हिंदू धर्मात विनायक चतुर्थीचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते. नुकताच पौष मास सुरु झाला आहे. त्यामुळे २६ डिसेंबरला पौषातली विनायक चतुर्थी आली आहे. संकष्टी इतकेच विनायकीलाही महत्त्व असते. या तिथीला उपास केला नाहीत तरी बाप्पाच्या पूजेत पुढील उपचार जरूर करा.
हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचे, तिथीचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. त्या दिवशी देवतांची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात असे शास्त्रात सांगितले आहे. चतुर्थी ही बाप्पाची आवडती तिथी. मग ती संकष्टी असो नाहीतर विनायकी. दोन्ही तिथीला बाप्पाची पूजा केली जाते. त्याच्या आवडीचा नैवेद्य समर्पित केला जातो. आज वर्षातील शेवटची विनायकी चतुर्थी आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया उपचार.
प्रत्येक पूजेमध्ये गणेश पूजेला पहिला मान असतो. बाप्पाला दुर्वा वाहून तसेच जास्वंदाचे फुल वाहून आपण पूजा करतो. त्यात लवंग आणि वेलदोडा अर्थात वेलचीचाही समावेश करावा असे सांगितले आहे.
धार्मिक ग्रंथानुसार विनायक चतुर्थीच्या दिवशी गणेशाला दुर्वांचा हार किंवा २१ दुर्वा अर्पण करा. तसेच घराच्या मुख्य दारावर किंवा उंबरठ्यावर जास्वंदाचे फुल दोन्ही कोपऱ्यात ठेवा. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल.
त्याचबरोबर देवाला लाडू, मोदक, शिरा, खडीसाखर किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी त्या जोडीला पाच वेलची आणि पाच लवंगा एका वाटीत ठेवून त्याचाही नैवेद्य दाखवा आणि नैवेद्य दाखवून झाल्यावर त्या आपल्या रोजच्या जेवणात प्रसाद म्हणून समाविष्ट करा. शक्य असल्यास त्यापासून बनवलेले एखादे मिष्टान्न गरजू व्यक्तीला दान करा.
सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्तीसाठी बाप्पाचे अथर्वशीर्ष मनोभावे म्हणा. पाठ नसेल तर श्रवण करा. अथर्वशीर्षाची २१ आवर्तने करता आली तर उत्तम. तसे शक्य नसेल तर पुढे दिलेले श्लोक तसेच मंत्र म्हणा.
- वक्र तुंड महाकाय, सूर्य कोटि समप्रभ: ।निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा ।।
- नमामि देवं सकलार्थदं तं सुवर्णवर्णं भुजगोपवीतम्ं ।गजाननं भास्करमेकदन्तं लम्बोदरं वारिभावसनं च ।।
- गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारु भक्षणम्ं।उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् ।।
- सर्वाज्ञाननिहन्तारं सर्वज्ञानकरं शुचिम् ।सत्यज्ञानमयं सत्यं मयूरेशं नमाम्यहम् ।।
- गणेश गायत्री मंत्र- एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात् ।।