मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला राम जानकीचा विवाह झाला होता, ही तिथी विवाह पंचमी म्हणून ओळखली जाते. ६ डिसेंबर रोजी अयोध्येत भव्य विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कारण, अयोध्येत श्रीराम मंदिर बनल्यानंतर यंदा प्रथमच विवाह पंचमीचा सोहळा तिथे दिमाखदार पद्धतीने साजरा केला जाणार आहे. त्यासाठी काय काय तयारी केली आहे ते पाहू.
अयोध्येतील दशरथ महल, रंगमहल आणि जानकी महल मंदिराला सुंदर रोषणाई केली आहे.प्रभू श्रीरामांसाठी सोन्याचा सुंदर मुकुट मुंबईतून घडवून घेतला आहे. भरजरी वस्त्र आणि सुगंधी फुलांच्या सजावटीने गाभाऱ्यासहित सगळी अयोध्या सजली आहे.
अयोध्यावासियांचा उत्साह पाहता श्रीराम स्वयंवराच्या वेळी काय वातावरण असेल याची आपल्याला कल्पना करता येईल. अयोध्येत गल्लोगल्ली श्रीरामाच्या नावाचा जयघोष, गाणी, रामकीर्तन यांनी वातावरण भारावून गेले आहे.
मंगलवाद्यांची गर्दी
श्रीराम - जानकी विवाहात मंगल वातावरणनिर्मितीसाठी अनेक शहनाई वादकांचे पाचारण करण्यात आले आहे. शिवाय लग्न म्हटल्यावर मिरवणूकही ओघाने आलीच! त्यात वरातींना नाचत गात ठेका धरण्यासाठी ढोल-ताशे-नगारे यांसारखी वाद्यही सुसज्ज झाली आहेत.
लग्नमंडपाची शान
अयोध्या मंदिर उदघाटनाच्या वेळी केलेली सजावट तुम्ही पाहिली आहे, आता तर मंदिराबरोबरच स्वतंत्र लग्न मंडपही उभारला आहे आणि त्या मंडपाला विविधरंगी फुलांनी सुशोभित केले आहे. यानिमित्ताने मंडपात अनेक धार्मिक कार्याचे आयोजन केले आहे.
अयोध्येत सर्व मठ, मंदिर राममय होणार
अयोध्येतील सर्व प्राचीन मठ आणि मंदिरांमध्येही विवाह सोहळ्याचा उत्साह बघायला मिळणार आहे. काही ठिकाणी रामाची पूजा केली जाते तर काही मठांमध्ये जानकी मातेची पूजा केली जाते आणि काही मठामध्ये रामाची पूजा केली जाते. मात्र विवाह सोहळ्याला दोन्ही बाजूचे उपासक एकत्र येऊन हा सोहळा साजरा करणार.
रंगमहाल मंदिराचा मंडप ३०० वर्ष जुना
रंगमहल मंदिराचा मंडप ३०० वर्ष जुना आहे. या मंडपात राम जानकी विवाह सोहळा रंगतो. या सोहळ्याचा प्रसाद म्हणून भाविकांना रामाचा धागा आणि सीतामाईचे सिंदूर दिले जाते. हा सोहळा केवळ अयोध्येत नाही तर भारतभर तसेच विदेशातही साजरा केला जातो. तुम्ही देखील तुमच्या परिसरातील राम मंदिरात हा सोहळा आनंदाने साजरा करा आणि रामराज्याची अनुभूती घ्या.