कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य असो, सर्वप्रथम गणपतीची पूजा केली जाते. तसे करणे धर्मशास्त्राला अभिप्रेत आहे. म्हणून बालपणीपासून आपल्यावर तसा संस्कारही करण्यात आला आहे. गणपती बाप्पा हा मंगलमूर्ती आहे आणि विघ्नहर्ता अशीही त्याची ओळख आहे. म्हणूनच आज अंगारक विनायकीच्या मुहूर्तावर ज्योतिष शास्त्राने सुचवलेले उपाय करा आणि ग्रहदोषातून मुक्ती मिळवा.
संकष्टीप्रमाणे अनेक जण विनायक चतुर्थीलाही उपास करतात आणि बाप्पाची उपासना करतात. ज्योतिष शास्त्र सांगते, की यंदा अंगारक विनायकी हा योग अतिशय उत्तम जुळून आला आहे. ग्रहदशा अनुकूल आहे. अशा स्थितीत तुम्ही तुमच्या कुंडलीतील ग्रहदोष निवारण करण्यासाठी प्रयत्न केलेत, तर त्याचा निश्चितच फायदा होईल. त्यासाठी काही खास टिप्स पुढीलप्रमाणे-
या दिवशी महाबली हनुमानाची पूजा करावी. तसे केले असता ज्या लोकांच्या कुंडलीत राहू-केतू किंवा मंगल दोष असतो. त्या दोषाचे निवारण होण्यास मदत होते. गणपती बाप्पा हा जरा अमंगळाचे मंगल करणारा आहे, तसा हनुमानसुद्धा मंगलकारी आहे. त्यामुळे आजच्या दिवशी बाप्पाची आणि हनुमंताची उपासना, स्तोत्रपठण, मंदिरात जाऊन घेतलेले दर्शन परिणाम कारक ठरते. त्यानिमित्ताने अथर्वशीर्षाचे तसेच मारुती स्तोत्र, हनुमान चालिसाचे पठण किंवा श्रवण करावे. गरजूंना यथाशक्ती दान करावे आणि आपले कार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून दोन्ही देवतांना मनोभावे प्रार्थना करावी. तसे केले असता हा सुमुहूर्त तुमची ग्रहपीडा नक्कीच दूर करेल!