>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन१९ मे ते २५ मे
नंबर १:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे पण तुमच्या कष्टाचे हवे तसे फळ मिळणार नाही. कुठेतरी काहीतरी अडकेल, विलंब होईल. पण यामुळेच तुम्ही अंतर्मुख व्हाल! आहात त्या परिस्थितीत आनंदाने मार्गक्रमण कराल. निरस व्हाल पण निराश नाही! मन प्रसन्न तर घर प्रसन्न असा अनुभव येईल!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. विवेकबुद्धी, संयम आणि धीराने वागा. आत्मोन्नतीचा मार्ग शोधा. इतरांकडून फार अपेक्षा ठेवू नका. या सगळ्या भौतिक पसाऱ्यातून स्वतःला थोडे अलिप्त करून बघा. एकांतात वेळ घालवा. तुम्ही करत असलेली उपासना सुरू ठेवा, सुंदर अनुभव येतील.
नंबर २:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी एकाच वेळी खूप पर्याय घेऊन येणार आहे. निरनिराळ्या गोष्टींमुळे निर्णय घ्यायला अवघड जाईल. मल्टी टास्किंग करावं लागेल. पण यांपैकी कोणतीही गोष्ट हवी तशी पुढे सरकणार नाही. एकूण थोडी तारांबळ उडण्याची शक्यता आहे. हवे ते साध्य होण्यासाठी अजून वेळ लागेल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही बऱ्याच गोष्टींमधून एक दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. खूप काही करायला जाऊ नका, फसवणूक संभवते. वरवर आकर्षक वाटणाऱ्या कुठल्याही गोष्टीला भुलू नका. स्वप्नरंजन करत बसू नका, हवेत बोलत राहू नका, प्रत्यक्षात कृती करा.
नंबर ३:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी जलद गतीचा आहे. तुमच्या कामात तुम्हाला नवीन संकल्पना सुचतील. थोडे मतभेद आणि वादविवाद देखील संभवतात. इतरांसमोर तुमचं बुद्धीचातुर्य उठून दिसेल. तुम्हाला हवी असलेली बातमी मिळेल, किंवा हवी असलेली व्यक्ती भेटेल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही अतिशय प्रामाणिकपणा जपण्याची गरज आहे. रोखठोक वागा, भावनांना बळी पडू नका. तुमचे मत स्पष्टपणे कोणालाही न घाबरता किंवा कुठलेही दडपण न घेता मांडा. नवीन बदल घडवू शकता. संवाद कौशल्यात सुधारणा करा. वादाच्या प्रसंगी संयम ठेवा.
श्रीस्वामी समर्थ.