जर तुम्ही या वर्षी २०२५ मध्ये लग्न करण्याचा विचार करत असाल, तर एप्रिल महिन्यापासून लग्नासाठी पुन्हा एकदा शुभ काळ सुरू झाला आहे. एप्रिल ते डिसेंबर (Vivah Muhurta 2025) या कालावधीतील लग्नाच्या अनेक तारखा आहेत, त्याबरोबरच कोणते चार महिने शुभ कार्यावर निर्बंध येईल त्याबद्दल जाणून घेऊ.
लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो. लग्न केवळ दोन व्यक्तींचे मिलन नाही तर दोन परिवार आणि संस्कृतींचा संगम देखील आहे. हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात लग्नासाठी शुभ मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की शुभ मुहूर्त आणि शुभ तिथीला केलेले विवाह यशस्वी होतात आणि वैवाहिक जीवन नेहमीच आनंदी राहते. असे मानले जाते की जर लग्नात मुहूर्त विचारात घेतला गेला नाही तर वैवाहिक जीवनात आव्हाने येऊ शकतात. यासाठीच, ज्योतिषी तुम्हाला लग्नासाठी असा मुहूर्त देतात ज्यामध्ये लग्न केल्याने तुमच्या आयुष्यात कायमची समृद्धी येईल.
२०२५ मध्ये लग्नासाठी अनेक शुभ तारखा आहेत, ज्या ग्रह, नक्षत्र आणि पंचांगानुसार निश्चित केल्या आहेत. या तारखा केवळ वैवाहिक जीवन यशस्वी करण्यासाठी महत्त्वाच्या नाहीत तर नवविवाहित जोडप्याचे जीवन सुरळीत आणि समृद्ध करण्यासाठी देखील महत्त्वाच्या आहेत. तुम्ही परस्पर प्रेम, सुसंवाद आणि आनंदाने परिपूर्ण व्हावे हा त्यामागील हेतू असतो.
लग्नाचा शुभ काळ ठरवण्यासाठी वधू-वरांची कुंडली, गोत्र, जन्म नक्षत्र आणि इतर ज्योतिषीय घटक विचारात घेतले जात असले तरी, काही अशा तारखा आहेत ज्यामध्ये कोणत्याही व्यक्तीने लग्न करणे शुभ असते. जर तुम्ही २०२५ मध्ये लग्न करणार असाल किंवा जर तुम्ही लग्नाचे नियोजन करत असाल किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्याच्या लग्नाच्या योग्य तारखा जाणून घ्यायच्या असतील, तर एप्रिल महिन्यापासून पुन्हा एकदा शुभ तारखा सुरू झाल्या आहेत. त्याबद्दल जाणून घेऊ.
एप्रिल २०२५ : एप्रिल महिना लग्नासाठी खूप शुभ मानला जातो आणि २०२५ मध्ये याच महिन्यात ३० एप्रिल रोजी अक्षय तृतीयेचा सण येत आहे, ज्यामुळे या महिन्याचे महत्त्व आणखी वाढेल. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी, तुम्ही शुभ मुहूर्ताचा विचार न करता लग्न करू शकता. या महिन्यात लग्नासाठी इतर शुभ तारखा १४, १६, १८, १९, २०, २१, २५, २९ आणि ३० एप्रिल आहेत.
मे २०२५ : मे महिन्यात उष्णता वाढू लागते, परंतु बरेच लोक हा काळ लग्नासाठी शुभ मानतात. जर तुम्हीही मे महिन्यात लग्न करण्याचा विचार करत असाल तर या महिन्यातील शुभ तारखा १, ५, ६, ८, १५, १७ आणि १८ मे आहेत.
जून २०२५: ज्योतिषशास्त्रानुसार जून महिन्यात लग्नासाठी काही शुभ तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. या तारखांना ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती अनुकूल असते, जी विवाह यशस्वी आणि आनंदी बनविण्यासाठी उपयुक्त मानली जाते. विशेषतः १, २, ४ आणि ७ जून या लग्नासाठी शुभ तारखा मानल्या गेल्या आहेत.
जुलै २०२५ : ज्योतिषशास्त्रानुसार देवशयनी एकादशीपासून प्रबोधिनी एकादशीपर्यंत भगवान विष्णू योगनिद्रामध्ये राहतात. या काळात विवाह आणि इतर शुभ कार्ये निषिद्ध आहेत. २०२५ मध्ये, देवशयनी एकादशी ६ जुलै रोजी येत आहे, त्यानंतर भगवान विष्णू चार महिने विश्रांती घेतील. हा कालावधी २ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीला संपेल.
नोव्हेंबर २०२५: नोव्हेंबर महिन्यात कार्तिकी एकादशीच्या दुसऱ्या दिवसापासून लग्न समारंभ सुरू होतात. या महिन्यात लग्नासाठी काही शुभ तारखा २, ३, ६, ८, १२, १३, १६, १७, १८, २१, २२, २३, २५ आणि ३० नोव्हेंबर आहेत.
डिसेंबर २०२५: ज्योतिषशास्त्रानुसार, या महिन्यात लग्नासाठी काही खास तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. या महिन्यातील शुभ तारखा ४, ५ आणि ६ डिसेंबर आहेत, ज्या वैवाहिक जीवन यशस्वी आणि आनंदी बनविण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. या दिवशी ग्रह आणि ताऱ्यांची स्थिती अनुकूल असेल, जी लग्नासाठी सकारात्मक ऊर्जा प्रदान करेल.