महाराष्ट्रामध्ये सातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी पंढरीच्या वारीची खांद्यावर घेतलेली भागवत धर्माची पताका आजसुद्धा तेवढ्याच उत्साहाने वारकरी खांद्यावर घेऊन नाचत आहेत. या पायी वारीची अखंड परंपरा संत नामदेव, संत तुकाराम व संत एकनाथ यांच्यासह वारकरी म्हणणाºया व मानणाºया सर्व संतांनी अखंडपणे जोपासली आहे. विठ्ठल नामाचा गजर करीत ते सर्वांना अध्यात्मिक समतेचा संदेश देत आहेत.या रे या रे लहानथोर। याती भलत्या नारी नर।भागवत धर्माच्या अध्यात्मिक परंपरेमध्ये संतांनी आपले जीवन समर्पित केले आहे. एवढी मोठी भक्तीची परंपरा लाभलेल्या वैष्णवांच्या वारीच्या निमित्ताने आषाढी एकादशीला सर्व संतांची मांदियाळी पंढरीला अवतरते. आपल्या प्राणसख्या पांडुरंगाला भेटण्यासाठी आपला जीव डोळ्यामध्ये साठवून पायी वारी करून ते पंढरीला येतात. मुखाने नाम गातातसकळ मंगळ निधी। श्री विठ्ठलाचे नाम आधी।।कोसो दुरून आलेले वारकरी आपला अवघा भाग व शीण त्या पांडुरंगाला पाहताक्षणीच विसरून गेलेले आहेत. त्यांना आता आपल्या संसाराचीसुद्धा कोणतीही काळजी राहिलेली नाही. कोणत्याही प्रश्नाशिवाय पंढरीच्या रायाला भेटण्यासाठी ते येथे आलेले आहेत. संत तुकाराम महाराज तर म्हणतात-यारे नाचो अवघे जण। भावे आनंदे करुन।।गाऊ पंढरीचा राणा। क्षेम देऊ संतजना।।सुख फुकासाठी। साधे हरिनाम बोभाटी।।प्रेम वाटितो उदार। देता नाही सान थोर।।तुका म्हणे धन्य काळ। आजि प्रेमाचा सुकाळ।।संतांच्या या मांदियाळीमध्ये आज सर्व जण समाविष्ट आहेत येथे कोणीही लहान नाही, मोठा नाही. समाजाच्या सर्व स्थरातील लोक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. एकमेकांना भेटताना साक्षात विठ्ठल त्यांना आपल्या अंत:करणाशी लावतो आहे असे त्यांना वाटते. एक प्रकारची अध्यात्मिक लोकशाहीच पंढरीला अवतरते. हरिनाम ते अतिशय प्रेमाने गातात व सर्व संतांना क्षेम देतात. संतांच्या या प्रेमाला चंद्रभागेच्या तीरावर भक्तीची अपार भरती येते. ही महापर्वणी ते आपल्या डोळ्यात साठवून ठेवतात. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी त्यांना विठ्ठलच दिसतो. अवघे विश्व विठ्ठलमय झाल्याचा भास त्यांना होतो. समत्ववाचा व विश्वरूप दर्शनाचा भाव त्यांच्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्यांना ईश्वर आपल्यापेक्षा वेगळा वाटतच नाही.जेथे देखे तेथे तुझीच पाऊले। विठ्ठल अवघे कोंदाटले।।रुप गुणनाम अवघा मेघश्याम। वेगळे काय ते काय उरले।।संत तुकारामांनी तर भक्तिसाधनेचा कळस गाठला. ही उच्चतम अवस्था त्यांना जी प्राप्त झाली त्याला महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांचा परमेश्वराविषयीचा उत्कट भाव आहे. भावानेच भक्तीला पूर्णत: येते. देव हा भावाचा भुकेला आहे. ज्याचा जसा भाव असेल तसा त्याचा देव असतो म्हणून.जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत।असा संदेश ते सर्वांना देतात. वारीच्या माध्यमातून असा विश्वसखाभाव निर्माण होत असतो. ती विश्वशांतीसाठी आवश्यक प्रार्थना आहे.
- डॉ. हरिदास आखर