घर म्हटले की भांड्याला भांडे आपटणारच! त्यातही सासू सुनांचे वाद म्हणजे दोन पिढ्यांच्या परस्पर विरुद्ध विचारधारा, त्या एकत्र येणे कठीण! परंतु दोघींनी वेळोवेळी माघार घेऊन विषयाचा मध्य गाठायला हवा, अन्यथा घराची युद्धभूमी व्हायला वेळ लागणार नाही आणि अशा धुमसणाऱ्या घरात कोणाचेच मन शांत राहणार नाही. म्हणून सासू सुनेने सामंजस्य दाखवण्या बरोबर पुढील वास्तू टिप्सचा अवलंब करून पहावा. त्याचा नक्कीच उपयोग होईल.
>> घरात चंदनाची कोणतीही मूर्ती ठेवा. मात्र ती अशा दर्शनीय ठिकाणी ठेवा, जिथे सासू सूनेचेच नाही, तर घरातल्या प्रत्येक सदस्याची नजर जाईल. चंदनाच्या मूर्तीच्या दर्शनामुळे त्या मूर्तीची शीतलता बघणाऱ्याच्या नजरेत उतरते आणि मन शांत होऊन मनातील अढी दूर होते.
>> स्वयंपाक घराचा रंग उग्र नसावा. सासू सुनेचा अधिकतर वेळ स्वयंपाक घरात जातो. आधीच उद्विग्न झालेल्या मनावर घरातील गडद रंगसंगतीचा विपरीत परिणाम होतो. त्यात स्वयंपाक घरात सतत पसारा, चूल आणि मूल यांचा सतत वावर यामुळे ती जागा सतत वापरात असते. तो परिसर सौम्य आणि प्रसन्न रंगाचा असेल तर घरातील महिला वर्गाची मनःस्थिती उत्तम राहते.
>> घरात नवरा बायकोचे, कुटुंबाचे, मुलांचे छायाचित्र लावतो. ते केवळ शोभा वाढवण्यासाठी नाही, तर ते छायाचित्र आपल्याला सतत आपल्यातील ऋणानुबंधांची आठवण करून देत असते. त्याचप्रमाणे सासू आणि सुनेचे छायाचित्र छान फ्रेम करून एखाद्या भिंतीवर लावा. त्याचाही त्या दोघींच्या नात्यावर सकारात्मक परिणाम नक्कीच पडेल.
>> सासू सुनेच्या खोलीत नदीचे तसेच वाहत्या झऱ्याचे चित्र लावावे. त्यामुळे वाहत्या पाण्याप्रमाणे मनातील दूषित विचार वाहून जातील आणि नात्यात पारदर्शकता येण्यास मदत होईल.