सदा सर्वदा देव सन्नीध आहे, कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे...
समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाच्या श्लोकातील या दोन ओळी अतिशय दिलासादायक आहेत. खरोखरच श्रद्धा आणि सबुरी ठेवली, तर या गोष्टीची प्रचिती देखील येते. आता या वैद्यराजांची गोष्टच पहा ना...
एका गावात एक वैद्य राहत होते. त्यांच्या उपचारांनी लगेच गुण येत असे. तसेच ते रुग्णांकडून फी आकारत नसत. ज्याला जसे शक्य होतील त्याने तसे पैसे द्यावेत, नसतील पैसे तर मोफत उपचार घ्यावेत असा त्यांचा शिरस्ता होता. त्यांची पत्नी त्यांना रोज सकाळी वाण सामानाची यादी देत असे. दिवसभर जमलेल्या पैशांतून ते वाणसामान आणत असत. देवदयेने त्यांना काहीही कमी पडत नव्हते. पण जेवढ्यास तेव्हढी मिळकत असल्याने साठवणी करण्याइतकी कमाई नसे.
अलीकडेच त्यांच्या मुलीचे लग्न ठरले होते. बायकोने नेहमीप्रमाणे वाण सामानाची यादी देत जोडून मुलीच्या लग्न सामानाचीही यादी दिली. ती वाचून वैद्य काळजीत पडले. आजवर कोणाकडून ठराविक रक्कम आकारली नाही, आता मुलीच्या लग्नासाठी कोणावर अशी सक्ती करणे किंवा पैशांसाठी अडवणूक करणे योग्य ठरणार नाही. असो, देवाक काळजी म्हणत त्यांनी कामाला सुरुवात केली.
दिवसभराचे काम संपवून वैद्यराज घरी निघणार, तोच त्यांच्या दवाखान्यासमोर एक आलिशान गाडी थांबली. त्यातून एक श्रीमंत व्यक्ती बाहेर आली. त्या व्यक्तीने वैद्यराजांना वाकून नमस्कार केला. वैद्यराज गोंधळले. त्या व्यक्तीने स्वपरिचय दिला. ती म्हणाली, 'वैद्यराज आपण मला ओळखले नसेल, पण मी आपल्याला ओळखतो. अनेक वर्षांपूर्वी तुमची ख्याती ऐकून मी तुमच्या भेटीला आलो होतो. आम्हाला संतानप्राप्ती नव्हती. तुम्ही औषध दिले. त्याचा गुण आला तरच फी द्या असे म्हटले होते. तुमच्या औषधाला गुण आला आणि आम्हाला कन्यारत्न झाले. त्यानंतर प्रापंचिक गडबडीत मी एवढा अडकलो की तुमची फी द्यायला विसरलो.
आज कामानिमित्त या गावी आलो होतो, म्हणून आठवणीने तुमची भेट घ्यायला आलो. तुमच्यामुळे आमच्या आयुष्यात जे सुख आले आहे, त्याचा मोबदला मी पैशात देऊ शकेन असे वाटत नाही. तरीदेखील मी तुम्हाला हा एक लाख रुपयांचा धनादेश देऊ इच्छितो. कृपया नाकारू नका. तुमची फी आहे असे समजा. आणि ही माझ्या मुलीची लग्न पत्रिका. पंधरा दिवसांनी तिचे लग्न आहे. तुमचे शुभाशीर्वाद तिला मिळू द्या. आम्ही वाट पाहतो.'
एवढे बोलून तो इसम आल्या पावली निघून गेला. वैद्यराजांच्या एका हातात वाण सामान आणि मुलीच्या लग्न सामानाची यादी, तर दुसऱ्या हातात एक लाख रुपयांचा धनादेश होता. वैद्यराजांनी कृतज्ञतेने आकाशाकडे पाहिलं, देवाचे मनोमन आभार मानले आणि स्मित करत म्हणाले... देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे!