तुम्ही म्हणाल या दोन वाक्यांमध्ये काय फरक आहे? तर नागरिकशास्त्रात बालपणी आपण शिकलो आहोत, 'मनुष्य हा समाजशील प्राणी आहे.' समाजशील अर्थात समाजात राहणारा. तो एकटा राहू शकत असला, तरी उदरनिर्वाहासाठी, सुरक्षेसाठी, भावभावनांच्या प्रगटीकरणासाठी समाजाची गरज लागतेच! त्यामुळे एकट्याने राहून कुढत जगण्यापेक्षा चांगले मित्र जोडावेत, चांगल्या विचाराच्या लोकांच्या संगतीत राहावे आणि एकमेकांना सहाय्य करावे, हीच शिकवण आपल्याला पूर्वापार मिळत आलेली आहे. याचे प्रात्यक्षिक आपण एका गोष्टीतून जाणून घेऊ.
एका जंगलात एक लांडोर होती. तिला एका मोराने लग्नाचा प्रस्ताव दिला. तिने विचारले, 'तुला मित्र किती आहेत?' मोर म्हणाला, 'मला कधी मित्रांची गरज वाटली नाही.'लांडोर म्हणाली, 'मग मलाही या विवाह प्रस्तावाची गरज वाटत नाही.'
मोराचा अहंकार ज्याला आपण इगो म्हणतो, तो दुखवला गेला. त्याने तिच्या बोलण्यावर चिंतन केले. तेव्हा एक कासव आणि ससा त्याचे सांत्वन करू लागले. त्यांच्याशी बोलल्यावर मोराचे मन मोरपिसासारखे हलके झाले. त्या तिघांची गट्टी जमली. ससा आणि कासवाने जंगलातल्या इतर प्राण्यांशी मोराची ओळख करून दिली. मनमोराचा पिसारा आणखीनच फुलू लागला. तो समाजशील झाला. त्याच्यात झालेला बदल पाहून लांडोर भाळली आणि तिने आपणहून लग्नाची तयारी दाखवली. सगळ्या प्राण्यांच्या उपस्थितीत लग्न थाटामाटात पार पडले.
एक दिवस जंगलात एक शिकारी आला. त्याने मोराचा पाठलाग केला. मोर जिवाच्या आकांताने पळत होता. वाटेत लांडोर दिसली. दोघे पळू लागले. ते एका तळ्याकाठी पोहोचले. पुढे जायचा मार्ग नव्हता. शिकारी पाठलाग करत तिथे पोहोचत होता. त्यांना घाबरलेले पाहून कासवाने धीर दिला. शिकाऱ्याचे लक्ष विचलित करण्यासाठी कासवाने पुढाकार घेतला. तोवर कावळे, चिमण्या, पोपट, बगळे यांनी वाघोबाला जाऊन निरोप दिला. आपल्या मित्रांच्या मदतीसाठी वाघोबा डरकाळी फोडत त्या दिशेने आला. आणि त्या आवाजाने घाबरत शिकारी जीव मुठीत घेऊन निघून गेला. मोराला हायसे वाटले. त्याक्षणी त्याला लांडोरने घातलेली अट आठवली, 'मित्र असलेच पाहिजेत!'
म्हणून लोकहो, आपण सगळे काही करू शकतो, आपल्याला कुणाची गरज नाही, आपण स्वत:ला सांभाळायला समर्थ आहोत या भ्रमात जगू नका. कोण कधी कसे मदतीला येईल सांगता येत नाही. म्हणून मी पणातून बाहेर या व आम्ही होऊन जगा, कारण त्यातच जगण्याचा खरा आनंद दडलेला आहे!