महात्मा गांधींच्या मातोश्री अतिशय धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्या देवपूजा केल्याशिवाय पाणीदेखील पीत नसत. त्या नेहमी व्रतवैकल्यात मग्न राहत असत. त्याचप्रमाणे त्यांचे वडीलही सत्यवादी, धीट व उदार होते. ते न्यायी म्हणून त्यांचा मोठा नावलौकिक होता. अशा पुण्यशील जोडप्याच्या पोटी २ ऑक्टोबर १८६९ रोजी मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म झाला. पालक सात्विक वृत्तीचे असल्याने गांधीजींमध्ये बालपणापासूनच सद्गुणांची वाढ होत गेली. मात्र, गांधीजी जेव्हा शाळेत जाऊ लागले, तेव्हा त्यांना वाईट संगत लागली.
शालेय वयातच काही मुलांच्या संगतीने ते बिडी, सिगारेट ओढू लागले. त्यात उद्देश एवढाच, की तोंडातून धूर बाहेर काढल्यास त्यांना मोठी मजा वाटे. पैशाशिवाय विडी, सिगारेट मिळत नाही. पैसा तर जवळ नाही म्हणून चुलत्याने टाकलेली सिगारेटची थोटके ते ओढू लागले. पुढे पुढे ती थोटकेही त्यांना मिळेनाशी झाली. एकदा सिगरेट ओढण्याची चटक आली तेव्हा त्यांनी गड्याच्या खिशातले पैसे चोरले. त्यासमयी त्यांचे वय नऊ वर्षांचे होते. त्याही पुढे जाऊन मित्रांच्या आग्रहाखातर त्यांनी मद्यपान आणि मांसाहारदेखील करून पाहिला होता.
सगळी मौज मजा झाल्यावर आपण केलेल्या कृत्याची गांधीजींच्या मनाला टोचणी लागली. आई वडिलांना ही गोष्ट जर समजली तर त्यांना मरणप्राय दु:ख होईल असे गांधीजींना सारखे वाटत होते. आपण जे सेवन केले, ती एक आपल्या हातून घोडचूक झाली, असे त्यांना सातत्याने वाटू लागले. आपल्या चुकीची कबुली द्यावी आणि या दडपणातून मुक्त व्हावे, असे गांधीजींना सतत वाटत राही. तरीदेखील तो प्रसंग आला, तर टाळणे त्यांना मोठे कठीण जात असे.
आपल्या हातून कळत नकळत कितीतरी पापं घडली. आपण दारु, मांस, बिडी, सिगारेट ओढली, चोरी केली. गुणी आईबापाच्या पोटी जन्म घेऊन आपण चुकीचा मार्ग पत्करला ही देवाला न आवडणाऱ्या गोष्टी केल्या. कोणतीही गोष्ट आईवडीलांपासून लपवून ठेवणे ही कपट वृत्ती आहे. देवाला तर निष्कपटपणा आवडतो, असे थोर लोक सांगतात. तेव्हा आपण कपटवृत्तीचा जर त्याग केला नाही, तर आपणापासून देव कायमचा दुरावेल. या विचाराने आपण आतापर्यंत जे काही केले ते सर्व काही लिहून वडिलांच्या हाती कागद द्यायचा आणि कलेल्या अपराधाबद्दल क्षमा मागायची आणि पुन्हा ही चूक कधीच करणार नाही असे कबुल करायचे त्यांनी ठरवले.
त्याप्रमाणे त्यांनी सर्व अपराध लिहून एका सकाळी वडिलांच्या हाती लिहिलेला कागद दिला. त्यादरम्यान त्यांचे वडील वरचेवर आजारी असल्याने पलंगावर पडून राहत असत. हा कागद वाचल्यावर वडील रागावतील, आपल्याला मारतील, खूप ओरडतील, असे गांधीजींना वाटले होते. परंतु झाले उलटच! वडिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी सर्व काही वाचून कागद फाडून टाकला आणि लहानग्या मोहनला मायेने जवळ घेतले. ते पाहून गांधीजींचे डोळे पाणावले आणि त्यांच्याही डोळ्यातून पश्चात्तापाचे अश्रू वाहू लागले. त्यांनी वडिलांना त्याक्षणी वचन दिले, अभक्ष्य भक्षण करणार नाही आणि अपेयपान करणार नाही. देवाची आणि देशाची सेवा करेन. वडिलांना दिलेला शब्द गांधीजींनी आजन्म पाळला. परदेशात शिक्षणार्थ वास्तव्य असतानाही ते क्षणभरही मोहाला भुलले नाहीत. त्यांनी आपले ब्रीद पाळले. त्यांच्या ठायी असलेल्या अशाच लहान मोठ्या सवयींमुळे, प्रामाणिकपणामुळे, राष्ट्रभक्तीमुळे ते महात्मा झाले.