सामान्य भाषेत मौन म्हणजे तोंडाने न बोलणे इतकाच अर्थ सीमित झालेला आहे. पण इतका तोकडा अर्थ घेतला तरीसुद्धा मौनाचे मोठमोठे फायदे आहेत. कारण ज्यावेळी तोंडातून शब्दांचा उच्चार होतो, त्यावेळी मेंदूमधील स्मृती, प्रत्यभिज्ञा, अनुभव इ. विविध दालने कार्यरत होऊन शरीरातील बरीच ऊर्जा खर्च होत राहते. शिवाय दुसऱ्याशी बोलण्याचा ऐकणाऱ्याच्या मनावर होणाऱ्या परिमाणातून फायदे तोटे होतात ते निराळेच. म्हणून निदान वाचिक मौन पाळले तरी बरेच फायदे दिसून येतात. सर्वात मुख्य फायदा म्हणजे इच्छाशक्ती प्रबळ होते, कशी ते पहा...
वाचिक मौन पाळताना काही जण पाटीवर, वहीवर लिहून दाखवतात किंवा हाताने, चेहऱ्याने खुणा करन मनातील आशय व्यक्त करतात. हा प्रकार म्हणजे मौनधारणाचा भंग होय. म्हणून शास्त्रानुसार मौन पाळावयाचे झाल्यास तोंडाने न बोलणे, हे जितके आवश्यक आहे तितकेच कोणत्याही व्यावहारिक गोष्टीचा विचार न करणे हेही आवश्यक आहे.
परमार्थसिद्धीसाठी व्यावहारिक गोष्टी नुसत्या वरवर टाळून चालत नाहीत, तर त्यांचा मनावर पुसटसाही विचार येऊ नये हा मौनाचा खरा अर्थ आहे. मौन काळात साधना, चिंतन, मनन या गोष्टी भरपूर प्रमाणात व्हाव्यात अशी अपेक्षा असते.
काही लोक अष्टमी, एकादशी, अमावस्या, पौर्णिमा अशांपैकी एखाद्या दिवशी मासिक मौन पाळतात. काहीजण पाक्षिक, तर काही जण साप्ताहिक मौन पाळतात. विशेषत: मौनादिवशी उपास घडल्यास ते मौन अधिक प्रभावी ठरते. काही जण दिवसातील एखाद तास मौन पाळतात. काही प्रगत साधक चातुर्मास अथवा एक किंवा बारा वर्षांचे मौन पाळतात.
मौन ही साधना प्राचीन तपश्चर्येचे छोटे रूप आहे. मौन धारण करणाऱ्या साधकाच्या अंगी एक प्रकारची दैवी शक्ती बाणते. त्याची इच्छाशक्ती व मनोबल अत्यंत प्रभावशाली बनल्यामुळे त्यांच्या ठायी काही सिद्धीचा वास दिसून येतो. प्रगतीनुसार अल्प, लघु, क्षुद्र अथवा महा सिद्धींचा लाभ त्यांना होत राहतो. ज्यावेळी व्यवहारिक समस्या उभी ठाकते तेव्हा मौन धारण केल्यास 'आतील आवाज' ऐकू येतो व योग्य दिशेने पाऊल उचलणे, योग्य निर्णय घेणे सहज शक्य होते.
मौनाचे महत्त्व पाहता दिवसातून एक तास नाहीतर किमान पंधरा मिनिटे तरी कायिक, वाचिक आणि मानसिक मौन पाळा आणि फरक अनुभवा.