- स्नेहलता देशमुखआनंद कुणाला नको असतो; पण तो मिळविण्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. माणसाला आपल्या डोळ्यांत येणाऱ्या अश्रूंचे दु:ख वाटत नाही; पण ते अश्रू पुसायला कुणी येत नाही याचे त्याला दु:ख होते. जीवनाच्या या प्रचंड धडपडीत क्षणभर थांबून भोवतालच्या नितळ आकाशाकडे आपण वेळ काढून पाहतो का? असा एखादा सौंदर्याचा कण पाहिला, तर केवढी मनाला उभारी येते. काळे ढग आले तरी त्या भोवतीची सोनेरी किनार आपण आठवतो का? ती आठवली तरी आपले मन शांत होईल; पण आपण आनंद शोधतो तो शरीराला ज्यातून सुख मिळते खाणं-पिणं, चित्रपट पाहणे, संगीत ऐकणे, भरजरी वस्त्र घेणे, अलंकार घेणे या कशातच आपल्या बंदिवान आत्म्याला मुक्त करण्याची ताकद नाही; पण चिमणीची चिवचिव, कोकिळ पक्षाची कुहूकुहू गुंजाकाची ताकद विलक्षण आहे. फुलपाखराचं या वेलीवरून त्या वेलीवर फिरणं किती मोहक असते. संध्याकाळी गाई घरा येताना त्यांच्या गळ्यांत त्या घंटांच्या मंजुळ नाद किती समाधान देतो; असे हे आनंदाचे सौंदर्याचे लहान-लहान थेंब आपण गोळा केले तर आनंदाचा महासागर निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. मिडास राजाच्या हव्यासापोटी त्याला मुलीला गमावावे लागले. कारण सोने अधिकाधिक मिळावे असे त्याला वाटले म्हणून त्याने वर मागितला. ज्या वस्तूला त्याचा स्पर्श होईल त्यांचे सोने होईल. त्याच्या अलिशान पलंगाला त्याचा स्पर्श झाला तो सोन्याचा झाला. त्यांची अत्यंत लाडकी कन्या खेळून महालात आली आणि तिने राजाला मिठी मारली ती सोन्याची पुतळी झाली. राजाला अतिव दु:ख झाले. त्याने पुन: प्रार्थना केली, मला सोने नको माझी सोन्यासारखी लेक मला हवी आहे. यातून असे दिसते की माणुसकी, प्रेम हे जास्त महत्त्वाचे आहे. प्रेमाने आनंद मिळतो. म्हणून म्हटले आहे ‘खरा तो प्रेमाचा न घरी लोभ मनी’ खरं प्रेम त्याग बुद्धीत असले ज्या प्रेमात कल्याणबुद्धी असते, तेच प्रेम खरे शुद्ध प्रेम असते.
आनंदाचे डोही, आनंद तरंग...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 2:54 AM