्यास किंवा नोकरी निवडायची हे विद्यार्थ्यावर अवलंबून आहे.
बाहेरच्या जगाबद्दल बेफिकीर
कूर्मग्राममधील रहिवाशांना त्यांच्या आश्रमाबाहेर काय घडते याची पर्वा नाही, परंतु त्यांना अभ्यागतांकडून सतत बातम्या मिळतात. गावाची कीर्ती वाढल्याने येथे येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आठवड्याच्या दिवशी शेकडो आणि रविवारी हजारो लोक येतात. तेलंगणा आणि इतर किनारी आंध्र जिल्ह्यांमधून येथे आश्रमात येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे.
परदेशीही इथे येऊन राहतात
या गावातले विद्यार्थी आश्रमाच्या आसपासच्या गावांमध्ये अध्यात्म आणि वैदिक ज्ञानाचा प्रसार करत आहेत. आश्रम आणि गुरुकुलात येणाऱ्या हजारो लोकांना अध्यात्मिक ज्ञान आणि कृष्णभावना शिकवली जाते. इथे परदेशातूनही लोक येतात. त्यांनी आश्रमाची तत्त्वे पाळली तरच त्यांना आश्रमात राहण्याची परवानगी मिळते. अर्जेंटिनामध्ये जन्मलेल्या आणि आता इटालियन नागरिक असलेल्या रुपा रघुनाथ स्वामी महाराज ४० वर्षांपूर्वी १९७८ मध्ये भारतात येऊन स्थिरावले.
निसर्गावर विश्वास:
नृहरी दास नावाचा रशियन नागरिक या गावाचा कायमचा रहिवासी झाला आहे. ते सांगतात की, प्राचीन वैदिक ज्ञान मला या भूमीवर घेऊन आले आहे. अध्यात्मिक मार्गाचा अवलंब करणाऱ्या लोकांना कशाचीही काळजी करण्याची गरज नाही कारण त्यांच्या कठोर जीवनशैलीमुळे निर्माण झालेल्या त्यांच्या गरजांची काळजी निसर्गानेच घेतली आहे.