गणपती बाप्पा विघ्नांचा नाश करणारा आहे. भक्ताने पूर्ण भक्तीभावाने त्याची पूजा केली तर बाप्पा त्याचे सर्व संकट दूर करतो. विशेषत: चतुर्थी तिथी बाप्पाला समर्पित केली आहे. संकष्टीचा उपास आपण करतोच त्याबरोबर विनायक चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. अशातच २३ फेब्रुवारी रोजी गुरुवारी विनायक चतुर्थीला विशिष्ट योग जुळून येत आहेत, त्याचा लाभ मिळावा म्हणून पुढील गोष्टींचे पालन करा.
प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील दोन्ही चतुर्थी तिथी गणेशाला समर्पित केलेली असते. शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी म्हणतात. यावेळी विनायक चतुर्थीच्या दिवशी ४ शुभ योग तयार होत आहेत. त्यामुळे या तिथीचे महत्त्व वाढले आहे.
मुहूर्त
फाल्गुन मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी २३ फेब्रुवारीला पहाटे ३.२४ मिनिटांनी सुरू होईल आणि २४ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३३ मिनिटांनी समाप्त होईल. अशा परिस्थितीत २३ फेब्रुवारी रोजी उदय तिथीला विनायक चतुर्थी व्रत पाळण्यात येणार आहे. या दिवशीच्या पूजेच्या शुभ मुहूर्ताबद्दल सांगायचे तर तो सकाळी ११.२६मिनिटांपासून दुपारी १.४३ मिनिटांपर्यंत असणार आहे.
४ शुभ योग
यावेळी विनायक चतुर्थीला ४ शुभ योग तयार होत आहेत. पहिला शुभ योग पहाटेपासूनच सुरू होईल, जो रात्री ८. ५८ मिनिटांपर्यंत राहील. यानंतर शुक्ल योग सुरू होईल, जो रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत राहील. त्याचबरोबर विनायक चतुर्थीच्या दिवसभर रवि योग राहील. हे सगळे योग लाभदायी ठरणार आहेत. या काळात केलेली खरेदी शुभ परिणाम देते, महत्त्वाचे निर्णय फळतात, नवे नातेसंबंध, नवे काम यांचा श्रीगणेशा करण्यासाठी हा मुहूर्त नव्हे तर पूर्ण दिवस शुभ ठरणार आहे.
अशी होईल इच्छापूर्ती -
सकाळी उठून स्नान करावे. बाप्पाची पूजा करावी. पाठ असलेला श्लोक किंवा स्तोत्र म्हणावे. बाप्पाची आरती म्हणावी आणि आपला मनोदय त्याच्यासमोर व्यक्त करावा. बाप्पाला वाहिलेल्या दुर्वा दुसऱ्या दिवशी पूजा झाल्यावर निर्माल्यात न टाकता आपल्या पाकिटात किंवा तिजोरीत जपून ठेवाव्यात. रोज त्यांचे दर्शन घ्यावे आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत, बाप्पाची कृपा लाभते.