'स्वराज्य स्थापन व्हावे, ही तर श्रींची इच्छा!' ही शपथ आपल्या शिवशंभू छत्रपती शिवाजी राजेंनी घेतली. परंतु हे स्वप्न पाहिले, ते शहाजी राजांनी. त्या स्वप्नाचा पाया रचला जिजाऊ मातेने आणि त्या स्वप्नाची पूर्तता केली ती छत्रपती शिवाजी राजांनी! या घटनेचे साक्षीदार आणि मदतनीस, मार्गदर्शक होते समर्थ रामदास स्वामी. प्रख्यात व्याख्याते राम शेवाळकर यांनी एका व्याख्यानात या प्रसंगाबद्दल काय वर्णन केले आहे, ते पाहू.
छत्रपती शहाजी राजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहीले, तेव्हा बालशिवाजी अवघ्या एक वर्षाचे होते. शहाजी राजांची महत्त्वाकांक्षा पाहता समर्थ रामदास स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला आणि स्वराज्यपूर्तीचे स्वप्नं नक्कीच साकार होईल अशी ग्वाही दिली.
त्या काळात समर्थ रामदास स्वामींनी आपले चिंतन पूर्ण करून सबंध देशाचा पायी प्रवास केला. समाजमनाचा अभ्यास केला. मोगलशाहीला गांजून गेलेली जनता आत्मभान, देशाभिमान, धर्माभिमान विसरून गेली होती. जो आपल्याला खाऊ घालेल, तो आपला राजा, ही गुलामी मानसिकता लोकांची तयार झाली होती. हे चित्र पाहून समर्थ अस्वस्थ झाले. त्यांनी आपल्या अध्यात्माचा रोख, दिशाच बदलून टाकली. त्यांनी समाजासमोर दोन आदर्श ठेवले, धनुर्धारी राम आणि सेवेत तत्पर असलेल्या बलवान हनुमंताचे!
सीतेच्या विरहाने व्याकुळ झालेला किंवा भक्तवत्सल असलेला राम जनतेसमोर आणला नाही, तर पाठिशी यत्किंचितही सेना नसताना केवळ आपल्या धनुष्याच्या सामथ्र्यावर दक्षिणाधिपती रावण याचे पारिपत्य करणाऱ्या रामाचा आदर्श ठेवला. मोगलांना शरण न जाता रामासारखे खंबीर बना आणि आपला लढा आपण जिंकण्यास तत्पर व्हा.
त्याचबरोबर वीर हनुमान आणि दास हनुमान यांचा आदर्श दिला. केवळ वीरश्री संचारून उपयोग नाही. वीरतेचा अहंकार चढून मनुष्य उन्मत्त होऊ शकतो. याचसाठी वीरतेबरोबर दास मारुती, जो विनम्र होता, सेवातत्पर होता, वीर योद्धा होता त्याचा आदर्श घालून दिला. ठिकठिकाणी व्यायामशाळा सुरू केल्या. तरुणांना आरोग्याप्रती जागरूक केले. बलवान केले. दंडबैठक, जोरबैठका, सूर्यनमस्काराचा सराव करवून घेत हनुमंताची उपासना करून घेतली. त्यामुळे सुस्त पडलेल्या समाजाचे तन व मन कणखर झाले. स्वराज्याची ओढ निर्माण झाली. शत्रूविरुद्ध मुठी आवळल्या गेल्या आणि याच तरुणांमधून तयार झालेल्या मावळ्यांना शिवबासारखा प्रजाहितदक्ष राजा मिळाला.
या सर्व बाबी पाहता अध्यात्माची ताकद लक्षात येते. हिंदूंच्या दैवतांचा आदर्श ठेवून क्रांती कशी घडवता येते, याचा परिपाठ मिळतो आणि स्वराज्यासाठी कष्ट घेतलेल्या सर्व महात्म्यांसमोर विनम्रतेने व अभिमानाने तन-मन नतमस्तक होते. जगदंब...उदयोऽस्तु!